पुस्तक | पार्टनर | लेखक | व. पु. काळे |
---|---|---|---|
प्रकाशन | मेहता पब्लिशिंग हाऊस | समीक्षण | गिरीश अर्जुन खराबे |
पृष्ठसंख्या | १६० | मूल्यांकन | ४.८ | ५ |
प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अडचणी सोडवणारा संकटमोचक माणूस असतोच; भले तो सगळ्यातून मार्ग शोधून देत नसेल पण त्याच्या नुसत्या असण्याने आपल्याला हायसं वाटतं. अशी माणसं कुठल्याही अपेक्षेने हे करत नाहीत; त्यांना मुळातच आपला लळा असतो आणि आपल्याला त्यांचा. अशा माणसांना तुम्ही दोस्त, मित्र, यार किंवा सखा वगैरे नावाने संबोधत असाल मात्र वपुंनी त्याला पार्टनर म्हटलं. मराठीत पार्टनर चा अर्थ होतो भागीदार, म्हणजे तुमच्या आयुष्याच्या वाटणीतला भागीदार. तो सुखात असतो आणि दुःखात तर हमखास असतोच असतो. असा हा पार्टनर प्रत्येकाला कधी ना कधी, कुठे ना कुठे भेटतोच; म्हणूनच कि काय वपुंनी एक संबंध कादंबरी त्याच्यासारख्या पात्रावर लिहायचं ठरवलं असावं.
"लक्षात ठेव दोस्त. तुला मी हवा आहे. म्हणून मला तू हवा आहेस.",
हि मैत्रीची वा भागीदारीची इतकी सोपी भाषा फक्त हाच माणूस करू शकतो. वपुंना समाजाकडे पाहण्याचा एक विलोभनीय दृष्टिकोन लाभलेला असावा. त्यामुळेच इतरांपेक्षा वेगळं त्यांना प्रत्येक गोष्टीत सापडत गेलं आणि तेच त्यांनी आपल्या अनेक पुस्तकांमधून वाचकांपर्यंत पोहोचवलं. अशीच एक प्रेम कहाणी त्यांनी पार्टनर मधून लिहिली आहे मात्र प्रेम कहाणीला विविध पैलूंनी रंगवण्याची अनोखी किमया साधलेली यात तुम्हाला वाचायला मिळणार आहे. औषधाच्या दुकानात काम करणाऱ्या नायकाची आणि त्याला पायाभरणीच्या वेळी दिसलेल्या नायिकेची खरंतर हि कहाणी आहे. मग तुम्ही म्हणाल इथं पार्टनरच काय काम बुवा? पण तीच तर खरी मेख आहे. पार्टनर हा त्याचा मित्र आहे, गुरु आहे जो नायकाच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या विषयांना योग्यप्रकारे हाताळण्याचा मार्ग दाखवतो. सर्वसामान्य कथानकाप्रमाणे तरुण तरुणी प्रेमात पडतात, विवाहबद्ध होतात आणि सुरु होतं संसार नावाचं वास्तव! अगदी तसंच ह्याही कादंबरीत घडलं आहे मात्र ते मांडण्याची पद्धत वपुंची आहे. वपुंचा शब्दरूपी परिसस्पर्श त्याला झाला आहे.
आपल्याशी बोलत बोलत कथा पुढे सरकत असते हे आणखी एक ह्या कादंबरीचं वैशिष्ट्य आहे. प्रेमातली कोमल भावना रेखाटता रेखाटता संसारातल्या खाचा खोचा देखील इथे लेखकाने अधोरेखीत केल्या आहेत. प्रत्येक पानागणिक "वाह्ह क्या बात है!" असं वाचकांना उच्चरायला लावणारी कितीतरी वाक्य ह्या कादंबरीमधून आपल्या भेटीला येतात अन आंपल्या स्मृतिकोशात कायमची घट्ट चिकटून बसतात. जबाबदारीला अनोख्या पद्धतीने मांडताना वपु म्हणतात,
"कुणाचा तरी मुलगा होणं टाळता येत नाही. पण कुणाचा तरी बाप होणं टाळता येतं."
अशा कितीतरी गोष्टी सहज सहज सांगताना वपु आपल्याला जीवनाचं तत्वज्ञान सांगून जातात. उदाहरण द्यायचंच झालं तर वपुंनी मरणाची केली व्याख्या वाचल्यावर तुमच्या ते लक्षात येईल.
"प्रत्येक क्षणी माणसाचं मन नवा जन्म घेत असतं. एवढंच काय ते नवीन. पुन्हा पुन्हा जन्म घेण्याची क्रिया थांबणं हे मरण."
अतिशय सोपी पण रुचकर भाषा हा वपुंचा हातखंडा आहे. कुठल्याही मनाला साद घालण्याची ताकद त्यांच्या शब्दांत आहे. वास्तवाला देखील वलय देऊन लिहिण्याचं अनोखं काम वपुंनी केलं आहे; असं मला वाटतं. म्हणूनच ते सगळयांना आवडत असावं. तुमच्या आयुष्यातल्या अशा पार्टनरला भेट म्हणून देण्यासाठी याशिवाय योग्य अशी दुसरी कोणती भेटवस्तू असूच शकत नाही. त्यामुळे तुम्ही जर हे पुस्तक वाचलं नसेल तर तुम्ही एका अविस्मरणीय कलाकृतीला आजवर मुकला आहात असं मी म्हणेल. म्हणून तुम्ही न चुकता हे पुस्तक वाचा आणि तुमच्या पार्टनरलाही ते वाचायला सांगा.