पुस्तक | रेड लाइट डायरीज.. ख़ुलूस | लेखक | समीर गायकवाड |
---|---|---|---|
प्रकाशन | रोहन प्रकाशन | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | १९६ | मूल्यांकन | ४.७ | ५ |
पुस्तकाच्या दुकानात पुस्तक पाहता पाहता अचानक एक पुस्तक हातात येतं.. "रेड लाइट डायरीज... ख़ुलूस" लेखक "समीर गायकवाड" आणि आपण त्याचं सुंदर मुखपृष्ठ पाहून स्तिमित होतो. अगदी गडद मुखपृष्ठ; रंगीबेरंगी कपडे घालून उभ्या असलेल्या काही स्त्रिया. अचानक आपलं लक्ष मागच्या मलपृष्ठाकडे जातं. नक्की पुस्तकात काय आहे.. यासाठी आपण ब्लर्ब वाचू लागतो. आणि आपल्या लक्षात येतं.. हे पुस्तक चौकटीबाहेरचं आहे, वेगळं आहे. दैनंदिन जीवनातील अनेक अनपेक्षित, दुर्लक्षित, व समाजाने ज्याकडे नेहमीच काना डोळा केला आहे.. पाठ फिरवली आहे.. अशा काही गोष्टींचा आधार घेऊन हे पुस्तक लिहिलं आहे. अनेक स्त्रियांचे दुःख.. त्यांनी भोगलेल्या नरक यातना, त्यातून बोथट होत गेलेल्या संवेदना व उराशी बाळगल्या स्वप्नाची होणारी घुसमट, मनाची तगमग अशा बिकट परिस्थितीवर मात करत वेश्याव्यवसायात असणाऱ्या, काही स्त्रियांची ही कहाणी आहे. ज्या या पुस्तकाच्या नायिका आहेत.
खुलूस म्हणजे निर्मळ सच्चेपण, आस्था, निष्ठा.. तुम्ही विचार कराल हे नाव का? तर परपुरुशाच्या वासना शमवण्यासाठी स्वतःच्या देहाची लक्तर करणाऱ्या या स्त्रिया.. हे सगळं मनापासून करतात का? त्यांना या अवस्थेत, परिस्थितीत कोणी आणलं? बरं.. चला एकदा समजून घेऊया की, काही परिस्थितींच्या पार्श्वभूमीवर त्या या सर्वात अडकल्या आहेत. पण मग आपण त्यांना समाजातून वेगळं का समजतो? वेगळी वागणूक का देतो? कधी स्वतःच्या मुलाबाळांच्या पोटासाठी तर.. कधी इभ्रतीसाठी.. तर कधी फसवणुकीतून हे आयुष्य त्यांच्या वाट्याला येतं. त्यांच्यातील हाच सच्चेपणा घेऊन, वेगळ्या धाटणीच्या काही कथा लेखकाने आपल्या समोर आणल्या आहेत. पाच पुस्तकांच्या मालिकेमधले हे पहिले पुस्तक. "खुलूस".
पुस्तकाची भाषा प्रामुख्याने मवाळ आहे. गूढ कादंबरीच्या हळूहळू उलघडत जाणाऱ्या कथेप्रमाणे लेखक एक एक व्यक्तिरेखा आपल्या समोर आणतो. व्यक्तिचित्रण इतकं सुंदर आहे की आपल्या पुढ्यात ती व्यक्ती आहे असे वाटते. लेखकाची निरीक्षण क्षमता अफाट आहे.. आणि त्याहून सुंदर आहे ते म्हणजे गोष्ट उभी करण्याची, त्यातील बारकावे समजावून सांगण्याची, परिस्थितीचा व्यापक लेखाजोखा घेण्याची पद्धत. म्हणून पुस्तक कुठेच खाली ठेऊ वाटत नाही. कहाण्या जरी वेगवेगळ्या असल्या.. नायिका जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्यातील समान दुआ.. भावनांचे रितेपण टिपून ते वाचकांसमोर मांडण्यात, या स्त्रियांकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलण्यात, व स्वतःच्या मानसिक कक्षेबाहेर विचार करायला भाग पाडण्यात हे पुस्तक यशस्वी ठरलं आहे.
जाती-धर्मा पलीकडच्या या विश्वात किती कुरूपता आहे.. सोबतच काही ठिकाणी शून्यता आहे. हिराबाई, नसीम, नागम्मा, अमिना, जानकी, मालती.. काय नि किती नावे. मोठमोठाली शहरे.. त्यातील कामाठीपुरा.. पुणे, मुंबई, मिरज. परप्रांतीय देखील काही कथा आहेत. अनेक विचित्र प्रथा आहेत.. लॉकडाउन मधल्या काही हृदय विदारक कथा आहेत. आणि काही मोठ्या मनाची माणसं देखील आहेत. या कथा तुम्हाला विचार करायला तर लावतीलच.. परंतू परदुःखाच्या भावना समजून घ्यायला भाग पाडतील. एकंदरीत हे पुस्तक तुम्हाला समृध्द करेल. ही समृद्धी विचारांची आहे.. सर्वसामावशकतेची आहे. नक्की वाचावं असं हे पुस्तक आहे. इतकंच काय तर याच्या पुढच्या भागासाठी अजून उत्सुकता निर्माण झाली आहे.. लवकरच तोही मी वाचेल. तुम्ही हे पुस्तक वाचलं असेल तर तुमचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा.