एकदा वाचून तर पहा... भाग १
"एकदा वाचून तर पहा!" या सदरात, आम्ही दुर्मुखलेली परंतू वाखाणण्याजोगी, वाचायलाच हवी.. अशी काही पुस्तकं तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रत्येक महिन्याच्या शेवटी विशेष अशी पाच पुस्तकं आम्ही तुम्हाला सुचवू जी तुमच्या वाचनाची खोली वाढवतील.. जाणिवेचं वर्तुळ विस्तृत करतील.. व नवीन माहिती तुमच्या समोर आणतील.
प्रत्येक पुस्तक सुंदरच असतं, पण हि पुस्तकं विशेष सुंदर आहेत.. तेंव्हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि पुस्तकांची यादी पोहचवा; आणि आपल्या वाचन संस्कृतीच्या चळवळीचा एक भाग व्हा!
आजची पुस्तकं...
१. कुतूहलापोटी - अनिल अवचट
२. वार्तांच्या झाल्या कथा - राजीव साबडे
३. घर हरवलेली माणसं - व. पु. काळे
४. अभोगी - रणजित देसाई
५. केशराचा पाऊस - मारूती चितमपल्ली
२. वार्तांच्या झाल्या कथा - राजीव साबडे
३. घर हरवलेली माणसं - व. पु. काळे
४. अभोगी - रणजित देसाई
५. केशराचा पाऊस - मारूती चितमपल्ली
१. कुतूहलापोटी - अनिल अवचट
कुतूहल.. हा शब्दच किती मोहक आहे. डोक्यात कोणताही प्रश्न येण्याच्या आधी त्या गोष्टीबद्दल कुतूहल मनात असणे अगदी महत्वाचे आहे. त्यातूनच हळू हळू शोध घेऊन, लेखकाला अशी काही माहिती समोर आली, कि ज्यामुळे अनेक प्रस्थापित विचारांना छेद दिला. त्याच गोष्टींच्या इथे ललित कथा झाल्या आहेत. दुर्मुखलेले हे पुस्तक लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या आजोबांपर्यंत सर्वासाठी आहे.
२. वार्तांच्या झाल्या कथा - राजीव साबडे
वृत्तपत्रातल्या एखाद्या बातमीच्या मागचा प्रवास कसा असतो? वार्तांकन म्हणजे काही फक्त बातमी देणे नव्हे, तर त्यात असणारी सत्यता महत्वाची. पुण्यातल्या, देशातल्या आणि देशबाहेरच्या महत्वाच्या बातम्यांचा घेतलेला वेध तुम्ही सविस्तरपणे पुस्तकात वाचू शकता. बातमी, त्यामागची जोखीम, संरचना व त्याचे परिणाम.. यातून समोर येणारी घटना.. साकार होणाऱ्या कथा या पुस्तकांत दिल्या आहेत.
३. घर हरवलेली माणसं - व. पु. काळे
माणसांच्या भावनिक आधराची एकमेव हक्काची जागा म्हणजे त्याचं घर, त्याचं कुटुंब. पण ते घरच त्याच्या विरोधात गेलं तर? त्याला तिथे देखिल मोकळं होता नाही आलं तर? मनातली घुसमट घरातच अधिक वाढत असेल तर? अशाच काही अनुभवातून साकार झाल्या काही कथा.. वपुंच्या लेखणीने टिपले माणसांची व्यथा. पुस्तक वाचल्यावर तुमच्या जाणिवा जाग्या होतील हे मात्र नक्की.
४. अभोगी - रणजित देसाई
प्रीतीचा संगम अपूर्ण राहिला, तरी तुमच्या दुःखातून सावरून तुम्ही दुसऱ्याच्या जीवनात आनंद निर्माण करू शकता. सर्व सुखसोयी पदरी असताना देखील, त्या उपभोगू ना शकणाऱ्या आणि सदैव अतृप्त राहिलेल्या एका गायकाची व त्याच्या जीवासाठी आपल्या दुःखाला बगल देऊन मदत करणाऱ्या एका डॉक्टरची ही कहाणी; तुमच्या मनाला सुख दुःखाचे किनारे दाखवत पुढे नेणारा या पुस्तक वाचनाचा अनुभव दुर्मिळ आहे.
५. केशराचा पाऊस - मारूती चितमपल्ली
निर्सग कोणाला आवडत नाही. परंतू त्याची इत्यंभूत माहिती किती लोकांना आहे? आपलं आयुष्यचं निसर्गासाठी वेचणाऱ्या एका ध्येयवेड्या माणसाच्या नजरेतून जंगलाची दुनिया पाहताना मजा येते.. अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्या कथा या अशाच काही निरिक्षणातून.. निसर्गातील विविध घटनांच्या पार्श्वभूमीवर तयार होतात.. आणि हृदयाचा एक कोपरा घेऊन टाकतात. त्यातील माहिती तर तुम्हाला प्रभावी वाटेलच, पण आत गुंफलेली मानवी भावनांची तीव्रता, पुस्तकाला अधिक खुलवते.