पुस्तक | उसने काहा था और अन्य कहानियाँ | लेखक | चंद्रधर शर्मा 'गुलेरी' |
---|---|---|---|
प्रकाशन | शिक्षा भारती पब्लिकेशन | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | ११२ | मूल्यांकन | ५ | ५ |
पुस्तकं कशासाठी लिहिली गेली? कथा कशासाठी लिहिल्या गेल्या? मुख्यतः इतके वेग वेगळे विचार आलेच कसे आणि आले तर ते सगळ्यांनी मांडावेच का? अशा काही अंशी आपण जरी पाहिलं पुस्तक हातात घेतलं असलं तरीही, आपण पुस्तकात अडकतोच. त्यात जर ती एखादी प्रेमकहाणी असली तर मग विचारूच नका. मनात प्रचंड खळबळ निर्माण होते आणि मन उगीच त्यात हिंदोळे घेतं. विचारांवर ताबा रहात नाही. उगीच आठवणींच्या टाचण्या टोचतात आणि पुन्हा विचारांना उधाण.
इतकं सगळं एक पुस्तक वाचून होतं? असा तुम्ही म्हणाल.. पण मी म्हणेल, "हो! होतंच." विश्वास बसत नाही तर तुम्ही हे पुस्तक वाचाच. आधुनिक हिंदी कथांचे जनक.. "चंद्रधर शर्मा 'गुलेरी'" यांचा बहुचर्चित कथासंग्रह.. "उसने कहा था और अन्य कहानियाँ". यात एकूण चोवीस कथा आहेत. पण त्यातल्या पहिल्या पाच कथा अतीशय महत्वाच्या आहेत. इतर कथा एकपानी आहेत. पण त्यांचाही एक विशेष दर्जा आहे. खरी मेख आहे ती मधल्या ३ कथांमध्ये. "सुखमय जीवन", "बुद्धू का कांटा", आणि "उसने काहा था". बाकी दोन कथांमधील प्रेम सफल.. तर "उसने कहा था" मधले अपूर्ण प्रेम देखील तुम्हाला एका पूर्णत्वाकडेच नेते.
असं म्हणतात की समकालीन महान लेखक "प्रेमचंद" यांनी देखील गुलेरी यांच्या लिखाणातून प्रभावित होऊन त्यांची कथा मांडण्याची शैली पुढे नेली. त्यांची भाषा इतकी लोभस आहे की तुम्ही पुन्हा प्रेमात पडता (आधीही पडला असला तर). या कथा मनाला भुरळ घालतात. त्यांची कथा मांडण्याची पद्धत.. गोष्ट उलगडण्याची हातोटी.. तुम्हाला त्या कथेच्या मध्यभागी नेऊन उभं करते.. आणि मग त्यातली एक एक बाजू.. एक एक वस्तू... समजावून सांगते.. तुम्ही भारावून जाता. घटना तुमच्या सानिध्यात घडते.. तुम्ही तिचा अनुभव घेत असता आणि अचानक प्रत्येक वळणावर एक निर्णय घ्यायचा असतो. तिथून कथेला दोन फाटे फुटू शकतात. आता ते तुमच्या हातात आहे की कोणता रस्ता निवडायचा. इतकं सुंदर लिखाण मी आधी पाहिलं नव्हतं. त्या कथा त्यांच्या राहिल्या नाहीत त्या आता आपल्या झाल्या आहेत. माझ्या झाल्या आहेत.
प्रत्येकाने.. पुस्तक आवडणाऱ्याने.. न आवडणाऱ्याने देखील वाचाव्यात अशा त्या तीन कथा आहेत. गुलेरी यांचा तार्किक विचार.. विषयाला धरून असणारी कलाटणी.. आजूबाजूचा निसर्ग त्यात झालेला कथेचा विस्तार. सगळच इतकं सुंदर आहे.. सहज आहे.. परिपूर्ण आहे.. खरं तर गोंडस आहे. प्रेमातील मुला मुलांच्या एक एक बारीक गोष्टी त्यांनी टिपल्या आहेत. चिडवणं.. लाजणं.. बोलणं.. सगळंच त्यांच्या नजरेने टिपलं आहे. आणि एका विशेष शैलीत ते मांडल आहे. उदाहरणादाखल सांगायचं तर..
"उस भिड में ऐसे वेदांती भी पाए जाने लगे, जो दुसरे की जेब को अपनी समझकर रुपये निकाल लेते |"
इथे खरं तर, आपण लिहिल असतं.. "वहां चोर-उच्चके बढने लगे". आणखी एक असाच प्रसंग म्हणजे प्रेम व्यक्त करताना लिहिलेलं त्याचं वाक्य. इथे लेखकाने असंख्य शक्यतांना जागा दिली आहे.
"मेरा कसूर.. मेरा गांवारपन.. मैने क्या कह डा.. डा.. आ... उसका मुंह बंद करने का एक ही उपाय था | रघुनाथ ने वही किया |"
"तेरी कुडमाई हो गई? वह लडकी कुछ आंखे चढाकर 'धत्' केहकर दौड गई |"
अशा सुंदर शैलीमुळेच, हे पुस्तक मला या पुढेही कायम जवळचं वाटतं राहील. मी एकदा वाचून थांबलो नाही तर मी हेच पुस्तक पुन्हा एकदा वाचलं. हीच याची खासियत आहे. मला यात मुळीच शंकाच नाही की तुम्ही देखिल हे पुस्तक शोधून, नक्की वाचाल.