पुस्तक | समिधा | लेखक | रणजित देसाई |
---|---|---|---|
प्रकाशन | मेहता पब्लिशिंग हाऊस | समीक्षण | गिरीश अर्जुन खराबे |
पृष्ठसंख्या | १४८ | मूल्यांकन | ४.८ | ५ |
कोणत्याही राष्ट्राच्या उभारणीत सर्व समाजाचा हातभार असावा लागतो. कोण्या एका समाजाच्या जीवावर जगात कुठेही राष्ट्रोन्नती झालेली आढळत नाही. आपला देश तर प्रामुख्याने अनेक समाजात, धर्म, जातीत विभागाला गेला आहे. "विविधतेत एकता" या वचनानुसार आजवर आपण वागत आलो अन् त्याच्याच बळावर हे राष्ट्र उभं करत आलो. पण काही समाजकंटकांच्या दिशाभुलीमुळे विकृती तयार होतात, सत्ता आणि पैसा यांच्या जीवावर त्या फोफावतात आणि काही निरागस जीव ह्या सगळ्या प्रक्रियेत भरडले जातात. देश स्वतंत्र होऊन इतकी वर्षे झाली तरी समाजासमाजातली विषमता म्हणावी तितकी आजही कमी झाली नाही. कुठेतरी काहीतरी घडून आजही निष्पाप भाबडे जीव त्याचा बळी ठरतात. अशाच एका शहरात हरिजन वाडा जाळून दोन लोक मृत्युमुखी पडतात आणि रणजित देसाई यांच्याहातून सामाजिक यज्ञात बळी पडलेल्या त्या अश्राप जीवांच्या आहुतीमधून "समिधा" सारखी कादंबरी जन्म घेते. कितीही कटू असलं तरी आजही हे सत्य आपल्याला नाकारता येत नाही.
रानगावातून सुरू होणारी ही कथा अनेक वळणे घेत आपल्याला विमनस्क अवस्थेत नेऊन सोडते. स्वातंत्र्यानंतर अनेक कायदे होऊनदेखील गावाकडच्या परिस्थितीमध्ये जराही बदल झालेला दिसून येत नाही. आजही देवा सारख्या हरिजन लोकांना गावच्या विहिरीचं पाणी घेण्याचा अधिकार नाही. लोकांच्या उष्ट्या अन्नावर आणि पडेल ते काम विनामोबदला करण्यात त्यांचा जीवनक्रम सुरू असतो. देवाचा मुलगा असलेला तुका ह्या तरुण रक्ताच्या नव्या पिढीमध्ये काहीतरी बदल घडवून आणायची प्रचंड इच्छाशक्ती दडलेली असते. आपल्यापरीने तसे तो प्रयत्नही चालू करतो. बापाने कर्जात घालवलेली जमीन सोडवून ती स्वतः कसायला चालू करतो. आपल्या लोकांना उष्ट खाण्यापेक्षा कष्ट करून खाण्याचा सल्ला तुका देतो. हरिजनांचा नेता म्हणून हळूहळू तुका आकार घेऊ लागतो.
एक दिवस बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त गावात हरिजनांनकडून नकळत चूक घडते आणि त्याचा उद्रेक होऊन संपूर्ण हरिजनवाडा गावगुंडाकडून पेटवला जातो. या सगळ्या घडामोडीत तुकाचा बाप देवा आपले प्राण गमावतो. दुसरीकडे देवाची मुलगी मुक्ता मिशनच्या फादरच्या आग्रहाने नर्स बनते. नर्स बनून समाजाची सेवा करायला सुरवात करते. परंतु गंजलेल्या मानसिकतेचा समाज स्त्रीला फक्त उपभोगाची वस्तू समजत असतो, त्यात ती जर खालच्या जातीची असेल तर ती आयती वापरायला मिळते; असा काहीसा समज रानगावच्या मानसिकतेत आपल्याला आढळतो. मुक्ता या सगळ्या व्यवस्थेची बळी ठरते मात्र खचून न जाता ती आपल्या न्यायासाठी लढा उभा करते. सत्ता आणि पैशाच्या जोरावर तिला न्याय मिळत नाही उलट बदनामीच तिच्या वाट्याला येते. तुका हे सगळं सहन करतो की त्याविरुद्ध एल्गार पुकारतो? हे जाणून घेण्यासाठी तुम्ही समिधाच हातात घ्या.
माणुसकीला कलंक फासणाऱ्या अनेक गोष्टी आजही आपल्या आसपास घडत असतात. पण त्यावर भाष्य करण्याचं किंवा ते थोपवण्याचा विचार किती लोक करतात. उलट या सगळ्याला खतपाणी घालण्याच काम प्रत्येक स्तरातून होताना दिसतं. असा हा संवेदनशील विषय घेऊन त्यावर कादंबरी लिहिण्याच काम स्वामीकारांनी केलेलं आहे. ह्या अशा समिधा अजून किती वर्ष ह्या यज्ञकुंडात पडत राहतील, जळत राहतील हे तूर्तास तरी सांगता येणार नाही. रणजित देसाई यांनी आपल्या शब्दजाळातून ही समिधा साकारली खरी, पण त्यामागची प्रेरणा हा यज्ञकुंड पेटवण्याची नसून पूर्णतः शमावण्याची आहे; हे आपण समजून घेतलं पाहिजे. समिधा वाचताना कुठलही हळवं मन हेलवल्याशिवाय राहणार नाही. एका बैठकीत वाचून होणारी छोटेखानी कादंबरी खूप मोलाचा संदेश देऊन जाते. कुमारवयातल्या प्रत्येकानी जर ही वाचली तर माथेफिरू विकृतींना बळी न पडता ते एक चांगला आणि सक्षम समज उभारू शकतात. त्यामुळे तुम्ही ही कादंबरी नक्की वाचा आणि तुमचा मनोदय आम्हाला कळवा.