एकीकडे आपापल्या कामाच्या व्यापात व्यस्त असताना, साहित्याच्या वेडापोटी एकत्र येऊन हा उपक्रम सुरू करू शकलो याचं समाधान वाटतं आणि सहभागी साथीदारांचा सार्थ अभिमान. मराठी पुस्तकांबद्दल माहिती मिळवताना होणारी दमछाक, त्यासाठी करावी लागणारी धडपड, आणि माहितीचा आभाव
आमच्या मनाला सतत भेडसावत होता, त्यातून वाचक म्हणून होणारी हेळसांड सतत सतावत होती. यातूनच मराठी रसिकांसाठी, भाषेसाठी आपणही काही योगदान देऊ शकतो यातूनच या कल्पनेची सुरुवात झाली. मराठी साहित्याबद्दल असलेली तळमळ आणि त्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा यातून प्रेरणा घेऊन तमाम मराठी वाचकांसाठी ही वेबसाईट आम्ही उपलब्ध करू शकलो.
तुम्ही पुस्तक वाचायला निवडताना तुमच्या आवडीच्या पुस्तकांबद्दल समीक्षकांच मत, त्यांना त्यातून उमगलेला विचार, पुस्तक का वाचावं? याबद्दलचा सारांश इथे सहज वाचू शकता. पुस्तक निवडताना त्यात काय पाहावं? त्यात मांडलेल्या कथा, विचार.. यातून लेखकाला काय सांगायचं आहे? याचा मतितार्थ तुम्हाला इथे मिळेल आणि तुमची पुस्तकाची निवड सोपी होईल.
आम्हाला तर आनंद आहेच, परंतु असं असलं तरी कोणताही लोकोपयोगी उपक्रम हा लोकांच्या सहभागाशिवाय कधीही पूर्ण होत नाही. मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांच्याच सहभागाची आम्हाला आशा आहे. तुम्ही या संकेतस्थळाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवाल यात शंका नाहीच, जास्तीत जास्त वाचनप्रेमी जोडणे आणि त्यांच्या मार्फत मराठी साहित्य घराघरात पोहोचवण्याचा आमचा मानस आहे. कारण मराठी आपल्या सगळ्यांची आहे, साहित्य आपल्या सगळ्यांच आहे आणि ते ज्यांनी रचलं ते लेखक, कवी, संत आपल्या सगळ्यांचेच आहेत. मराठी मातीसाठी, माणसांसाठी आणि साहित्यासाठी आपल्या पूर्वजांनी चालू केलेल्या या अखंड, अभंग आणि अक्षय यज्ञात आमच्याकडून या काही समिधा अर्पण करू शकलो या खारीच्या वाट्याचा अभिमान वाटतो. आशा करतो तुम्हीही या दिव्य यज्ञसमारंभात यज्ञाच पावित्र्य राखून सामील व्हावं आणि यज्ञ अखंड राखण्यात सिंहाचा वाटा उचलावा.
अशा या उपक्रमाला तुम्ही सगळेजण मनापासून स्वीकाराल आणि आपली मातृभाषा जतन करून तळागाळात पोहोचविण्यासाठी हातभार लावाल अशी आशा करतो आणि यश-अपयशाची अपेक्षा न बाळगता, हा उपक्रम लोकार्पित करतो.
- अक्षय सतीश गुधाटे.
मराठीचे ऋणी..
अक्षय सतीश गुधाटे
गिरीश अर्जुन खराबे