पुस्तक | धृपद | कवी | विंदा करंदीकर |
---|---|---|---|
प्रकाशन | पॉप्युलर प्रकाशन | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | १२० | मूल्यांकन | ४.४ | ५ |
विंदांच्या कविता हळू हळू बदलू लागल्या म्हणतात, ते याच संग्रहामुळे. कविता प्रेमाकडे वळल्या.. शारीरिक प्रेमाचे देखील अनेक आयाम वेगवेगळ्या विचारातून विंदांनी परखडपणे मांडण्याचा प्रयत्न केला. कवितेला आलेले वळण वैचारिक धाटणीच्या अनुषंगाने आहे. जुनी चौकट मोडून नव्या विषयांची मांडणी करण्यात विंदांना यश आले आहे. मनाला लागलेली मरगळ घालवून त्यातून नवनिर्मितीकडे जाणाऱ्या त्यांच्या कविता, तुम्हाला नेहमीच चकित करतील.
विंदा माझे आवडते कवी असल्यामुळे, आपुसकच त्यांचे सर्वच साहित्य वाचावं असं वाटत आलं आहे. किंबहुना मी एक एक पुस्तक अनेकदा वाचलं आहे. त्यातील नव्याने समजणारे अर्थ, परिस्थितीनुसार बदलणारे आशय समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातूनच विंदांच्या कल्पनाशक्तीची आपल्याला प्रचिती येते. अनुभवांच्या धारेवर त्या कवितांना पैलू पडतात आणि त्यातून आयुष्याचे बहुढंगी आयाम विंदा आपल्या निराळ्या शैलीतून आपल्यासमोर मांडतात.
या काही कविता यांसंग्रहातील मला आवडल्या आहेत, "धैर्य लागते हसावयाला, माझे मला आठवले, विलयाची जर वेळच आली, कृपा, पोसवलेली केळ म्हणाली, मुक्ती मधले मोल हरवले, हात तुझा तो, चिंधी, क्षितिजायितम्, वर्दळवेडी, घेता, नाही ढासळले दार, जाऊ नये तेथे गेलो, पण हे श्रेय तुझेच आहे, झपताल, दादरा, वाजविता वाळा | मिठी घाल, सद्गुरु वाचोनी | सापडेल सोय, आता मला कळ | सोसवेना, आगा माझ्या देवा | साधलीस वेळ, ज्याने केले पुण्य | त्याने केले पाप, विज्ञानाचा द्रोह | हीच माया, आशीर्वाद द्याया | हात उंच, येतसे फाटके | कुल्यावरी, अंधाराची कुस | हुंदक्याने भरे, कारे नाडविसी | आपुल्या मनासी, समर्थांच्या हाती | जन्म मृत्यू, आगा कृपावंता | आवर हे दान, दैत्यांचे या भय | भय देवांचेही".
या कविता तुमच्या आजूबाजूचे वर्तुळ मोडून काढण्यासाठी उपयोगाच्या आहेत. म्हणून हा संग्रह तुम्ही नक्की वाचू शकता. यात काही अभंगाच्या प्रकारातून देखील काही विषय मांडले आहेत. म्हणून पुस्तक वाचताना.. चिंतन करताना.. मनन करताना पुस्तक मनाला भिडते. नक्की वाचावे असे पुस्तक. तुम्ही या कविता ऐकल्या असतील.. वाचल्या असतील.. तर आम्हाला तुमचा विस्तृत अभिप्राय नक्की कळवा!
-© अक्षय सतीश गुधाटे.