पुस्तक | पण लक्षांत कोण घेतो! | लेखक | हरि नारायण आपटे |
---|---|---|---|
प्रकाशन | रिया पब्लिकेशन्स | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | ५६० | मूल्यांकन | ४.८ | ५ |
मराठी ही कीती समृध्द भाषा आहे हे तर आपल्याला माहीत आहेच.. पण हे पुस्तक वाचल्यानंतर त्याची खात्री होईल. आपली भाषा किती लोभस आहे.. गोड आहे.. त्या किती माधुर्य आहे.. हे पुस्तक वाचताना पदोपदी जाणवतं. जुनी मराठी भाषा पुन्हा जनमानसात रुजू व्हावी आणि पुन्हा ते सौंदर्य आपल्याला अनुभवता यावं असं हे पुस्तकं वाचल्यावर माझं मत झालं आहे. "हरि नारायण आपटे" मराठी कादंबरीचे प्रणेते. ज्यांनी मराठी साहित्यात वास्तववादी चरित्रपर कादंबरीचे लिखाण सुरू केले.. वाढवले.. व सर्वांपर्यंत पोहोचवले. त्यांची एकोणिसाव्या शतकातील एक बहुचर्चित कादंबरी म्हणजेच.. "पण लक्षांत कोण घेतो!".
पुस्तकाच्या नावातूनच एका दुर्लक्षित.. उपेक्षित.. वंचितपणाची जाणिव होते, ती पुस्तक वाचताना देखील टिकून राहते. एकोणिसाव्या शतकातील एका मुलीची ही आत्मचरित्रपर कथा. तिच्या मुखाने लेखकाने जुना काळ उभा केला आहे. सुधारणावादी व सनातनी विचारांचे द्वंद्व प्रकट केले आहे. शिक्षणाची गरज.. व्यवस्था यावर भाष्य केले आहे. सोबतच त्या काळात असणारे विविध समाजपैलू.. त्याचे परिणाम आणि त्यात होणारी स्त्रियांची होरपळ, स्वतः पुरुष असून देखील पुरुषप्रधान संस्कृतीत त्या काळात होणाऱ्या गोष्टी पुस्तकातून स्पष्ट केल्या आहेत.
नायिका यमू.. तिचा दादा.. नवरा.. ही जरी पुस्तकाची प्रमुख पात्रं असली.. तरीदेखील आसपासच्या नात्यांना.. त्यातील भावनांना लेखकाने हात घातला आहे. मग ते आई बाबा असो.. सोज्वळ सासू असो.. सुधारणेला मान्य करत प्रगती करणाऱ्या.. लक्ष्मीबाई वा यशोदाबाई असोत. प्रत्येक पात्र वेगळं आहे.. त्रासाने खंगलेली दुर्गी मात्र सगळ्यांच्याच मनात घर करून जाते. स्त्रीपात्रांसोबतच पुरुषपात्र देखील त्याच बहुढंगी पद्धतीची आहेत. महादेवराव.. भाऊ गणपती.. शंकर मामंजी.. गोपाळ मामंजी.. धोंडोभाऊजी.. विष्णुपंत.. नानासाहेब. अशा अनेक विचारांची ही गोष्ट. सर्व प्रकारच्या विचारातून प्रगतीचा विचार पुढे नेण्यासाठी घेतलेल्या वास्तववादी गोष्टींचा आधार या कथेला अजूनच उंचीवर नेऊन ठेवतो.
बालपण.. त्यातल्या गमती जमती.. वयात आलेल्या मुलींची व्यथा.. त्या काळातील हुंड्याची प्रथा.. चालीरीती.. लग्न.. आणि हळू हळू वाढत जाणारा संसार. त्या काळातील शिक्षण त्यातील बारकावे.. इंग्रजीचा बडेजाव.. आणि बरंच काही. असं या पुस्तकातून तुम्हाला मिळतच राहील. लिखाण सुंदर आहेच.. भाषा छान आहेच.. मांडणी उत्तमच आहे, पण कथा मात्र तुम्हाला त्याहूनही जास्ती आवडेल.
कादंबरी मध्ये बहुतेक वेळा गोष्टी पत्रव्यवहारातून पोहोचवल्या आहेत. त्याने या चरित्रात अजूनच रंग चढतो. कोणतीही विशेष घटना घडत नसताना देखील पुस्तक तुम्हाला खिळवून ठेवते.. नव्हे तर तुम्हाला स्वतःचे वाटू लागते. प्रत्येक स्त्रीने ही कथा एकदा तरी वाचावी असे वाटतें. सर्वांच्याच संग्रही असावे असे पुस्तक. यातील मराठी वाचून मात्र मनाला आनंद होतो.. मनाला भुरळ पाडणारे पुस्तक म्हणून मी याचा नेहमीच उल्लेख करेल.