पुस्तक | प्रतीक्षा | लेखक | रणजित देसाई |
---|---|---|---|
प्रकाशन | मेहता पब्लिशिंग हाऊस | समीक्षण | गिरीश अर्जुन खराबे |
पृष्ठसंख्या | १०२ | मूल्यांकन | ४.८ | ५ |
प्रितीच्या रोपावर फुले येण्यासाठी जर खरी गरज कशाची लागत असेल तर ती आहे निरपेक्ष, निस्सिम भक्ती! माणूस जितका स्वतःमध्ये गुंतलेला असतो तितक्याच तीव्रतेने त्याला दुसऱ्यात गुंतण्यासाठी आत्मसमर्पण करावं लागतं. आणि जेंव्हा ही आत्मसमर्पणाची भावना तुमच्या मनात तयार होते, तेंव्हाच तुम्ही समोरच्या माणसावर जीव ओवाळून टाकता. कित्येकदा असं होत की सर्वस्व बहाल करूनही त्याच तीव्रतेची प्रीती तुमच्या वाट्याला येत नाही. त्यामुळे जे पराकोटीच दुःख माणसाला होतं त्याची तुलना जगात कशाशी होऊ शकत नाही. प्रेमभंगात अडकलेला माणूस केवळ भक्तीच्या जोरावर बाहेर पडू शकतो. मग ती देवात अडकवून टाकणारी भक्ती असो वा आणखी दुसऱ्या कोणत्या माणसात! भक्तीचा मार्ग सापडल्याशिवाय प्रितीचा पिच्छा पुरवता येत नाही. स्त्री पुरुषाच्या नात्यातला हाच धागा पकडत रणजित देसाईंनी "प्रतीक्षा" लिहिली आहे.
प्रितीच्या मार्गावर वाट चुकलेला मिलिंद नावाचा तरुण आपल्या ठिकाणाच्या शोधात हिमालयातून भटकत असतो. त्रासलेल्या मनाला विरंगुळा व दुःखापासून पळण्यासाठी तो हा मार्ग निवडतो. असंच भटकत असताना, मुक्काम करण्यासाठी, दोन दिवस आराम करण्यासाठी तो विश्राममठाचा आसरा घेतो. तिथे भेटलेल्या तीन व्यक्तींमुळे मिलिंदच जीवन हळूहळू बदलू लागतं. जगात कुठेही न मिळालेली आपुलकीची भावना त्याला तिथे मिळते. बाबा, नंदिनी, राहुल यांच्यासोबत दोन दिवसांसाठी आलेला मिलिंद तब्बल दहा दिवस राहतो. बाबांच्या समुपदेशनामुळे जीवनाच्या काही मूलभूत तत्वांचा मिलिंदला नव्याने बोध होतो. आयुष्यात हरवलेलं शाश्वत प्रेम त्याला नंदिनीत सापडतं. ह्या जगात प्रत्येकाच्या वाट्याला असह्य दुःख आलेलं असतं पण त्या असह्य दुःखातूनच सुखाचा उगम होत असतो, हे सांगताना बाबा म्हणतात,
"हो, दुःख उपभोगण्यातही अपार सुख असतं. प्रसुतीचही असह्य मरणप्राय दुःखच असतं ना? कैक वेळा शाश्वत सुखाचा जन्म असह्य दुःखातूनच होत असतो."
मिलिंद आणि बाबा यांच्यात होणारे संवाद लेखकाने अप्रतिमरित्या मांडले आहेत. एकंदर संभाषणाचा ओघ इतका मोघम आहे की ते वाचतच राहावंसं वाटतं. असं वाटत असताना, एकसंध वाचत असताना कधी कथेचा शेवट येतो ते आपल्या लक्षातही येतं नाही. बाबा आणि मिलिंदच्या संभाषणाचा खालील नमुना वाचून मी काय म्हणतोय ते तुमच्या लक्षात येईल.
"मृत्यूनंतर काय? याची कल्पना नसल्याने मृत्यू एवढा भयावह झालेला आहे. सुरवंट कोशात स्वतःला बद्ध करून घेतो, याचं कारण एकच. त्याला फुलपाखराचे रूपांतर ज्ञात असतं. ते नसतं, तर त्यानं स्वतःला कोशात गुंतवून घेतलंच नसतं मुळी. ज्यांना या ठिकाणाचा पत्ता लागला ते सारे मृत्युंजय ठरले. ज्ञानेश्वर स्वतः समाधीत उतरले. येशू ख्रिस्त हसत क्रूसावर चढला. सॉक्रेटिस ने शांतपणे विषाचा प्याला ओठी लावला. हा शांतपणा, हा निश्चिंतपणा आला कोठून?"
दुःखात पिळवटलेल्या व संन्याशिव्रताला जवळजवळ आत्मसात केलेली नंदिनी मिलिंदला स्वीकारते का? नंदिनीचा मुलगा असणाऱ्या राहुलचं पुढे काय होतं? बाबांची या नात्याला संमती मिळते का? हे सगळे प्रश्न पुस्तक वाचताना आपोआप मिटून जातात. आपल्या लिखाणातून नवनवे आविष्कार सादर करणाऱ्या रणजित देसाईंनी "प्रतीक्षा" मधेही कमाल केली आहे. इतकी सहज उलगडत जाणारी व जीवनात आपल्या शाश्वत प्रेमाच्या ठिकाणाबद्दल चोख अवलोकन करून देणारी कादंबरी मी तरी वाचली नव्हती. प्रतीक्षा वाचून झाल्यानंतर नकळत कुठेतरी आपल्या आत चालणाऱ्या अनामिक द्वंद्वाची जाणीव आपल्याला होते. छोटेखानी परंतु प्रभावशील अशी ही कादंबरी काळजाचा ठाव घेऊन जाते. प्रतीक्षा वाचून जर का तुमच्या डोळ्यातून दोन थेंब अश्रू ओघळले तर त्याचं श्रेय हे सर्वस्वी लेखकाच्या जादूचं आहे. त्यामुळे तुम्ही प्रतीक्षा वाचून तुम्हाला काय वाटलं ते आम्हाला कळवायला अजिबात विसरू नका.