पुस्तक | अंगारिका | लेखक | नारायण धारप |
---|---|---|---|
प्रकाशन | रोहन प्रकाशन | समीक्षण | गिरीश अर्जुन खराबे |
पृष्ठसंख्या | १२६ | मूल्यांकन | ४.२ | ५ |
अंगारिका हा नारायण धारप यांचा आणखी एक गूढ कथासंग्रह. खरंतर यात दोन दीर्घकथा आहेत ज्यातून एक मानसिक छळाची व दुसरी काळाच्या वळणापलिकडच्या प्रीतीची कथा आपल्या भेटीला येतात! अंगारिका ही धनाच्या लोभापायी मानसिक छळ करून आपल्याच पत्नीची केलेल्या हत्येची कथा असून सरस्वती ही काळाच्या पोतडीतून बाहेर पडलेली उत्कट प्रितीची कथा आहे. अशा या दोन्ही परस्पर विरोधी भावनांनी हे पुस्तक साकारले आहे. नारायण धारप यांच्या कल्पना विलासातून ते वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम रोहन प्रकाशनमार्फत झालं आहे.
आपला पिढ्यानपिढ्या गहाण पडलेला वाडा निवृत्तीनंतर सावकार असलेल्या एका डॉक्टरकडून यशवंतराव विकत घेतात. अपेक्षेपेक्षा अगदी सहज त्या वाड्याचा ताबा त्यांना भेटतो आणि कथानकाला सुरवात होते. एक एक करत गुढतेची कडी त्यांच्या हाती लागते. उमाबाईंवर झालेला अन्याय, त्यांच्या धनापायी झालेला छळ आणि हत्या. त्यातून त्यांचा वाड्यात होत असणारा वावर, थरारक भास यांनी ही कथा वाचकांना गांगारून सोडते. खरंच असं काही घडलं असेल का? डॉक्टर नागराणी यांनी अमानवतेच्या थराला जाऊन हे सगळं घडवलं असेल का? मग यातून आता मार्ग काय? वाडा ह्या सगळ्यातून सुटून यशवंतरावांना आणि कुटुंबाला मोकळा श्वास घेऊन देणार का? हे सर्व जाणून घेण्यासाठी एकदा अंगारिका वाचून बघा. तुमच्या अंगावर शहारा आल्याशिवाय राहणार नाही.
अंगारिका मधल्या भयाने जरा सावरताच नारायण धारप आपल्याला एका विलक्षण कथेकडे घेऊन जातात. सरस्वती वाचताना त्यांच्या कल्पना विश्वाला सलाम करावासा वाटतो. अगदी तीन पात्रांत आणि एका जागेत ही सगळी कथा घडते मात्र त्याचा प्रभाव वाचकाच्या मनात दीर्घकाळ राहतो. अगदीच भीती वाटावी असं त्यात काही नाही मात्र कथेचा विषयचं असा आहे की त्याचं गारूड तुमच्या मनावर बसणारच. सरस्वती आणि शशिकांत यांचा पत्रव्यवहार वाचाण्यालायक आहे. दोनशे वर्षांचा कालौघ पार करून आपल्या भावनांची देवाणघेवाण दोघं करतात. त्यातून शशिकांतच जीवन एक वेगळं वळण घेतं आणि एक चांगला माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा त्याला मिळते. तर अशा या दोन्ही कथा वाचकाला वेगवेगळया प्रतीचं समाधान देतात एवढं मात्र नक्की.
आपल्या शब्दांच्या जोरावर नारायण धारपांनी दोन्हीही कथांना योग्य ते बळ दिलं आहे. विषय वेगळे असूनदेखील वाचकांच्या मनाला हलकेच धक्का देण्याचं काम त्यांनी कसोशीने केलं आहे. भयप्रद कथा असल्या तरी त्याने तुमचं मनोबल हलत नाही उलट समाधानच तुमच्या वाट्याला येईल असं मला वाटतं. त्यामुळे या कथांचा आस्वाद घेण्यासाठी रोहन प्रकाशनने आणलेला हा तीन पुस्तकांचा संच तुम्ही विकत घेऊ शकता किंवा भेटही देऊ शकता. चंद्राची सावली, अंगारिका आणि साठे फायकस अशी तीन पुस्तकं त्यात तुम्हाला भेटतील. अंगारिका तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही प्रतिक्रियेद्वारा आम्हाला कळवाल अशी अपेक्षा करतो.