जरीला - भालचंद्र नेमाडे | Jarila - Bhalchandra Nemade | Marathi Book Review

जरीला-भालचंद्र-नेमाडे-Jarila-Bhalchandra-Nemade-Marathi-Book-Review
पुस्तक चांगदेव चतुष्ट्य ३ - जरीला लेखक भालचंद्र नेमाडे
प्रकाशन पॉप्युलर प्रकाशन समीक्षण अक्षय सतीश गुधाटे
पृष्ठसंख्या २८७ मूल्यांकन ४.४ | ५

आता "बिढार" आणि "हूल" नंतर चांगदेव ची कथा पुढे सरकतेय खरी, पण एक नवीन अध्यायच. पुन्हा नविन गाव नवीन सहकारी शिक्षक, नवीन कालचक्र, नवीन तऱ्हा आणि नवीन प्रकारची दुःख घेऊन उभं ठाकलेलं नवीन आयुष्य. "चांगदेव चतुष्ट्य" पुस्तक मालिकेतला हा तिसरा भाग. पहिल्या भागात मुंबईतील शिक्षण.. आणि साहित्याची आवड तयार झाली. पुढच्या भागात शिक्षकाची नोकरी व त्यात स्वतःला गुंतवून घेण्याचा प्रयत्न झाला. आणि त्याच सोबत हळू हळू मनातील प्रेम भावना जाग्या झाल्या. पारू आणि तिच्या सोबतच्या काही कडू गोड आठवणी. आणि आता ते सोडून नवीन गाव.

तिथल्या कंटाळवाण्या जगाला सोडून चांगदेव नवीन गावात नवीन सुर शोधत येतो खरा. पण त्यात होणारी त्याची होरपळ इथे लेखकाने मांडली आहे. जातीयवादी संस्था, त्याचा प्रभाव.. यातून त्याला सहन करावे लागणारे बोचरे शब्द व वेगळी वागणूक यातून एक पुन्हा नकारात्मक उर्जाच तयार होते. कुठेही स्थिरता नाही. तिथेही अनेक नवीन प्रश्न. जीवनापासून ते झोपण्यापर्यंत. त्यातून जुन्या प्रेमाची आठवण. पारू आपला विचार करत असेल का? याने होणारा त्रास.. अशातच वाढलेला एकटेपणा आता नायकाला स्वतःच्या लग्नाचा विचार करायला भाग पाडतो.

नेमाडे यांची भाषा व त्यावरचे प्रभुत्व प्रचंड आहे. पण या पुस्तकात.. कळत नकळतपणे अनेक जातीयवादी गोष्टींवर भाष्य असल्याने पुस्तक काही अंशी रटाळ वाटू लागते. काही संवाद विचित्र वाटतात. हळू हळू निराशेच्या गर्तेत सापडलेल्या नायकाला भेटलेले बरे वाईट सोबती. नवीन खोलीतील नवीन मित्र "कोळी". आत्ताच लग्न झालेलं जोडपं. आणि पुन्हा लग्नासाठी केलेली धडपड पुन्हा पुस्तकाचे आकर्षण खेचून आणते.

या पुस्तकाबद्दल लिहिताना मी अगदी साशंक आहे. हे तुम्हाला आवडू देखील शकते किंवा बिलकूल आवडणारच नाही. चांगदेव चा कथेचा विचार केला तर पुढच्या प्रवासाला आता तो सज्ज झालं आहे. नवीन ठिकाण त्याने पुन्हा शोधलं आहे. मनातले कोलाहल शांत झाले आहे. पुढच्या पुस्तकात काय? ही उत्सुकता देखील तयार झाली आहे. पण तुम्ही पुढे वाचताल की नाही.. किंवा मध्यातच तुम्हाला नकोसे देखील वाटू शकते. एका वेगळ्या आणि हटके विचारांसाठी हे पुस्तक वाचू शकता. पण तुम्हाला जर काही गोष्टी पुस्तकातून सोडून देऊ वाटल्या तरी दुर्लक्ष करून आपण चांगदेवच्या कथेचा आधार घेऊन पुढे डोकवू शकतो. तुम्ही हे पुस्तक वाचले असेल तर तुमचे मत आम्हाला नक्की कळवा!

-© अक्षय सतीश गुधाटे.

Previous Post Next Post

Contact Form