झूल - भालचंद्र नेमाडे | Zool - Bhalchandra Nemade | Marathi Book Review

झूल-भालचंद्र-नेमाडे-Zool-Bhalchandra-Nemade-Marathi-Book-Review
पुस्तक चांगदेव चतुष्ट्य ४ - झूल लेखक भालचंद्र नेमाडे
प्रकाशन पॉप्युलर प्रकाशन समीक्षण अक्षय सतीश गुधाटे
पृष्ठसंख्या २११ मूल्यांकन ४.३ | ५

"भालचंद्र नेमाडे" यांचं बहुतांश लिखाण नेहमीच वादग्रस्त राहिलेलं आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकलेली चार पुस्तकं म्हणजे "चांगदेव चतुष्ट्य". बिढार, हूल, जरीला व चौथे पुस्तक म्हणजे "झूल". नायकाचा विद्यार्थी ते शिक्षक असा एक लहान परंतु विस्मयकारक प्रवास यात मांडला आहे. प्रत्येक टप्प्यात होणारा बदल.. त्यात आयुष्यात येणाऱ्या नवनवीन अडचणी.. नवनवीन माणसं.. याने ही कथा पुढे सरकते. चारी पुस्तकांचा महत्त्वाचा मुद्दा जातीयवाद आहे. असं आता वाटत आहे. एकूण समजातील विविध प्रकारच्या जाती.. त्यांवरील एकमेकांची मते व शेरे यातूनच कथेचा बहुतांश गाभा व्यापला आहे.

असं म्हणतात की, वाचकवर्ग नेमाडपंथी व इतर असे ओळखले जातात. पण ही पुस्तकं वाचून नक्की आपण कुठं बसतो? आता मला समजत नाहीये. "कोसला" जशी आवडली.. मनाला भिडली.. पुन्हा पुन्हा वाचू वाटली.. तिच्याशी आपण सहमत होऊ शकलो.. तसं मात्र या पुस्तकांचं नाहीये. यानंतर आलेली "हिंदू" देखील मनात घर करून जाते. बहुदा बऱ्याच जातीयवादी गोष्टींवर भाष्य असल्याने मला चतुष्ट्य फारसं भावलं नाही. परंतू नेमाडे यांच्या लेखणीचा जो एक सटीक हेल असतो, तो यात ही गवसतो हे मात्र नक्की.

कथेचा नायक चांगदेव पाटील आता नवीन गावी येतो. जराशी तीच कथा जी मागील दोन पुस्तकाची आहे. फक्त पात्रं वेगळी आहेत. नामदेव भोळे.. पुराणिक कॉलेज.. राजेश्वरी.. पोफळे.. चांगला देशपांडे.. चिपळूणकर.. शेंडे. ब्राम्हणवादी कॉलेज, व त्यातूनच निर्माण झालेली नायकाची परिस्थिती व त्यावर असणारी त्याची परखड भूमिका मनाला विचार करायला भाग पाडते. हळू हळू एकटेपणा वाढत जातो. स्वतःच्याच गर्तेत हळू हळू चांगदेव अडकत असताना, त्याला सहन न होणाऱ्या वेदना वाढताना, अनेक सहकाऱ्यांना येणारी कीव आपल्यापर्यंत पोहचते. अजूनही लग्न झालेले नाही याची खंत चांगदेवला पुरती छळते. या पुस्तकात स्त्री, लग्न अशा नाजूक विषयांवर देखील अनेक प्रकारे परखड भाष्य केली आहेत.

पुस्तकाची भाषा अगदी सहज, चपखल.. संवादाची आहे. वाचताना, पुढची गोष्ट माहित असून देखील वाचताना काय होईल असे वाटते. चांगदेवची ढासळणारी तब्बेत ही देखील एक मनाची जागा घेऊन असते. म्हणूनच पुस्तक काही अंशी उराला चिमटे काढत राहते. चांगदेवची पुढे न सरकणारी या पुस्तकाच्या शेवटी देखील अर्धीच राहिल्याची खंत मात्र अजून मला सलते आहे. ही चारही पुस्तकं एक वेगळा विषय हाताळण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला ही खूपच आवडू शकतात किंवा.. अगदीच नकोशीही वाटू शकतात. त्यामुळे तुम्ही स्वतः सगळी पुस्तकं वाचा.. स्वतः ठरवा, आणि जर तुम्ही ती आधीच वाचली असतील तर मग आम्हाला तुमचा विस्तृत अभिप्राय कळवा!!

-© अक्षय सतीश गुधाटे.

Previous Post Next Post

Contact Form