एकदा वाचून तर पहा... भाग २ (व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल)
"एकदा वाचून तर पहा!" या सदरात, आम्ही दुर्मुखलेली परंतू वाखाणण्याजोगी, वाचायलाच हवी.. अशी काही पुस्तकं तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रत्येक महिन्याच्या शेवटी किंवा एखाद्या विशेष दिवसानिमित्त, त्या खास क्षणांचे औचित्य साधून विशेष अशी पाच पुस्तकं आम्ही तुम्हाला सुचवू जी तुमच्या वाचनाची खोली वाढवतील.. जाणिवेचं वर्तुळ विस्तृत करतील.. व नवीन माहिती तुमच्या समोर आणतील.
प्रत्येक पुस्तक सुंदरच असतं, पण हि पुस्तकं विशेष सुंदर आहेत.. तेंव्हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि पुस्तकांची यादी पोहचवा; आणि आपल्या वाचन संस्कृतीच्या चळवळीचा एक भाग व्हा!
प्रेम म्हणजे केवळ दोन हृदयांमधील नाते नसते, तर तो आत्मशोधाचा प्रवास असतो. कधी उत्कट भावना, कधी गूढ आकर्षण, तर कधी निस्वार्थ त्याग... प्रेमाच्या प्रत्येक छटेला सामावून घेतलेल्या या पाच अप्रतिम कथा तुमच्या हृदयाला नक्कीच भिडतील. या व्हॅलेंटाईन डेला, प्रेमाच्या या विविधरंगी छटांमध्ये हरवून जाण्यासाठी ही पाच अनमोल पुस्तके नक्की वाचा व हे खास क्षण साजरे करा! ❤️📚
आजची पुस्तकं...
१. द इंग्लिश टीचर - आर. के. नारायण
२. पहिले प्रेम - वि. स. खांडेकर
३. शाळा - मिलिंद बोकिल
४. बरसात चांदण्याची - सुहास शिरवळकर
५. शितू - गो. नी. दाण्डेकर
कृष्णन आणि त्याच्या पत्नीचे नाते ही प्रेमाच्या विलक्षण व्याप्तीची कथा आहे. जगण्याच्या धकाधकीत, अचानक आलेल्या विरहानंतरही प्रेम कसे टिकते आणि त्याला नवीन अर्थ कसा मिळतो, हे जाणून घ्यायचे असेल तर हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे. प्रेम, विरह, आत्मशोध आणि अध्यात्म या सोबतच प्रेम केवळ सहवासात नसते, तर आठवणींमध्येही ते तितकेच जिवंत राहते, हे या पुस्तकातून प्रखरतेने जाणवते.
पहिले प्रेम म्हणजे आयुष्यातील ती पहिली हळवी जाणीव, जी संपूर्ण आयुष्यभर मनात कोवळ्या आठवणींचा प्रकाश टाकत राहते. तरुण मनाची कोवळी स्पंदने, उत्कट, निष्कलंक व कोमल अवखळ भावनांचे या पुस्तकात सुंदर चित्रण केले आहे. प्रेमाची उत्कटता आणि त्यातले नाजूक क्षण या कादंबरीत विलक्षण संवेदनशीलतेने मांडले आहेत. मनाच्या गाभ्यात कोरला जाणारा हा अनुभव, प्रत्येकाच्या पहिल्या प्रेमाची आठवण ताजी करतो.
किशोरवयात उमलणारे प्रेम हे निरागस, नाजूक आणि तरीही खोल असते. पहिल्या प्रेमाची ओढ, सामाजिक परिस्थितीचे भान, आणि मनातील बंडखोरी अशा अनेक पदरांना स्पर्श करणारी व शाळेच्या आठवणींना नव्याने उजाळा देणारी मिलिंद बोकिल यांची ही कादंबरी आजही तरुणाईला भावते. निष्पाप प्रेमाचा गोडवा आणि त्यातल्या न बोलता उमटणाऱ्या भावनांची ही शाळा मनात घर करून राहते.
प्रेम कधी स्वप्नवत वाटते, तर कधी त्या परीकथेचा शेवट अनपेक्षित असतो. प्रेमाचा हा रहस्यमय आणि भावनिक प्रवास तुम्हाला नक्कीच मोहवून टाकेल. प्रेमातील चांदण्यासारखे चमचमणारे क्षण आणि त्यानंतर राहणाऱ्या आठवणींचा पाऊस हळूहळू तुच्या मनाला भिजवून टाकेल. उत्कट भावना, गूढ धागे आणि मनाला भिडणारे लहान वयातील प्रेम हे या कादंबरीचे वैशिष्ट्य.
प्रेम कधी परंपरांच्या जखड्यात अडकते, तर कधी त्यातून बाहेर पडण्याची उमेद देते. शितूचे मन, तिच्या प्रेमाच्या वाटा, आणि नशिबाच्या फासांमधून उमलणाऱ्या तिच्या भावना या कथेच्या प्रत्येक वळणावर तुमच्या मनाला हलवून सोडतील. प्रेम म्हणजे केवळ आनंद नसतो, त्यात वेदनेची किनारही असते, हे या कथेच्या प्रत्येक ओळीतून जाणवत राहते. शितू व विसूची कथा ही फक्त संघर्षाची नाही, तर ती प्रेमाचीही आहे. खऱ्या, निस्वार्थ प्रेमाची!