पुस्तक | नटसम्राट | लेखक | वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) |
---|---|---|---|
प्रकाशन | पॉप्युलर प्रकाशन | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | १२४ | मूल्यांकन | ५ | ५ |
"कोणी घर देतं का? घर." हे वाक्य मराठी माणसाच्या मनावर अनेक वर्ष ताबा घेऊन बसलं आहे. मराठी नाटकसृष्टी ज्यामुळे बहरली.. नावारूपाला आली. असे एक खास नाटक म्हणजे नटसम्राट. पुस्तकरूपात नाटक वाचताना, माझ्या मनाला ते अजूनच भिडले. नाटक वाचताना शब्दांचा वापर, त्याचा पोत, त्याची मांडणी लक्षात येते आणि त्याची गूढता समजते. प्रत्येक वाक्याचा आपल्यावर परिणाम होतो अस मला स्वतःला वाटतं. त्यात "नटसम्राट", म्हणजे कुसुमाग्रजांच्या अनेक पल्लेदार व मनाला भिडणाऱ्या वाक्यांनी मनात विचारांचं काहूर माजवणारं पुस्तक.
एके काळी रंगमंच गाजवलेल्या एका नटाची (आप्पासाहेब) ही कथा. उतरतीच्या वयात आल्यावर अनेक कटू अनुभव त्या तून होणारी तगमग आणि कधी एके काळी आपल्या प्रतिभेच्या जोरावर नाटकसृष्टी गाजवली याचा अभिमान; या दोन्हीच्या मधोमध आंदोलन करणारं नायकाचं हळवं मन. कोणासाठी इतके दिवस सहन केलं? आपण कोणासाठी इतके दिवस कष्ट केले? अशा प्रश्नांनी भेडसावून गेलेला एक म्हातारा नट आपल्याला भेटतो. कुसुमाग्रजांच्या प्रतिभेतून नायकाच्या मुखातल्या प्रत्येक वाक्यानिशी मनाला सर्पदंश झाल्याचा भास होतो. म्हातारपणी घर किती महत्त्वाचे आहे. आपली नाती किती महत्वाची आहेत हे समजतं. पण कधी कधी तुम्ही सगळ्यांसाठी सगळं करूनही तुमचं कोणीच नाही, हा अनुभव मात्र हतबल करून जातो.
स्वतःच्याच मुलीकडून (नलू) चोरीचा आळ.. पैशांवरून हेवेदावे.. म्हातारपणी कोणत्याही विषयावर निर्णय न घेता येण्याची परिस्थिती.. अशामुळे स्वतःत गुंतलेला नायक व त्याची बायको (कावेरी). यातून त्याची सुटका होईल का? त्याला आता न्याय मिळेल का? आणि अशा अवस्थेत एक प्रसिध्द परंतू बेघर नट काय भूमिका घेईल? असे अनेक प्रश्न तुम्हाला भेडसावत असतील. तर हीच या पुस्तकाची खासियत आहे. एकोणिसाव्या शतकातील असूनदेखील आत्ताच्या घडीला अगदी तंतोतंत लागू पडणाऱ्या लिखाणाने मनाला भुरळ नाही घातली तर नवलच. धीरगंभीर प्रकारात मोडणारं हे नाटक, तुमच्या मनाला विविधांगी विचार करायला लावेल एवढं मात्र नक्की.
यातले संवाद अक्षरशः तुम्हाला वेड लावतील.. मनाला टाचण्या टोचवतील असे आहेत. तुमच्या घरात हे पुस्तक नक्की संग्रही असावं. यातील काही आवडीचे संवाद(वाक्य) इथे खाली देत आहे, त्यातून या नाटकाची पोच तुमच्या लक्षात येईल. तुम्ही हे पुस्तक वाचलं असेल तर तुमचा अभिप्राय आम्हाला कमेंट्स द्वारे नक्की कळवा.
या दुनियेच्या उकिरड्यावर
खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन
जगावं बेशरम लाचार आनंदानं,
की फेकून द्यावे हे देहाचं लक्तर
त्यात गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेसह
मृत्यूच्या काळ्याशार डोहामध्ये?
आणि करावा सर्वांचा शेवट एकाच प्रहारानं
माझा तुझा याचा आणि त्याचाही.
मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा
की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही,
पण त्यांनी निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागलं तर?
तर मग.. इथेच मेख आहे
नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही
म्हणून आम्ही सहन करतो हे जुने जागेपण;
सहन करतो प्रेतांच्या निर्जीवपणाने अभिमानावर होणारे बलात्कार
अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेल्या सत्वाची विटंबना
आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेने
आमच्या मारेकऱ्यांच्याच दाराशी.
विधात्या, तू इतका कठोर का झालास?
एका बाजूला, आम्ही ज्यांना जन्म दिला ते आम्हाला विसरतात
आणि दुसऱ्या बाजूला ज्यानं आम्हाला जन्म दिला तो तू ही आम्हाला विसरतोस.
मग विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन हे करुणाकरा,
आम्ही थेरड्यांनी कोणाच्या पायावर डोकं आदळायचं!
कोणाच्या पायावर? कोणाच्या?
-© अक्षय सतीश गुधाटे.