पुस्तक | रिच डॅड पुअर डॅड | लेखक | रॉबर्ट कियोसाकी | अभिजित थिटे |
---|---|---|---|
प्रकाशन | मंजुळ पब्लिशिंग हाऊस | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | २०१ | मूल्यांकन | ४.६ | ५ |
श्रीमंतीची स्वप्ने बघत बघत आपण मोठे होतो आणि आपलं बालपण संपून पैसे यायला लागतात. आपल्याला स्वतःच्या पैशाने आता काय घेऊ नि काय नाही कळत नाही. गोष्टी अनेक असतात.. अत्याधुनिक मोबाईल फोन.. नवी कोरी गाडी.. सुंदर कपडे, अशा किती गोष्टी सांगाव्या.. एक नि अनेक. पण आपल्याकडे घरात आर्थिक शिक्षणाचे धडे फारसे मिळताना दिसत नाहीत.. म्हणून जेव्हा पैसे हातात येतात तेव्हा मात्र आपल्याला त्याचं गणित उलगडत नाही. मराठी साहित्यात काही पुस्तकं मागच्या काही वर्षात आली आहेत.. त्यात प्रामुख्याने प्रफुल्ल वानखेडे यांच्या "गोष्ट पैशापाण्याची" याचं एक वेगळं स्थान आहे. परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या पुस्तकाने गारुड घातलं ते म्हणजे रॉबर्ट कियोसाकी यांचे "रिच डॅड पुअर डॅड".
काही महत्वाच्या गोष्टी लेखकाने सामान्य वाचकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. पैशाचा व्यय कसा होतो.. त्याची बाराखडी काय आहे? आणि हे सांगताना त्याने आगळा वेगळा प्रयोग केला आहे. त्याने यासाठी दोन वडील(पितृतुल्य) माणसं कथेत गुंफली आहेत. त्याचे खरे वडील शिक्षक आहेत व गरीब आहेत. दुसरे मानलेले वडील म्हणजे त्याच्या बालपणीच्या मित्राचे वडील.. जे उद्योगपती आहेत, त्यांचं शिक्षण देखिल जेमतेमच आहे.. पण तरीही ते श्रीमंत आहेत. मग याचे कारण शोधण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. पैसे मिळवण्याची आणि वापरण्याची मानसिकता लेखकाने या पुस्तकात सांगितली आहे. श्रीमंत माणसाची विचारसरणी, त्याची पैसे हाताळण्याची पद्धत कशी त्याला श्रीमंत बनवते.. व याच विरुद्ध गरीब माणूस कसा अजून गरीब होतो याचे धडे लेखकाने आपल्याला दिले आहेत. ते उदाहरणासहित आपल्या समोर मांडले आहेत. इतकेच नाही तर त्याची सुंदर आणि तर्कशुद्ध कारणमीमांसा देखील केली आहे.
पैसा कसा वाहतो(कॅशफ्लो) याचे सुंदर चित्रातून आपल्याला समजावले आहे. कर्ज म्हणजे काय? गुंतवणूक म्हणजे काय? आपली खरी मालमत्ता कोणती? जबाबदारी.. दायित्व कोणतं? म्हणजे ऍसेट्स कोणते आणि लायबिलीटीस कोणत्या? याचे एकदा उत्तर मिळाले कि तुम्हाला अनेक गोष्टी समजायला लागतात. आणि आपल्याला नवीन समज मिळते. पुस्तक वाचून तुम्ही तुमचे निर्णय एकदा पडताळून पाहू शकता. त्यातून आपल्याला अनेक पुढच्या निर्णयात देखील मदत होते. आपण श्रीमंत होऊ कि नाही माहित नाही पण शहाणे मात्र नक्की होऊ.
लेखक स्वतः एक मोठी असामी आहे. त्याने रिअल इस्टेट व्यवसायातून पैसे मिळवले आहेत. म्हणूनच सर्वांनीच वाचावं, असं हे पुस्तक आहे. आणि फक्त आपणच नाही तर लहान मुलांना देखील हमखास हे पुस्तक वाचायला दिल्यास, त्यांचे विचार पैश्यांच्या बाबतीत बदलू शकतील. सर्व प्रकारच्या वाचकांनी वाचावे असे हे पुस्तक आहे. प्रत्येकाच्या संग्रही असावे असे पुस्तक. संकुचितता जाऊन एक व्यापक विचार तयार होईल यात शंका नाही.