पुस्तक | समाधीवरलीं फुले | लेखक | वि. स. खांडेकर |
---|---|---|---|
प्रकाशन | मेहता पब्लिशिंग हाऊस | समीक्षण | गिरीश अर्जुन खराबे |
पृष्ठसंख्या | ९८ | मूल्यांकन | ४.५ | ५ |
"समाधीवरलीं फुले" अशा नावाचा वि. स. खांडेकरांचा हा कथासंग्रह! खांडेकरांच्या प्रत्येक पुस्तकाला असं एक वैचारिक नाव असतंच ज्याचा पुस्तकाशी एक घनिष्ठ संबंध असतो. हा कथासंग्रह हातात घेतला तेंव्हा नाव वाचून काही थांग लागला नाही कि हे कशावर लिहिलं असेल. कोणाच्यातरी मृत्यूबद्दल झालेल्या शोकाच्या भावनेतून कथा व्यक्त होत असतील का? कारण समाधी म्हंटल कि मृत्यू आलाच. परंतु समाधी हि काही केवळ मृत्यूशी संबंधित घटना नाही. कधी कधी काही गोष्टींनी हृदयावर इतकी खोल जखम होते कि माणसाच्या भावनांची देखील समाधी लागते. नेमक्या याच गोष्टीचा उलगडा पहिल्याच कथेत होतो; आणि वाचकांना एक अनामिक सुखद धक्का बसतो. समाधीवरली फुले हे पुस्तकाचं नाव पहिल्याच कथेने सार्थ ठरवलं आहे.
प्रेमभंग झालेल्या मुलाचा आईशी संवाद आणि त्यातून उलगडत जाणारं मुलाच्या जन्माचं रहस्य याने समाधीवरल्या फुलांचा सुवास आपल्याही मनात दरवळत राहतो. प्रेमभंगातून पुढे जाण्यासाठी आईने लिहिलेलं पुढील वाक्य आपल्याही मनाचा ठाव घेऊन जातं.
"समाधीवरली फुलं तरुणीच्या केसांतल्या फुलांपेक्षा कांही लवकर कोमेजत नाहीत. फुलांचा जन्म सौंदर्याच्या पूजेकरिता असतो आणि सौंदर्य जर तरुणीत असतं तसं ते समाधीतही असत नाही का?"
माणसाच्या लालची स्वभावाचं दर्शन घडवणारी "परीस", दोन पिढ्यांमधले विरोधाभास दाखवणारी "आज आणि उद्या", दोन मैत्रिणींच्या पत्रव्यवहारातून उलगडत जाणारी "दोन कोनांचा त्रिकोण", "तेरड्याची फुले", प्रेमाचं खरं रूप प्रकट करून देणारी "साक्षात्कार", नवरा बायकोच्या नात्यावर प्रकाश टाकणारी "पतंगाची दोरी", "अमृत झालेले विष" वा दोन वेगवेगळ्या गरजा दाखवणारी "दोन भास" नावाची कथा, अशा या सगळ्याच कथा अनेक मानवी भावनांचे पदर उलगडत वाचकांना मंत्रमुग्ध करून टाकतात. सुरवातीपासून मध्यापर्यंत आपल्याला एक वेगळा भास या सगळ्या कथा घडवतात आणि सरतेशेवटी असं वळण घेतात कि आपण सुन्न होतो. आपल्या विचारांना एक प्रकारचा सुरुंग लागतो आणि कुठूनतरी लेखक हे सगळं होताना पाहत असल्याची भावना नकळत जागी होते. "समाधीवरलीं फुले" हि माझी या कथासंग्रहातली सगळ्यात आवडती कथा आहेच पण "तेरड्याची फुले" आणि "पतंगाची दोरी" यांनी जो अनपेक्षित धक्का दिला आहे त्याने एक वेगळंच समाधान मनात भरून राहतं.
आपल्या कथासंग्रहाच्या माध्यमातून अनेक प्रसंगांची उकल खांडेकरांनी आपल्या जादुई शब्दांनी केली आहे. फुलांचं आयुष्य हे उमलण्यात आणि कोमेजण्यात जरी जात असलं तरी ह्या दोन प्रक्रियेच्या मध्ये बरंच काही घडत असतं ते आपल्याला दिसत नाही. असंच काहीसं या कथांच्या बाबतीतही घडत आहे, म्हणूनच कि काय ह्या कथांनी आपल्याही मनाची समाधी लागते. या समाधीवर सुखद आनंदाची फुले कथेच्या शेवटी लेखकाने वाहिली आहेत त्याचा सुगंध आपल्या मनात चिरकाल दरवळत राहतो.
छोटासा व प्रभावी असा हा कथासंग्रह कोणीही एका बैठकीत वाचून संपवेल. सहज, सुंदर, अलंकारिक भाषा हि खांडेकरांची वैशिष्ट्ये इथेही तुम्हाला पाहायला मिळतात. एकूण अकरा कथांचा हा संच तुम्हाला अनेक आनंदी क्षण देऊन जाईल. त्यामुळे तुम्ही जर असं काहीसं वाचण्याच्या शोधात असाल तर हा कथासंग्रह नक्की वाचून काढा.