पुस्तक | हाच माझा मार्ग | लेखक | सचिन पिळगांवकर |
---|---|---|---|
प्रकाशन | मेहता पब्लिशिंग हाऊस | समीक्षण | गिरीश अर्जुन खराबे |
पृष्ठसंख्या | ३१२ | मूल्यांकन | ४.७ | ५ |
माणूस मोठं कि माणसाचं काम? असा प्रश्न जर कधी पडला तर तुमच्या लक्षात येईल कि कामामुळे मोठा झालेला माणूस हाच या जगात चिरकाल टिकू शकतो. ज्याला आपल्या कामातून बोलता येतं तो माणूस नक्कीच मोठा होतो. असाच एक माणूस आजही आपल्यात आहे आणि त्याच्या प्रत्येक कामातून तो ते आपल्याला दाखवून देत असतो. लोकांनी त्याला त्याच्या कामामुळे सुपरस्टार, महागुरू, ट्रेंड सेंटर सारखा अभिजात दर्जा दिला. नव्वदच्या दशकात जन्मलेल्या सगळ्यांना सचिन हे नाव ऐकल्यावर तेंडुलकर ऐवजी पिळगावकर डोळ्यासमोर येतं इतकं प्रचंड काम या माणसाने कलाक्षेत्रात केलेलं आहे. कित्येक काळ सचिनचं आडनाव पिळगाववकर आहे हे कित्येक लोकांना ठाऊक नव्हतं मात्र सुप्रियाशी लग्न झाल्यानंतर ते खऱ्या अर्थाने प्रचलित झालं. याच श्रेय खुल्या मनाने सचिन सुप्रियाला देतो, मात्र सचिनचं खरं आडनाव हे राजाध्यक्ष असून पिळगावचा असल्यामुळे पिळगावकर नाव त्याच्या वडिलांनी आणि त्याने लावलं. बालकलाकार म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा आणि चाचा नेहरूंच्या मांडीवर बसणारा सचिन पहिलाच माणूस असावा. वयाची पन्नाशी न गाठू शकणारे कितीतरी लोकं तुम्ही पहिले असतील मात्र सिनेसृष्टीत पन्नाशी गाठणारा माणूस सचिनच! एका सचिनने कसोटीमध्ये शतकांची पन्नाशी गाठली तर दुसऱ्याने सिनेसृष्टीत. तसं बघायला गेलं तर दोन्हीही दीर्घकाळ चालणारे आणि खऱ्या अर्थाने कसोटी पाहणारे सामने आहेत; मात्र दोघेही त्याला पुरून उरले आहेत. तुम्हाला वाटेल कि सचिन पिळगावकर बद्दल इतकी माहिती गूगलला सहज मिळत असेल; ते खरंही आहे कारण सचिनची गुगलने दखल घेण्याइतपत त्यांच काम नक्कीच मोठं आहे. परंतु तरीही सचिनच्या अंतरंगात डोकावत तुम्हाला आणखी माहिती जाणून घ्यायची व खूप काही शिकण्याची इच्छा असेल तर तुम्ही "हाच माझा मार्ग" हे पुस्तक नक्कीच हातात घेतलं पाहिजे.
सचिन पिळगाववकर या अवलियाने कोणकोणत्या माणसांसोबत काम केलं आहे याची तसूभर कल्पना देखील आजच्या पिढीला नसेल असं मला वाटतं आणि यातून ह्या पिढीला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नाही. मात्र "हाच माझा मार्ग" वाचल्यावर हे तुमच्या नक्की लक्षात येईल कि मला काय म्हणायचं आहे. कोणी स्वप्नातही मिळवू/करू शकत नाही अशा कित्येक असाध्य गोष्टी सचिनने केल्या आहेत. मग त्यात श्रेष्टप्रतीच्या व्यक्तिमत्वांसोबत वेळ घालवणं असो कि आपल्या मार्गदर्शनाखाली अशा व्यक्ती घडवणं असो! काही माणसांचा जन्म हा ठराविक गोष्टींसाठीच झालेला असतो; ईश्वराने विशिष्ट उद्देशाने त्यांना या पृथ्वीवर धाडलेलं असतं. सचिन पिळगावकर हा असाच एक अवलिया आहे; ज्याचा जन्म सिनेसृष्टीसाठी झाला आणि त्याने तो सार्थही केला. लेखक, निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता, संगीतकार अशा सगळ्याच प्रांगणात त्याने मजबूत ठसा उमटवला आहे. अर्थात ह्या सगळ्यासाठी लागणारं प्रचंड सामर्थ्य त्याच्या अंगी होतं. कष्ट, जिद्द, जिज्ञासा यांच्या जीवावर सचिन या बेभरवशाच्या सिनेसृष्टीत आला, गाजला आणि जिंकलादेखील!
अतोनात विश्वासाच्या जोरावर सचिनने खूप गोष्टी साध्य केल्या आहेत. इतकं काम करूनही म्हणावं असं आर्थिक स्थैर्य लाभायला त्याला खूप काळ गेला. त्याची अनेक कारणं आहेत, ती तुम्हाला पुस्तक वाचल्यावर लक्षात येतीलच. मात्र सचिन माणूस म्हणून किती ग्रेट आहे हेदेखील तुमच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. आपल्या या आत्मकथेत अनेक गोष्टी सचिनने विस्तारित रूपात मांडल्या आहेत; त्याला आलेले चांगले वाईट अनुभव आणि त्यातून घडत गेलेला प्रवास नकळत आपल्यालाही अनेक गोष्टी शिकवून जातो. "कलाकार असण्याआधी आपण माणूस आहोत" हि सचिनची धारणा आपल्यालाही लागू होते. आपण आपल्या क्षेत्रात कितीही मोठे असलो तरी आपण सगळ्यात आधी माणूस आहोत त्यामुळे माणुसकीला आपण प्राधान्य द्यायला पाहिजे. लतादी, पंचमदा, रफीसाहेब, मजरुह साहेब, साहिर लुधियानवी, संजीवकुमार, मीनाकुमारी, अमिताभ बच्चन, अशोक सराफ, सोनू निगम अशा एक ना अनेक दिग्गजांसोबत सचिनने घालवलेले क्षण आपल्याला यात वाचायला मिळतात आणि नकळत आपल्या ज्ञानकक्षा विस्तारत जातात. सचिनने घडवलेल्या अनेक अफलातून सिनेमांच्या, पडद्यामागच्या गोष्टी आपल्याला यात वाचायला मिळतात. इतकं सगळं वाचल्यानंतर त्यांच्या एका चाहत्याप्रमाणे माझ्याही मनात हे आल्याशिवाय राहत नाही,
"निवृत्त होण्याचा अधिकार फक्त तेंडुलकरांच्या सचिनला आहे, पिळगावकरांच्या नाही."
हे पुस्तक वाचल्यानंतर अनेक गोष्टी मला शिकायला मिळाल्या. सचिनचं आत्मपरीक्षण करण्याचं कौशल्य आपण सगळ्यांनी शिकण्यासारखं आहे. एकंदर पुस्तक छान जमून आलं आहे. बऱ्याचदा अशा पुस्तकांतून काहीतरी चमचमीत, मसालेदार वाचायला मिळेल अशी अपेक्षा वाचकांना असते. मात्र तुम्ही कुठल्याही वयाच्या माणसाला हे पुस्तक वाचायला द्या, त्याच्यासाठी काहीनाकाही या पुस्तकात नक्कीच आहे. मध्ये मध्ये वाचायला मिळणाऱ्या सचिनच्या उर्दू शायरी म्हणजे एक मेजवानीच आहे. सचिनचं उर्दूच असलेलं अफाट ज्ञान आणि त्यातून घडणारे अफलातून किस्से वाचताना मजा येते. Larger than life अशी बिरुदावली मिरवणारे अनेक आहेत; मात्र त्याला खऱ्या अर्थाने जगणारा माणूस म्हणजे सचिन! पुस्तकाबद्दल जितकं लिहावं तितकं कमी आहे आणि मी हे कुठल्याही प्रसिद्धी देण्याच्या भावनेतून लिहीत नाही. मला पुस्तक वाचल्यावर जे जाणवलं ते प्रामाणिकपणे मांडण्याचा हा एक छोटा प्रयत्न आहे. सचिन हा खूप मोठा माणूस आहे त्याबद्दल आपण काय बोलणार, लिहिणार? पुस्तकाबद्दल लिहिताना सचिनचा एकेरी उल्लेख क्रमप्राप्त होता म्हणून केला आहे अन्यथा त्यांच्याबद्दल नितांत आदराची भावना आमच्या मनात आहे, असेल आणि राहील. एकेरी उल्लेखातून त्यांच्याशी लवकर जवळीक तयार होते म्हणून आणि एक चाहता म्हणून मिळालेला तो हक्क आहे, असं मला वाटतं. बाकी हे पुस्तक वाचून तुम्ही तुमचं मत ठरवा आणि आम्हाला प्रतिक्रियेद्वारे नक्की कळवा.