पुस्तक | द अलकेमिस्ट | लेखक | पाउलो कोएलो | शुचिता फडके |
---|---|---|---|
प्रकाशन | मंजुळ पब्लिशिंग हाऊस | समीक्षण | गिरीश अर्जुन खराबे |
पृष्ठसंख्या | १८२ | मूल्यांकन | ४.८ | ५ |
माणूस, महत्वकांक्षा आणि स्वप्नं यांचा गहन संबंध आहे. पृथ्वीच्या पाठीवर असा कोणताही मनुष्य नसेल ज्याला स्वप्नं पडत नसतील. बऱ्याचदा हि स्वप्नं कसलातरी संकेत देत असतात. म्हणतात ना "मनी वसे ते स्वप्नी दिसे" अगदी त्यातलाच प्रकार. ह्या स्वप्नांच्या माघे धावताना अनेक अडथळे येतात मात्र त्यावर मात करत जो आपल्या अंतिम ध्येयाला गाठतो तो खरा किमयागार ठरतो. पाउलो कोएलो यांची जगद्विख्यात कादंबरी "अलकेमिस्ट" अशाच एका युवकाची कहाणी आपल्यापर्यंत पोहोचवते. लाखो प्रतींचा खप होऊनही हि कादंबरी अनेक लोकांच्या मनावर आजही राज्य करते. काहीतरी मौल्यवान मिळवायची किमया साधायची असेल तर हि कादंबरी तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करू शकते.
सँटियागो नावाच्या मेंढपाळ मुलाची व त्याला मिळणाऱ्या संकेतांचा त्याने केलेला पाठलाग यांची हि कथा आहे. एके दिवशी इजिप्तच्या कुठल्याशा पिरॅमिड मध्ये एका विशिष्ट ठिकाणी खजिना असल्याचं स्वप्न सँटियागोला पडतं. पहिल्यांदा नजरअंदाज केल्यावर पुन्हा त्याला ते पडतं आणि मग या स्वप्नाचा अर्थ लावण्याचं तो ठरवतो. तरिफा या गावात स्वप्नांचा अर्थ सांगणारी म्हातारी राहते हे आठवताच तो तिच्याकडे धाव घेतो आणि आपल्या या स्वप्नांचा अर्थ समजुन घेतो. त्याच्या राहत्या ठिकाणापासून इजिप्तचा प्रवास हा लांबलचक आणि जीवघेणा आहे. आपल्या स्वप्नांचा अर्थ समजून घेताना म्हातारीने त्याला वाटेत मिळणाऱ्या संकेतांबद्दल जागरूक राहण्याचा सल्ला देते. अशातच त्याला पहिलाच संकेत एका राजाच्या रूपात मिळतो आणि आपल्या स्वप्नांबद्दल त्याचा विश्वास दृढ होतो. त्यामुळे सँटियागो आपल्या स्वप्नातील खजिन्याच्या जागेच्या दिशेने प्रवास सुरु करतो.
वाटेत त्याला वाळवंट लागतं, तिथे एका तांड्यासोबत राहून हा प्रवास पूर्ण करायचं ठरवतो. ह्या संपूर्ण प्रवासात त्याला एक निळ्या डोळ्याची मुलगी भेटते, तो तिच्या प्रेमात पडतो आणि विचार करतो कि आता आपण हीच्यासोबतच आयुष्य घालवूयात. मात्र परत त्याला आपल्या स्वप्नाची आठवण होते व तिला पुन्हा माघारी येण्याचं आश्वासन तो देतो. आपल्या स्वप्नांच्या मार्गात आलेला अडथळा बाजूला सारून तो आपला प्रवास सुरूच ठेवतो. अनेक संकेतांचा, संकटांचा सामना करत तो आपल्या इच्छित स्थळी पोहोचतो का? त्याला पडलेले खजिन्याचे स्वप्न खरे असते कि केवळ एक दिशाभूल? सँटियागोच्या कहाणीतून नक्की कोणता संदेश आपण घ्यावा? हे सगळे प्रश्न अनुत्तरित न राहता कथेच्या शेवटी सुटतात. खरंतर स्वप्न काहीही असू शकतं. छोटं, मोठं असं त्याच वर्गीकरण करता येत नाही. कधी कधी छोटी छोटी स्वप्नं हि मोठ्या स्वप्नांची पायाभरणी करत असतात.
लेखकाच्या विद्वत्तेमधून साकारलेली एक अदभूत कथा म्हणजे अलकेमिस्ट! अतिशय सोप्या गोष्टींमधून जीवनाचं सार ह्या पुस्तकातून मांडण्यात लेखक यशस्वी झाला आहे, असं मला वाटतं. सेल्फ हेल्प प्रकारातलं हे पुस्तक तुमच्या संग्रही असायलाच पाहिजे. कधीही आणि कितीही वेळा वाचलं तरी त्याचा कंटाळा येत नाही. तुम्हालाही काहीतरी असाध्य साध्य करण्याची इच्छा असेल आणि त्यात आडकाठी येत असेल तर त्याचा सामना करण्याची शक्ती हे पुस्तक तुम्हाला देईल. तुम्ही हे पुस्तक वाचून बघा आणि तुमच्यातला बदल आम्हाला प्रतिक्रियेद्वारे कळवा.