वनवास - प्रकाश नारायण संत | Vanvas - Prakash Narayan Sant | Marathi Book Review

वनवास-प्रकाश-नारायण-संत-Vanvas-Prakash-Narayan-Sant-Marathi-Book-Review
पुस्तक वनवास लेखक प्रकाश नारायण संत
प्रकाशन मौज प्रकाशन गृह समीक्षण गिरीश अर्जुन खराबे
पृष्ठसंख्या १८२मूल्यांकन ४.९ | ५

वनवास असं काहीसं पुस्तकाचं नाव वाचलं आणि थोडा संभ्रमातच पडलो कि नक्की हे पुस्तक आहे तरी कशावर? रामाला घडलेला वनवास इतकाच काय तो या शब्दाचा अर्थ आजवर माहीत होता. परंतु त्याचा वेगळा काही अर्थ असेल असा कधी विचार केला नव्हता. खरंतर त्याचा वेगळा असा अर्थ नाहीच आहे पण तो एका वेगळ्या अनुषंगाने विचारात घेतला जाऊ शकतो; याची जाणीव हे पुस्तक वाचल्यावर झाली. प्रकाश नारायण संत यांचं "वनवास" हा खरंतर कथासंग्रह आहे परंतु ह्या सगळ्या कथा एकाच विषयाला धरून आणि एका मुलाच्या बालविश्वातून लिहिल्या गेल्या आहेत. त्यामुळे काहीसं कादंबरीवजा वलय त्याला प्राप्त झालं आहे; असं मला वाटतं. बाल्यावस्थेमधून पौंगंडावस्थेत जाणाऱ्या लंपनच्या नजरेतून वेगवेगळ्या गोष्टींकडे पाहणाऱ्या ह्या कथा आपल्याला बालपणात घेऊन जातात. प्रकाश नारायण संत यांनी आपल्या अमोघ लिखाणातून आणि अस्सल बेळगावी मराठी भाषेतून या कथांना जिवंत केलं आहे.

आपल्या आजी आजोबांसोबत राहणारा लंपन आणि त्याचे विश्व यांचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. लंपनचे घर, शाळा, माडीवरची खोली, गुंडीमठचा रोड, मित्र, सुमी हे सगळे आपलेसे वाटू लागतात. प्रत्येक गोष्टींमधले बारकावे टिपण्यात लेखकाने कमाल केली आहे. एकूण तेरा कथा या पुस्तकांत आहेत त्या तेराही कथांना वैयक्तिक असा विषय असला तरी तो लंपनशी निगडित आहे. काही कथा ह्या आपल्या डोळ्यात टचकन पाणी आणतात तर काही आपल्याला एक सुखद आनंद देऊन जातात. ओझं, फुलाची गोष्ट, आदम, मैत्री, चक्र या कथा आपल्यातल्या अनेक भावनांना साद घालतात. कधी त्या गहिवरून टाकतात, तर कधी आपल्या मनात प्रेमाचे अंकुर फुलवतात. लंपनच्या मनात चाललेल्या अनेक गोष्टी नकळत आपल्याही मनात रुंजी घालू लागतात. शाळा, शाळेलतल्या गमतीजमती, सहली, क्रिकेटच्या मॅचेस आणि त्यात होणारी भांडणं यांनी लंपन आपल्याला लहानपणात घेऊन जातो. लंप्याने जगलेल्या अनेक गोष्टी आपल्याही आयुष्यात घडून गेलेल्या असतात पण लंप्या सारखं मॅडपणे त्या सगळ्याकडे पाहण्याची शक्ती आपल्याकडे नाही. म्हणूनच कि काय लंप्याचं जग काहीसं वेगळं आहे आणि राहील.

शर्यत आणि समज या मला आवडलेल्या कथा आहेत कारण त्यांत लंप्या पौगंडावस्थेच्या उंबऱ्यावर उभा आहे. म्हणावी इतकी समज अजून त्याला आलेली नाही. सुमी जवळ असली कि पोटात कसंतरी होतं आणि सोनटक्क्याचा वास आपल्याला येत राहतो, एवढंच त्याला जाणवत असतं. मला वाटत हि भावना सगळयांनाच कधी ना कधी नक्कीच जाणवली असेल. मिलिंद बोकील यांच्या शाळा कादंबरीनंतर जर दुसरं कोणतं पुस्तक आपल्या या भावविश्वाला हात  घालत असेल तर ते म्हणजे "वनवास". तारुण्यात प्रवेश करताना आपण बालपणापासून कायमचे दूर होतो हे आपल्याला जाणवत नाही, मात्र जेंव्हा एका टप्प्यावर त्याची जाणीव आपल्याला होते; तेंव्हा जाणवतो तो हा वनवास!

कुठल्याही कथेपासून तुम्ही वाचायची सुरवात करू शकता. आणि लंप्याच्या भाषेत सांगायचं झालंच तर "एकशे त्र्यैन्शी वेळा मॅडसारख्या जरी वाचल्या तरी ह्या कथा आपल्याला तोच आनंद देत राहतात". खरंतर कंपनीच्या ग्रंथालयातून हाती आलेलं हे पुस्तक वाचून काढल्यानंतर ते विकत घेऊन संग्रही ठेवण्याची तीव्र इच्छा उत्पन्न झाली आहे. बेळगावी मराठी भाषेचा अवीट गोडवा तुम्हाला या पुस्तकातून अनुभवायला मिळेल. काळाच्या पडद्याआड गेलेले अनेक क्षण तुम्हाला लंप्याच्या निमित्ताने आठवतील. शाळा वाचल्यावर जी सुखद उदास भावना मनात घर करून राहते तशीच काहीशी अवस्था वनवासने झाल्याचं मला तरी जाणवलं आहे. तर तुम्हीही ह्या अप्रतिम लेखनाचे, अनुभूतीचे साक्षीदार व्हा आणि वनवास वाचून काढा. तुमच्या मनातील भावनाकल्लोळ प्रतिक्रियांद्वारे आम्हाला कळवायला मॅडसारखे (लंप्याच्या भाषेत) विसरू नका.

-© गिरीश अर्जुन खराबे.

Previous Post Next Post

Contact Form