शोध - मुरलीधर खैरनार | Shodh - Murlidhar Khairnar | Marathi Book Review

शोध-मुरलीधर-खैरनार-Shodh-Murlidhar-Khairnar-Marathi-Book-Review
पुस्तक शोध लेखक मुरलीधर खैरनार
प्रकाशन राजहंस प्रकाशन समीक्षण गिरीश अर्जुन खराबे
पृष्ठसंख्या ४९७मूल्यांकन ४.५ | ५

छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या झंझावाती आयुष्याबद्दल आपण अनेक गोष्टी ऐकल्या आहेत. शतकानुशतके त्यांच्या आयुष्यातील घटनांनी अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. स्वराज्य आणि स्वकीयांसाठी त्यांनी आपल्या जीवाची बाजी लावत अनेक प्रसंग शिताफीने हाताळले. असाच एक प्रसंग म्हणजे सुरतेची लूट! मुघलांच आर्थिक ठाणं असलेले हे बंदर महाराजांनी स्वराज्याचा खर्च व शत्रूला नेस्तनाबूत करण्यासाठी दोनदा लुटलं. पहिल्यांदा लुटलेला सगळाच्या सगळा खजिना त्यांनी स्वराज्य उभारणीसाठी खर्च केला. मात्र दुसऱ्यांदा लुटलेल्या सुरतेचा सगळा खजिना महाराजांना वापरता आला नाही. शत्रूपासून सुरक्षितरित्या तो स्वराज्यात आणण्यासाठी महाराजांनी त्या खजिन्याचे दोन भाग केले. परंतु त्यातला एकच भाग स्वराज्यात पोहोचू शकला व दुसरा भाग मराठ्यांची तुकडी शत्रूहाती सापडल्यामुळे लपवला गेला. जिथे कुठे तो खजिना लपवण्यात आला त्याचा निरोप कधी महाराजांपर्यंत पोहोचू शकला नाही. हाच विषय घेऊन "मुरलीधर खैरनार" यांनी "शोध" ही कादंबरी लिहिली आहे.

सुरत लुटीचा दुसरा भाग नाशिक प्रांतात लपविला असण्याचा ठोस पुरावा इतिहासात आहे. तोच धागा पकडून संपूर्ण कथानक नाशिकच्या भागात घडत असतं. शौनक, केतकी, जयंत, आबाजी यांसारख्या अनेक पात्रांना घेऊन कथानक वेगवेगळी वळणं घेत राहतं. गोंदाजी नारो या महाराजांच्या एका शिलेदारावर ही लूट स्वराज्यात पोहोचवण्याची जबाबदारी असते, परंतु मोघलांच्या आक्रमणापासून वाचवण्यासाठी तो खजिना लपवून ठेवतो. शत्रूहाती सापडल्याने आणि युद्धातील जखमांनी त्याचा कैदेतच मृत्यू होतो. कैदेत असताना सोबतच्या एका इंग्रज अधिकाऱ्यासोबत ओळख झाल्यावर राजांना देण्यासाठीचा एक निरोप तो त्याच्याकडे सोपवतो. काही कारणास्तव साडेतीनशे वर्षांपूर्वी हा निरोप राजांकडे पोहोचलाच नाही. परंतु इतिहासात रुची असलेल्या आजच्या पिढीच्या तो कागद हाती लागतो आणि सुरू होतो शोध!

हा शोध घेणारा एकच गट महाराष्ट्रात कार्यरत नसून अनेक लोक आपापल्या परीने त्याचा माग घेत असतात. अशातच सत्ता आणि पैसा हातात असणारे आबाजीही त्याचा शोध घेत असतात. एकीकडे शौनक, केतकी या शोधात अडकलेले असतात तर दुसरीकडे आबाजी त्यांना गोंदाजीचा निरोप मिळवून देणाऱ्या त्यांच्याच ब्रिटिश मैत्रिणीच्या खुनात अडकवतात. आबाजी आणि शौनक, केतकी यातलं नक्की कोण हा शोध घेण्यात यशस्वी होतं ते पुस्तक वाचल्यावरच आपल्या लक्षात येईल.

अनेक पात्रांचा भरणा असलेली ही कादंबरी सुरवातीला थोडी सावकाश पुढे सरकते मात्र एकदा सगळी पात्र लक्षात आली की कथानक पकड घ्यायला लागतं. नाशिकच अतिशय सूक्ष्म वर्णन वाचताना आपल्याला लेखकाचा त्या परिसराबद्दल असलेला अभ्यास लक्षात येईल. शिवाजी राजांबद्दल आणि आपल्या गौरवशाली इतिहासाबद्दल अनेक गोष्टी आपल्याला लेखकाच्या नजरेतून वाचायला मिळतात. या पुस्तकात घडलेल्या सगळ्या गोष्टी खरोखर घडल्या असाव्यात असं आपल्याला वाटायला लागतं, त्यावरून लेखकाच्या लिखाणाची जादू आपल्या लक्षात येते. काहीसं थरारक, रहस्यमय आणि माहितीपर वाचण्यासाठी तुम्ही शोध हातात घेऊ शकता. काहितरी अनुभव आणि नावीन्यपूर्ण वाचण्याचा अनुभव यातून तुम्हाला मिळेल, एवढं मात्र नक्की.

-© गिरीश अर्जुन खराबे.

Previous Post Next Post

Contact Form