पुस्तक | साधुपुत्र शंभू | लेखक | नितीन थोरात |
---|---|---|---|
प्रकाशन | रायटर पब्लिकेशन | समीक्षण | गिरीश अर्जुन खराबे |
पृष्ठसंख्या | ३६० | मूल्यांकन | ४.५ | ५ |
इतिहासाने सतत अन्याय केलेल्या संभाजी राजांवर आता कुठे थोडा थोडा प्रकाश पडायला सुरवात झाली आहे. शिवाजी सावंत, विश्वास पाटील यांनी आपल्या कादंबर्यांमधून काही प्रमाणात त्यावर आधीच प्रकाश टाकला आहे; मात्र आपल्या चित्रपटांनी, नाट्यसृष्टीने म्हणावा तितका न्याय बाळराजांना क्वचितच दिला. नुकत्याच येऊन गेलेल्या छावा चित्रपटामुळे लोकं आता इतिहासाची पान चाळू लागली आहेत. अशातच वयाच्या नवव्या वर्षी आग्र्यावरून सुखरूप राजगडी परत येणाऱ्या शंभूबाळाच्या प्रवासावर नितीन थोरात यांनी "साधुपुत्र शंभू" या पुस्तकातून प्रकाश टाकला आहे.
"क्षत्रियकुळावंत साधू" हा शिवरायांचा आग्रा ते राजगड प्रवास वाचला आणि वेध लागले ते "साधुपुत्र शंभू" अर्थात छत्रपती संभाजी महाराजांच्या राजगड प्रवासाचे. इकडे थोरले महाराज गडावर पोहोचले मात्र शंभू निधनाच्या वार्तेने सारं स्वराज्य ढवळून निघालं. शंभू राजांच्या अंत्यविधीचे रीतसर कार्यक्रम आटपून महाराजांनी बाळराजांच्या निधनावर शिक्कामोर्तब केला. बाळराजांचा प्रवास सुखकर व्हावा, मुघल पहारे ढिल्ले पडावेत म्हणून रचलेला हा डाव काहीअंशी यशस्वी झाला पण त्याचा विपरीत परिणाम राजगडावरही झाला. जिजाऊंनी, येसूबाईंनी व सकळ स्वराज्यानी त्याची धास्ती घेतली, त्यामुळे एकंदर परिस्थिती पाहून राजांना आऊसाहेबांपुढे सत्यकथन करावंच लागलं. बाळराजांच्या परतीच्या प्रवासासाठी महाराजांना हे असे भावनांचेही डावपेच खेळावे लागले, परंतु कपटी औरंगजेबाला यावर मुळीच विश्वास नव्हता. त्याने शंभू राजांच्या शोधात सगळ्या मुघली फौजेला कामाला लावलं.
एकत्र प्रवास करणं धोक्याचं व शंभूबाळाचं वय पाहता जोखमीचे असल्याने महाराजांनी बाळराजांना सर्जेरावांसोबत मथुरेतच ठेवलं. एकदा राजे राजगडी पोहोचले कि बाळराजांच्या परतीच्या प्रवासाला सुरवात होणार होती. खाचखळग्यांनी भरलेला हा काटेरी प्रवास नितीन थोरातांनी आपल्या "साधुपुत्र शंभू" या क्षत्रियकुळावंत मालिकेतल्या दुसऱ्या कादंबरीमध्ये रेखाटला आहे. वयाच्या नवव्या वर्षी बाळराजांच्या मनाचा कणखरपणा, निडरपणा व बालवयात आलेला पोक्तपणा या कादंबरीत पहायला मिळतो. प्रसंगी वयाच्या मनाने काही थोराड विचार वा युक्त्या लेखकाने बाळराजांच्या तोंडून मांडल्या आहेत. मात्र ते शंभुराजांवर असलेल्या प्रेमाचं प्रतीक असल्याची कबुली त्यांनी सुरवातीलाच देऊन ठेवली आहे. वडिलांप्रमाणेच औरंग्याला दाही दिशा हैराण करून सोडण्याचं कार्य शंभूराजांनी केलं आहे. आपल्या मधुर वाणीने, चातुर्याने अनेक प्रसंग या प्रवासात त्यांनी निभावून नेले आहेत. असा हा बाळराजांचा प्रवास आपल्याही मनाला चटका लावून जातो.
सगळ्यांना सहज खिळवून ठेवणारी भाषा, शंभूराजांच व्यक्तित्व प्रखरपणे मांडणारं बोलकं मुखपृष्ठ व अनेक रोमांचकारक, जीवघेण्या प्रसंगानी रंगलेली हि कादंबरी सगळ्यांनी वाचायला पाहिजे. शंभुराजांच्या व्यक्तित्वाला कलाटणी देणारा हा प्रसंग लेखकाच्या कल्पनेतून आपल्यासमोर उभा राहतो, प्रसंगी तो आपल्याशी बोलू लागतो, मनात शंकांचं जाळ पेरून जातो व पावलोपावली आपल्याला त्यात अडकवून ठेवतो. असा हा साधुपुत्राचा प्रवास तुम्ही नक्की वाचा आणि तुमचे अनुभव आम्हाला प्रतिक्रियांद्वारे नक्की कळवा.