पुस्तक | जातक | कवी | विंदा करंदीकर |
---|---|---|---|
प्रकाशन | पॉप्युलर प्रकाशन | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | २२४ | मूल्यांकन | ४.८ | ५ |
जातक कथा म्हणजे बुद्धांच्या पूर्वजन्मीच्या कथा. विंदांनी हे नाव पुस्तकाला देण्यामागे मला वाटतंय, काही बदलत्या काळाची कविता या संग्रहात आलेली आहे. जातक कथांप्रमाणेच या कविता देखील समाजाची बहुअंगी व्यापकता, समावेशकता आपल्या समोर मांडतात. प्रेम कविता, चरित्र कविता, विरह कविता या सोबतच भावनांचे बदलते विश्व त्यांनी उभे केले आहे. कविता तुम्हाला जीवनाचा आरसा दाखवतात असे म्हणतात, या कविता त्याच प्रकारच्या आहेत. या कविता विचारांचे मोहळ उठवणाऱ्या आहेत.. भावनिक कक्षा रुंदावणाऱ्या आहेत.. अपेक्षांचे परीघ वाढत जाऊन नवी भाषा रुजवणाऱ्या आहेत.
अगदी साधं सरळ मुखपृष्ठ; एक रंगी. आणि त्यातून साधेपणाचा भाव स्पष्ट होतो. परंतू त्यांच्या कविता, दंतकथा सारखी कविता वर्णवाद, गरिबी-श्रीमंती, अंतरराष्ट्रीय स्तरावर चालू राजकीय घटनांवर व अनेक सामाजिक गोष्टींवर भाष्य केले आहे. काही उपदेशकात्मक.. काही अंधश्रद्धेवर मिश्किल भाष्य.. काही गझल.. तर काही सूक्त.. काही अभंग.. तर काही सुंदर वृत्तातील कविता वाचून तुम्ही मंत्रमुग्ध व्हाल.
या काही कविता यांसंग्रहातील मला आवडल्या आहेत, "वेड्यांचे प्रेमगीत, असेल जेव्हा फुलावयाचे, दंतकथा, एकदोन सरी, सुख इतरांएवढे, चंद्र वेडापिसा, बळ, हंडी, शांतिपाठ, मथूआत्ते, दिव्या दिव्या दीपोत्कार, भेट, उगाचफुल, भुतावळ, संसार, हे एकोणचाळीसावे, बकी, कोणी एक, जेव्हा होतो कवीचा जन्म, सुकृतांचे मूळ, सोहळा, ते, भूक, नसते पुन्हा का जन्मणे, अर्धीच रात्र वेडी, हे फुल घे तू साजणे, साठीचा गझल, फाटेल शीड तेव्हा, लागेल जन्मावे पुन्हा, माझ्या घरी मी पाहुणी, घेऊन जा सर्व माझे, वेड माझे सोबतीला, चुकली दिशा तरीही, गजल उपदेशाचा, गझल उपरतिचा, एवढे लक्षात ठेवा, उपयोग काय त्याचा, त्याला तयारी पाहिजे, त्याला इलाज नाही"
दंतकथा- विंदा करंदीकर
असे म्हणतात की, अमेरिकेत एक एकाक्ष कुबेर आहे.
तो वर्षभर मोजीत असतो स्वत:च्या मोटारी
अणि स्वत:च्या अंगावरचे सोनेरी केस; पण त्यापैकी
जास्त कोण हे त्याला अजूनही कळलेले नाही.
असे म्हणतात की, फ्रान्समध्ये एक दारुचा व्यापारी आहे.
त्याने एका वर्षात मिळवलेला नफ़ा मोजण्यासाठी
फ्रेंच सरकारला सात वर्षे लागतात; त्याच्या एकटयाच्या
इन्कमटॅक्समधून फ्रेंच लष्कर एका महायुद्धाचा खर्च भागवते.
असे म्हणतात की, आफ्रिकेमध्ये कांगो नदीच्या प्रवाहाखाली
ब्रिटीशांनी बांधलेले एक मोठे भुयार आहे. त्यांत टाकलेल्या
प्रत्येक काळ्या कवटीचा एका वर्षाने एक मोठा दिस येतो;
पैलू पाडण्यासाठी हे सर्व हिरे अमेरिकेत पाठवले जातात.
असे म्हणतात की, रशियामध्ये एक मोठा तुरुंग आहे.
त्या तुरुंगाला गज नाहीत. "आमच्या तुरुंगाला गज बसवा,
असा अर्ज तिथील बंदीवानांनी सरकारकडे केलेला आहे.
असें म्हणतात की, या सगळ्याच दात नसलेल्या दंतकथा आहेत.
या सर्वच कविता अतिशय लाघवी आहेत. तुम्हाला यातून अनेक गोष्टी शिकायला मिळतील. सर्वांनी हे पुस्तक नक्की विकत घेऊन वाचावं... असं मला वाटतं. विंदांच्या इतरही पुस्तकं शोधायला हवीत. त्यांना गवसलेला लहान मुलांच्या मनातल्या भावनांचा दोरा अनेकांचे बालपण उजळवून जातो. म्हणून विंदा हे कवी म्हणून उच्च आहेत. त्यांच्या कविता मराठी साहित्यातील एक महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणून या तुम्ही वाचाव्यात असे वाटते. तुम्ही आधीच वाचल्या असतील.. याची पारायणं केली असतील तर तुमचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा.
-© अक्षय सतीश गुधाटे.