नाथ हा माझा - कांचन घाणेकर | Nath Ha Maza - Kanchan Ghanekar | Marathi Book Review

नाथ-हा-माझा-कांचन-घाणेकर-Nath-Ha-Maza-Kanchan-Ghanekar-Marathi-Book-Review
पुस्तक नाथ हा माझा लेखिका कांचन घाणेकर
प्रकाशन मेहता पब्लिशिंग हाऊस समीक्षण गिरीश अर्जुन खराबे
पृष्ठसंख्या ३९६मूल्यांकन ४.२ | ५

काही कलाकारांचा जन्म हा रंगभूमीसाठीच झालेला असतो. अभिनयाचं बाळकडू घेऊनच ते या जगात येतात, राज्य करतात आणि कालवश होतात. असाच एक कलंदर नट म्हणजे डॉक्टर काशिनाथ घाणेकर. आताच्या पिढीतल्या बऱ्याचशा लोकांना हे नाव अपरिचित असू शकत परंतु रंगभूमीशी निगडित असणाऱ्यांना मात्र ते जवळून ठाऊक असणार. "रायगडाला जेंव्हा जाग येते" यातली संभाजी राजांची भूमिका असो कि श्री. ना. पेंडसेंच्या "गारंबीचा बापू" मधला अफाट बापू असो कि "अश्रूंची झाली फुले" मधला लाल्या असो या सगळ्या भूमिका रंगमंचावर अक्षरशः जिवंत करण्याचं काम काशिनाथ घाणेकरांनी केलं आहे. हे सगळं त्यांच्या द्वितीय पत्नी कांचन घाणेकर यांनी "नाथ हा माझा" या आत्मचरित्रातून वाचकांसाठी खुलं केलं आहे.

मुळातच स्वैराचारी असणारे डॉक्टर आणि त्यांचा एकंदर नाट्यसृष्टीचा प्रवास या निमित्ताने आपल्यासमोर उलगडला आहे. अनेक मोठमोठ्या विभूतींनीं वेळोवेळी त्यांच्या अभिनय कौशल्याची विविध पत्रांद्वारे दिलेली पोचपावती या पुस्तकातून आपल्याला वाचायला मिळते. भालजी पेंढारकर, वसंत कानिटकर, कवी गिरीश, माई मंगेशकर अशा अनेक दिग्गजांनी त्यांचं अभिनय कौशल्य वाखाणलं आहे. सुलोचना दीदी यांचे आणि घाणेकरांचे निकटचे संबंध आपल्याला यात वाचायला मिळतात. कांचन हि सुलोचना दीदी यांची मुलगी डॉक्टरांच्या  प्रेमात पडते आणि सुरु होते एक विलक्षण प्रेम कहाणी! प्रसिद्धीच्या वलयात आणि तत्कालीन परिस्थितीत ते दोघे कसे एकत्र येतात हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचलेलंच बरं.

कितीही हुरहुन्नरी नट असला तरी त्याच्याही आयुष्यात चढ उतार येत असतात. सतत काम करायची सवय असलेल्या नटाला हातात जर काम नसेल तर तो वेळ घालवणं मोठं जिकिरीचं होऊन बसतं. कुठल्याही नटाच्या आयुष्यात येणारे हे प्रसंग प्रेक्षकांची हाऊसफुल गर्दी खेचणाऱ्या डॉक्टरांच्याही वाट्याला आले. तरीही लाल्या म्हणतो तसं डॉक्टरांचं नाणं खणखणीत वाजत राहिलं. "एकदम कडक!" डॉक्टरांच्या आयुष्यातले अनेक प्रसंग, घटना आपल्याला यात जवळून वाचायला भेटतात आणि नकळत घाणेकरांची जादू आपल्या मनावर राज्य करू लागते. लाखात एकदा तयार होणारा असा कलाकार कांचन घाणेकर आपल्यापुढे सविस्तरपणे उभा करतात. पुस्तक संपता संपता आपणही त्यांचे चाहते कधी होतो हे कळून येत नाही.

सहज सोपी भाषा, सामन्यांच्या जीवनात घडतात तशा प्रसांगातुन उलगडत जाणारा हा चरित्रपट तुम्हाला खिळवून ठेवतो. डॉक्टरांच्या इतक्या जवळच्या व्यक्तीनेच ह्या चरित्र लेखनाचं काम केलेलं असल्यामुळे सूक्ष्मातिसूक्ष्म गोष्टींचा उलगडा यात झाला आहे. "आणि डॉक्टर काशिनाथ घाणेकर" हा सुबोध भावे यांचा चित्रपट पाहून जर तुम्हाला ह्या माणसाबद्दल आणखी जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही हे पुस्तक नक्की वाचून काढा. "आणि डॉक्टर काशिनाथ घाणेकर" असं मुख्य भूमिकेत असूनही चित्रपटांच्या, नाटकांच्या जाहीरांतींवर आवर्जून लिहून घेणारा एकमेव नट या सिनेसृष्टीवर उगवला, आपल्या प्रखर तेजाने त्याने ती उजळून टाकली आणि आपली वेळ येताच तो त्या मंचावरून निघून गेला. आज जरी डॉ आपल्यात नसले तरी त्यांच्या कामाने ते अजरामर झाले आहेत; असं मला वाटतं. तुम्ही हे चरित्र वाचून तुमचं मत आम्हाला कळवा.

-© गिरीश अर्जुन खराबे.

Previous Post Next Post

Contact Form