पुस्तक | मुंबई गँगवॉर | लेखक | अजय ताम्हणे |
---|---|---|---|
प्रकाशन | रोहन प्रकाशन | समीक्षण | गिरीश अर्जुन खराबे |
पृष्ठसंख्या | २१२ | मूल्यांकन | ४.२ | ५ |
मायानगरी मुंबई म्हटलं की अनेक गोष्टी आपल्याला आठवतात. मुंबईमध्ये असलेल्या ऐतिहासीक वास्तू, स्थळे यांनी अनेक प्रकारचे काळ आपल्या डोळ्यासमोर घडताना, बिघडताना पाहिलं आहे. मायानगरी मुंबईमध्ये एकेकाळी भाईगिरीचा डंका वाजत होता. गल्लोगल्ली कित्तेक भाई, कित्तेक गँग तयार होत होते, त्यातून मग गँगवॉर सारख्या घटनांनी मुंबई हादरून जात असे. एक वेगळ्या प्रकारची जीवघेणी स्पर्धा मुंबईमध्ये चालत असे आणि त्यातूनच मग निर्माण होत होतं अंडरवर्ल्ड नावाचं भयाण साम्राज्य!
नेमक्या याच विषयाला हात घालत, मुंबईतला हा रक्तरंजित काळ आपल्या डोळयांनी पाहिलेल्या अजय ताम्हणे यांनी पुस्तक स्वरूपात मांडला आहे. "मुंबई गँगवॉर" या पुस्तकात त्यांनी अशा अनेक घटनांचा वेध घेत एक न उलगडलेले सत्य वाचकांसमोर मांडले आहे. मुंबईने भोगलेल्या राक्षसी महत्वकांक्षा, त्यातून निर्माण झालेल्या वैमनस्याची आणि त्याला बांध घालणाऱ्या कर्तृत्ववान पोलीस अधिकाऱ्यांची, राजकारण्यांची ही कथा आहे. हैदर अली, मुनीर यांच्या अवतीभोवती घडणारे हे घटनाक्रम वाचकांच्या मनाचा ठाव घेतात. पैशाच्या अमिषातून तयार झालेले काळे धंदे, शॉर्टकट मारून तो कमविण्याची असलेली लालसा व त्यातून तयार झालेलं स्मगलिंगचं जाळ या पुस्तकातून आपल्याला अनुभवायला मिळतं.
रोहन प्रकाशनने पुढाकार घेऊन ह्या गँगवॉरचा पहिला कालखंड प्रकाशित केला आहे. क्राईम, थ्रिलर वाचण्याची आवड असणाऱ्या वाचकांसाठी ही मोठी पर्वणी आहे. अजय ताम्हणे यांनी आपल्या सुटसुटीत भाषेत हे सगळं मांडल्यामुळे पुस्तक मनात घर करून जातं. लेखक मुंबईतच वाढलेला असल्यामुळे पुस्तकाच्या भाषेलाही त्याचा स्पर्श लाभला आहे. दारू, सोने चांदी, महागडे जिन्नस यांच्या स्मगलिंगने पोखरली गेलेली मुंबई व त्यात भरडला गेलेला सामान्य वर्ग आपल्या डोळ्यासमोर अलगद उभा राहतो.
भाषेचा सहज सोपेपणा हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही जर काहीतरी रोमांचक, थ्रिलर वाचण्याच्या शोधात असाल तर हे पुस्तक तुमची वाट पाहत आहे. कुठल्याही भाईगिरीचा अंत किती दुःखद आणि भयानक असतो तेही तुम्ही या पुस्तकातून वाचू शकता. भाईगिरीमध्ये कोणीही आपला नसतो, कालपर्यंत जो आपला असतो तोच कधीतरी पैशासाठी, सत्तेसाठी आपलीच गेम करू शकतो हे वास्तव तुम्ही यात वाचू शकता. त्यामुळे भाईगिरी आजच्या तरुणाईला कितीही भुरळ घालणारी असली तरी त्याचा विदारक अंत त्यांना योग्य तो संदेश देऊ शकतो. "मुंबई गँगवॉर" हे छोटेखानी पुस्तक तुम्ही सहज एका बैठकीत वाचून काढू शकता. एक वेगळाच थरार तुम्हाला त्यातून अनुभवायला मिळेल त्यामुळे त्वरा करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.