पुस्तक | क्षत्रियकुळावंत साधू | लेखक | नितीन थोरात |
---|---|---|---|
प्रकाशन | रायटर पब्लिकेशन | समीक्षण | गिरीश अर्जुन खराबे |
पृष्ठसंख्या | ३७६ | मूल्यांकन | ४.५ | ५ |
खरंतर प्रकाश नारायण संत यांचं "वनवास" आपल्या संग्रही असावं म्हणून विकत घ्यायला गेलो होतो आणि तिथेच नितीन थोरात यांचं "क्षत्रियकुळावंत साधू" हे पुस्तक दिसलं. समर्पण पत्रिका वाचली आणि दोन्ही भाग एका क्षणात विकत घेऊन टाकले. महाराज आणि त्यांचा ज्वलंत इतिहास अनेकांना नेहमीच भुरळ घालत आला आहे. वरवर बोलणारे वाचाळवीर सोडता आजही कित्येक जण त्याचा सखोल अभ्यास करण्यात आपलं आयुष्य वेचत आहेत. महाराजांचा कार्यकाळ इतक्या चढ उतारांनी भरलेला आहे की प्रत्येक वळणावर एक ग्रंथ लिहून होईल. शाळेत शिकत असताना “औरंगजेबाच्या हातावर महाराज तुरी देऊन निसटले” एवढ्याशा मथळ्यावर आपली तहान भागवणारे पुस्तक कुठे आणि तत्कालीन कालखंडात तोंडात बोट घालायला लावणारा महाराजांचा हा महापराक्रम कुठे. मुळातच ही सुटका इतकी गुप्त होती की इतिहासालाही त्याचा थांगपत्ता कधी लागला नाही. मात्र महाराजांनी आग्रा ते राजगड प्रवासासाठी वापरलेला मार्ग बऱ्यापैकी अज्ञात असला तरी त्याबद्दल अंदाज लावता येऊ शकतो. त्याचाच आधार घेत इतिहासाला कल्पनाशक्तीची जोड देत नितीन थोरात यांनी “क्षत्रियकुळावंत साधू” ही अफलातून कादंबरी साकारली आहे.
पाच हजार मुघली सैनिकांच्या गराड्यातून सह्याद्रीचा वाघ निसटला आणि आग्रा शहरात एकच धांदल उडाली. पहारा तोडत शिवराय निसटले ते सोबत औरंग्याची झोप घेऊनच. आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर मुघली सैनिकांना गुंगारा देत महाराज मजल दरमजल करत स्वराज्यात दाखल झाले. वाटेत त्यांना सोसव्या लागणाऱ्या अनेक हालअपेष्टांच वर्णन लेखकाने आपल्या कल्पनाविश्वातुन आपल्या समोर मांडल आहे. गुप्तहेरांची साखळी, चोख नियोजन, स्वामीनिष्ठा, स्वराज्यनिष्ठा यांच्या जीवावर महाराजांचा प्रवास सफल झाला. महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनभिज्ञ पैलू या पुस्तकाच्या निमित्ताने आपल्यासमोर लेखकाने मांडले आहेत. त्यासाठी लेखकाने किती गाढ अभ्यास केला असेल याची कल्पना केलेलीच बरी.
मन वेधून घेणार मुखपृष्ठ आणि तितकंच सुंदर लेखन यांनी ही कादंबरी खुलून आली आहे. महाराष्ट्राला साहित्यिक परंपरा लाभल्यापासून इतिहास हा कादंबऱ्यांमधून घराघरात पोहोचत आहे. महाराजांच्या आग्रा सुटकेला ऐतिहासिक पुरावे नसले तरी हे पुस्तक बऱ्याच अंशी त्याच्या जवळ जाण्यात यशस्वी झालं आहे; असं मला वाटतं. हा प्रवास फक्त एकट्या महाराजांचा नसून त्यांच्यासोबत वाट तुडवणाऱ्या, जीवघेण्या प्रसंगांना सामोऱ्या जाणाऱ्या मावळ्यांचा देखील आहे. आपल्या मावळ्यांच्या जीवावर आपण आणि आपलं स्वराज्य निर्धोक असल्याची महाराजांची जाणीव या पुस्तकातून आणखी ठळक झाली आहे. औरंगजेबाचा अस्वस्थपणा, हतबलता आणि मुघल साम्राज्याचं कापलं गेलेलं नाक रेखाटण्यात नितीन थोरात यशस्वी झाले आहेत. मराठी मनाला सुखावणार लेखन त्यांच्या हातून झालेलं आहे, म्हणूनच इतक्या कमी कालावधीत ह्या कादंबरीच्या अनेक प्रति लोकांनी आपल्याशा केल्या आहेत.
प्रत्येकाला वाचायला सोपी जावी अशी भाषा, प्रसंगांचं अचूक वर्णन, काळ उभी करण्याची हाथोटी इत्यादी गुणांमुळे कादंबरी उत्तम रंगली आहे. मराठी वाचकांसाठी काहीतरी उत्तम या निमित्ताने उपलब्ध झालं असून त्याचा आपण आस्वाद घेतला पाहिजे. महाराजांचा झाकोळला गेलेला हा थोर पराक्रम, एकाही माणसाचं रक्त न सांडता औरंगजेबाचा केलेला मानहानीकारक पराभव व शत्रूच्या राजधानीत महाराष्ट्राच्या वाघाने अपमानाला दिलेलं सडेतोड उत्तर याची हि अजरामर कहाणी घराघरात पोहोचली पाहिजे. तेंव्हाच आपल्या पिढ्या समृद्ध होतील नाहीतर कितीही बलाढ्य संख्याबळ असलं तरी जागोजागी मुघली सल्तानीसारखं ते भ्रष्ट विचारांनी पोखरून नष्ट होईल. त्यामुळे आजच तुमची प्रत विकत घ्या आणि या सुंदर कलाकृतीचा आस्वाद घायला सुरवात करा. महाराजांचा प्रवास “क्षत्रियकुळावंत साधू” मध्ये पूर्ण झालाय आता लवकरच शंभूराजांचा प्रवास आपण "साधूपुत्र शंभू" मध्ये वाचू शकतो. तुम्हीही हि पुस्तकं वाचा आणि तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा. जय शिवराय!!