पुस्तक | या सम हा! [ऑडिओ बुक] | लेखक | प्रसाद नामजोशी | सचिन खेडेकर |
---|---|---|---|
प्रकाशन | स्टोरीटेल | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
वाचनवेळ | २ तास, ३२ मिनिटे | मूल्यांकन | ४.५ | ५ |
झालेत बहु, आहेत बहु, होतील बहु, परंतू.. या सम हा!
मोरोपंतांनी ही आर्या आपल्या सगळ्यांचे लाडके "पु. ल." यांच्यासाठीच लिहिली गेली असेल असच वाटतं. पुस्तकाचं नावही यावरूनच ठेवण्यात आलं आहे. मराठी माणसाला पु.ल. नवीन नाहीत. पण अनेकांना त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात आणि त्यांच्या जीवनातील बरेच खाच खळगे माहीत नसतात. आपल्याला त्यांचे शब्द ना शब्द पाठ असतात. पण त्यामागचा संदर्भ काहीसा माहीत नसतो. त्यासाठीच हे पुस्तक तयार करण्यात आलं आहे.
सचिन खेडेकर यांचा आवाज, त्यांची वाचन शैली अगदीच मनास भुरळ घालणारी आहे. म्हणजे आपलं आवडतं व्यक्तिमत्त्व आपल्या आजुन एका आवडत्या व्यक्तीच्या आवाजात ऐकायचं म्हणजे, दुग्ध शर्करा योगच! पुस्तकाचं लिखाणही अगदीच सुंदर झालं आहे. अनेकांना अपरिचित असणारे पु.ल. लोकांसमोर यायला हवेत या हेतूने हे पुस्तक लिहिलं गेलं आहे, आणि लेखकाचे खूप आभार मानायला हवे की आपल्याला माहीत नसणाऱ्या अनेक संबंधित गोष्टींचा संग्रह लेखकाने आपल्यासाठी करून ठेवला आहे.
पु.ल. यांचा संबंध प्रवास अगदीं जन्मापासून ते शेवटच्या घटापर्यंतचा प्रवास. पु.ल. यांचं लिखाण त्या मागील हेतू, सारांश आणि संदर्भ या सगळ्यांचा एक मेळ या पुस्तकांत आहे. त्यांचे वेगवेगळे पैलू, अनुभव या पुस्तकात बारकाईने टिपलेले दिसतात.
पु.ल. वरचा हा अगदी छोटासा बोलपट आहे अस आपण म्हणू शकतो. त्यांचा जीवनप्रवास, त्यांच्या पुस्तकांची माहिती खूप सुंदर इथे सांगण्यात आली आहे. यातून अनेक प्रकारे पु.ल. नी आपल्यासाठी रंगवलेली मैफिल दिसून येते. त्यांनी आयुष्यभर मानवजातीला फक्त आणि फक्त आनंदच दिला आहे. म्हणूनच "पृथ्वीवर स्वर्ग स्थापन करणारा माणूस", असा त्यांच्यावरच्या एका कवितेत बा. भ. बोरकर म्हणतात ते काही खोटं नाही.
आवर्जून ऐकावी अशी गोष्ट आहे. त्यातून मला आवडले ते म्हणजे पु.ल. यांच्या तिन्ही प्रवास वर्णनांच्या मागील दृष्टिकोन उल्गण्याचा प्रयत्न. त्याने प्रत्येकाला पुलंचे एक नवीन आणि सुदृढ मानसिकतेचे उदाहरण दिसून येते. तुम्हालाही आवडेल नक्की ऐका.