डिटेक्टिव्ह अल्फा आणि 'मोरेवाडी इस्टेट' मधील रहस्य - सौरभ वागळे | Detective Alfa Aani 'Morewadi Estate' Madhil Rahasya - Sourabh Wagale | Marathi Book Review

Detective-Alfa-Aani-Morewadi-Estate-Madhil-Rahasya-Sourabh-Wagale-Marathi-Book-Review
पुस्तक डिटेक्टिव्ह अल्फा आणि 'मोरेवाडी इस्टेट' मधील रहस्य लेखक सौरभ वागळे
प्रकाशन दिलीपराज प्रकाशन समीक्षण पंकज नावरकर
पृष्ठसंख्या १६० मूल्यांकन ४.६ | ५

रहस्यकथा वाचताना मिळणारा थरार आणि प्रत्येक पान उलटताना उलगडत जाणारी गूढ गोष्ट मला नेहमीच आवडते! शेरलॉक होम्स आणि ब्योमकेश बक्षी यांच्या कथा वाचल्यानंतर मराठीत अशा ताकदीच्या डिटेक्टिव्ह स्टोरीज खूप कमी सापडतात. त्यामुळेच जेव्हा डिटेक्टिव्ह अल्फा ही मालिका आणि त्यातील मोरेवाडी इस्टेट मधील रहस्य हे पुस्तक माझ्या हाती आलं, तेव्हा उत्सुकता कमालीची वाढली. सौरव वागळे यांनी कथानक इतक्या बारकाईने उभारलं आहे की, मी पुस्तक अक्षरशः एका बैठकीत संपवलं!

कथेचा केंद्रबिंदू एका रहस्यमय खुनाच्या प्रयत्नाभोवती फिरतो. कोल्हापूरच्या दक्षिणेला वसलेली मोरेवाडी इस्टेट, तिथला मोठा बंगला आणि त्या जागेवर पिढ्यान्‌पिढ्या असलेलं गोविंदराव मोरेंचं वर्चस्व.. हे सगळंच गूढतेने भरलेलं वाटतं. अचानक घडलेल्या घटनांमुळे डिटेक्टिव्ह अल्फा आणि त्याचा मित्र प्रभव यांना तिथे पाचारण केलं जातं, आणि त्यांचा तपास जसजसा पुढे जातो, तसतसं रहस्य अधिकच गडद होत जातं. वाचताना सतत पुढे काय होणार याचीच उत्सुकता लागून राहते.

मला विशेष आवडली ती या पुस्तकाची लेखनशैली.. साधी, प्रवाही आणि चित्रदर्शी. प्रत्येक प्रसंग अगदी डोळ्यांसमोर उभा राहतो. तपासाच्या दरम्यानची उत्कंठा, पात्रांची मानसिकता, आणि गूढ वातावरण यामुळे पुस्तक हातातून सुटत नाही. काही प्रसंग इतके अप्रत्याशित होते की, अक्षरशः थक्क व्हायला झालं! मात्र, मला असं वाटलं की, काही पात्रांना अधिक खोली मिळायला हवी होती. काही प्रसंग पटकन संपतात, त्यांना थोडा अधिक विस्तार मिळाला असता तर अजून अधिक प्रभावी वाटलं असतं.

ज्यांना रहस्यकथा आणि गुन्हेगारी तपासणीच्या स्टोरीज आवडतात, त्यांच्यासाठी हे पुस्तक एक परिपूर्ण वाचन ठरू शकतं. मला स्वतःला हे पुस्तक खूप आवडलं, कारण त्यातला थरार, उत्कंठा आणि अनपेक्षित वळणं सतत खिळवून ठेवतात. शेरलॉक होम्स आणि ब्योमकेश बक्षीच्या कथांनी ज्यांना मोहिनी घातली आहे, त्यांनी हे पुस्तक नक्की वाचावं! मला खात्री आहे की, डिटेक्टिव्ह अल्फा आणि मोरेवाडी इस्टेट मधील रहस्य तुमच्या लायब्ररीत असलंच पाहिजे!

-© पंकज नावरकर.

Previous Post Next Post

Contact Form