पुस्तक | वामन परत न आला | लेखक | जयंत नारळीकर |
---|---|---|---|
प्रकाशन | मौज प्रकाशन गृह | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | १३३ | मूल्यांकन | ४.४ | ५ |
मराठी भाषा ही सर्व प्रकारे समृध्द आहे, यालाच एक पूरक अशी पावती देत एक अत्यंत हुशार आणि नावाजलेले वैज्ञानिक जयंत विष्णू नारळीकर यांनी मराठी भाषेला दिलेली काल्पनिक आणि विज्ञानासंबंधीची पुस्तके वाचणे म्हणजे दुग्धशर्करा योगच. त्यांच्या या कामाचे मोल मराठी साहित्यात खूप अधिक आहे. मराठी साहित्यात अनेक प्रकार मजबूत पणे हाताळले गेले आहेत, त्यात विज्ञान आधारित लिखाण जरा कमीच.. पण ती कमी आपल्या मुक्त हाताने आणि विशिष्ट शैलीने डॉ. नारळीकर यांनी खऱ्या अर्थाने भरून काढली असं म्हणता येईल.
पुस्तक काल्पनिक असल्यामुळे त्याचा आणि त्यातील पात्रांचा मेळ, हा आजच्या वास्तववादी जगाशी मिळता जुळता असणे हा एक मोठा प्रश्न असतो, पण नारळीकरांनी मात्र त्यातील साऱ्या विविध गोष्टींची काळजी घेऊन हे काम उल्लेखनीय आणि उच्चप्रतीने पूर्ण केले आहे असं म्हणावं वाटतं. वामन हे नाव.. त्याचा पौराणिक वारसा.. आणि समकालीन काल्पनिक घटनांशी त्याचा असणारा दुआ.. या पुस्तकात अगदी सुंदररित्या गुंफण्याचा प्रयत्न केला आहे.
एकंदर बदलत्या कृत्रिम जगात वावरत असतानाची ही गोष्ट आहे. त्यातच मानवजातीच्या वाढत्या आशा-अपेक्षा. आणि त्यातच वावरत असताना एक कृत्रिम रोबोट ही गोष्ट पुढे नेतो. रोबोट सोबत पुढे जाणारी गोष्ट अनेक वळणं घेत पुस्तकातील अनेक रहस्य उलघडत जाते. त्याचसोबत त्यातली मजाही हळू हळू वाढत जाते. वाढत्या कृत्रिमतेचा भाव, आभाव, परिणाम, दुष्परिणाम या साऱ्यांनी तयार केलेले कुतूहल नक्कीच पुस्तकात गुंतवून ठेवते. विज्ञानाचा पाया आधीच भक्कम असल्यामुळे यातील अनेक गोष्टी काल्पनिक असूनदेखील खऱ्या असल्याचा भाव देऊन जातात, त्यातील विनोदवादी विरंगुळा देखील कायम राहतो. यामुळेच या पुस्तकातील "थोडं अजून काहीतरी" ची मजा टिकून राहते.
मराठी भाषेतील हा एक वेगळा लिखाण प्रकार हाताळताना लेखकाची लेखणी वेगळी छाप सोडून जाते. नारळीकरांणी हाताळलेल्या पात्रांवर मानवाच्या स्वभावाचा तर छाप आहेच परंतु, विज्ञानयुगात घडू शकतात अशा विविध घटांनाचा, एक नकळत आणि अनपेक्षित असा प्रभाव आपल्याला मोहून टाकेल यात शंका नाही. हे सारं एका पुस्तकात जुळवून आणणं आणि त्यातील मूळ गाभा तसाच ठेऊन तो रसिकांपर्यंत पोहचवण्यासाठी लेखकाने घेतलेले कष्ट.. त्याची मेहनत दिसून येते. या पुस्तकातील सारी इत्यंभूत माहिती, आपल्याला नारळीकरांची अजून पुस्तक कोणती? याचा शोध घ्यायला भाग पडेल.