पुस्तक | ओरिजिन | लेखक | डॅन ब्राऊन | मोहन गोखले |
---|---|---|---|
प्रकाशन | मेहता पब्लिशिंग हाउस | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | ६१२ | मूल्यांकन | ४.६ | ५ |
मागील काही कालखंडात डॅन ब्राऊन हे नाव सर्व वाचन प्रेमींच्या मुखात अगदी सातत्याने आळवल जात आहे, याचं कारण म्हणजे त्यांनी मागील दशकात साहित्य क्षेत्रात केलेली क्रांती. विस्तृत, आकर्षक, तर्कशुद्ध युक्तिवाद आणि सतत प्रश्न विचारत राहणारी लेखणी ही त्यांची जमेची बाजू. मग ते "द लॉस्ट सिम्बॉल", "द दा विन्सि कोड" असोत वा "अँजेल अँड डेमोंस" वा "ओरिजिन" त्यांच्या लेखणीने सर्वांना निखळ आनंदच दिला आहे. संपूर्ण जगाने त्यांची दखल घेतली याचं श्रेय सर्वस्वी त्यांचच आहे. प्राण पणाला लावून ते लिहतात, हे आपल्याला लगेच समजून येतं. विषयाचा अगदी गाढा आणि सखोल अभ्यास, लहान सहान गोष्टींची माहिती आणि काळजीपूर्वक वर्णन, आणि पात्रांच्या माध्यमातून ते उभा केलेलं भावविश्व. हे सारेच वाखाणण्याजोग आहे.
त्यांच्या लिखाणाचे खरे वैशिष्टय आणि गंमत म्हणजे रहस्य, वास्तव आणि पात्रांची अनिश्चितता या साऱ्याने, त्यांनी गुंफलेली कथा. त्याला तंतोतंत जुळणारे पुरावे. आणि सतत पुढे काय होईल याची एक सुखद चिंता. या साऱ्या मोहपाशात आपण अडकतो आणि अधिकाधिक आतुर होऊन वाचू लागतो.
ओरिजिन हे पुस्तक देखील त्याला अपवाद नाही. त्यांनी सगळीकडेच रंगवलेल्या रॉबर्ट लँग्डन याचीच ही कथा आहे.ज्यामध्ये आपल्या मानवजातीची सुरवात कोठून झाली आणि ती आता कुठे जात आहे, याचा एडमंड या त्यांच्या तरुण, तडफदार, हुशार, जिज्ञासू अशा विद्यार्थ्याने लावलेला शोध किंवा मांडलेला सिद्धांत पाहण्यासाठी जातात. आणि तिथे झालेल्या काही रोचक घटनांवर आधारित हे पुस्तक आहे. संपूर्ण पुस्तक फक्त एका रात्रीची रोमहर्षक कथा आहे, हे तुम्हाला समजल्यावर हैराण व्हाल. आणि तरीही लेखकाने अतिशय सुरेख सगळे बारकावे जपले आहेत आणि कथा रचली आहे. मानवजातीसाठी असलेला हा सगळ्यात मोठा प्रश्न लेखक सोडवतो.
"आपण कोठून आलोत? आणि कुठे जात आहोत?"
पुस्तकाचा कालखंड आत्ताचाच असल्यामुळे आपण त्याच्याशी अगदीं मिळून मिसळून जातो. यामध्ये संगणक, आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांचाही प्रामुख्याने समावेश आहे. जे आपल्याला अजूनच भारावून टाकेल. फक्त पोकळ विचारांचा डोलारा नसून, भविष्यावर अगदी सूचक भाष्य करणारे हे पुस्तक आहे. अनेक उल्लेख आणि त्यामागील उद्देश, हेतू आणि कारणे तुमच्या मनात घर करून जातील.मला स्वतःला त्यातील "गॉड ऑफ गॅप्स" ही संकल्पना खूपच आवडली आहे.
नक्की वाचव असे हे पुस्तक. साय-फाय आणि थरारक कहाणी, तुम्हाला भावेल. उत्सुकता शिगेला नेऊन त्याची उकल केल्यामुळे पुस्तक वाचताना मजा येते. अनेक वळणं घेत पुस्तक कसे परत मुळ पदावर येते हे पाहून, नक्कीच यावर भविष्यात चित्रपट होईल यात शंकाच नाही. आपण कोठून आलो आणि कुठे जातोय यावरचे उत्तर हवे असेल तर नक्की वाचा... ओरिजिन.