पुस्तक | आगंतुक | लेखक | विवेक वैद्य |
---|---|---|---|
प्रकाशन | विश्वकर्मा पब्लिकेशन | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | १७८ | मूल्यांकन | ४.१ | ५ |
प्रत्येकाशी असणारं आपलं नातं हे वेगळं असतं. त्यामागे अनेक कारणं असतात. काही परिस्थिति संबंधित.. काही पैशा संबंधित.. काही वैचारिक पातळीवर जुळणाऱ्या मतांमुळे.. तर काही न जुळणाऱ्या. जेव्हा जेव्हा जगात मोठी महामारी येते तेव्हा फक्त शारीरिक स्वास्थ्य बिघडत नाही.. तर मानसिक आरोग्यावर देखील त्याचा परिणाम होतो. आपल्या नात्यावर त्याचा परिणाम होतो. अशीच एक महामारी म्हणजे "कोविड-१९". हळू हळू माणसाच्या बिघडणाऱ्या शरीरासोबतच, संसर्गजन्य रोग असल्यामुळे एकमेकांपासून विशेष दूरी ठेऊन राहावं लागणार आहे, याचा मनावर होणारा आघात व सोबतच अचानक एकत्र रहावं लागण्यामुळे माणसाच्या नात्यांवर होणारे परिणाम यातून कळत नकळत व्यक्त होणाऱ्या भावना या पुस्तकाचा गाभा आहे.
"विवेक वैद्य" लिखित "आगंतुक" या कथा संग्रहात कोविड काळातील कथा आहेत. नात्यांवर आधारित.. भावनांशी संलग्न.. नव्या-जुन्या विचारांचा मेळ घालू पाहणाऱ्या दहा विशेष कथा. कुटुंबात होणारे बदल.. एकटेपणामुळे.. एकत्रित राहण्यामुळे.. यातून तयार होणाऱ्या वेगवेगळ्या परिस्थितींचा वेध लेखकाने घेतला आहे. आपल्या साध्या, सोप्या व तरुणाईच्या भाषेत हे लिखाण आहे. प्रत्येक बदलाची एक गोष्ट झाली आहे. नैतिक अनैतिक विचारांच्या पलीकडे घेऊन जाणाऱ्या या कथा, जाती धर्माच्या पलीकडच्या कथा, चांगलं वाईटाच्या पलीकडल्या कथा, तुम्हाला एक नवीन दृष्टिकोन देतील.
या संग्रहातील प्रत्येक कथा हि कोविडशी निगडित आहे. कुठे बाप मुलीचं नातं आहे.. तर कुठे एका गरीब कुटुंबातील प्रेमी युगुलाचं. कुठे आईच्या पूर्वायुष्यातील प्रेमाची आठवण आहे.. तर कुठे या महामारीला एक हास्यास्पद नजरेने पाहणाऱ्या रुग्णाची कथा. अचानक, पण अनोळखी व्यक्तीसोबत राहावं लागल्यामुळे होणारे राहणीमानातील बदल आहेत.. तर त्याचमुळे सुरळीत झालेली विचारसरणी देखील लेखकाने उत्कृष्टपणे मांडली आहे.
बहुढंगी कथांचा तुम्हाला आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य हे पुस्तक तुम्ही वाचा. कुठेही प्रवासात.. रोज संध्याकाळी झोपताना, ऑफिसच्या कामात व्यस्त असताना, मध्येच थोडा मोकळा श्वास घेण्यासाठी या कथा उत्तम आहेत. या तुमच्या मनाला हलकं करतील आणि तुमच्या कोविड काळातील आठवणींना उजाळा देतील. तुमचा व इतरांचा कोविड काळ यातील फरक देखील तुम्हाला अनुभवायला मिळेल. नक्की वाचावं असं पुस्तक.