पुस्तक | नर्मदेऽऽ हर हर | लेखक | जगन्नाथ कुंटे |
---|---|---|---|
प्रकाशन | प्राजक्त प्रकाशन | समीक्षण | गिरीश अर्जुन खराबे |
पृष्ठसंख्या | २५६ | मूल्यांकन | ४.९ | ५ |
अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालणं तसं अवघडंच! परंतु अनेकदा अध्यात्माकडून विज्ञानाला नवनवीन शोध लावण्यासाठी स्फूर्ती मिळाल्याचं आपण पाहत आलो आहोत. जसं विज्ञान हे यशस्वी प्रयोगांवर अवलंबून आहे तसं अध्यात्म हे स्वानुभवावर अवलंबून आहे. आपापल्या साधनेनुसार त्याची प्रचिती प्रत्येकाला येत असते कोणाला तो भास वाटतो तर कोणाला चमत्कार. बऱ्याचदा हा विषय लोकनिदेंचाही बळी झालेला आपण पाहिलं असेल पण म्हणून त्याची ख्याती कमी होत नाही. भारतासारख्या देशात भोंदूगिरीच्या नावाखाली अनेक साधू उदयाला आले आहेत त्यांनी धर्माच स्तोम माजवून अनेकांची फसवणूक करून अर्थार्जन केले आहे. मात्र त्यातूनही मार्ग काढत असे अनेक साधू, महंत अस्तित्वात आहेत ज्यांनी या अध्यात्माचा पाय ढासळू दिला नाही. असाच एक अवलिया ज्याने चार वेळा नर्मदा परिक्रमा करत अनेक अनुभवांची शिदोरी जमा केली. "नर्मदेऽऽ हर हर" या पुस्तकातून त्यांनी वाचकांना आपल्या तीन वेळा केलेल्या परिक्रमांचा अनुभव उपलब्ध करून दिला आहे. नर्मदा परिक्रमा करायची इच्छा असणाऱ्यांसाठी हे पुस्तक म्हणजे एक वरदान आहे; असं मला वाटतं.
आपल्या अंतःस्फूर्तीने आलेल्या आज्ञेचे पालन करत एक दिवस लेखक घर सोडून नर्मदा परिक्रमेला निघून जातात. ओंकारेश्वर पासून सुरु होणारी परिक्रमा, परिक्रमा सुरु करण्यासाठी करावी लागणारी तयारी, परिक्रमा सुरु करण्याआधी करावे लागणारे विधी याची कुठलीही कल्पना नसताना देखील लेखकाला कसलीच अडचण येत नाही. आपल्या श्रद्धेच्या जोरावर आणि गुरु कृपेवर विसंबवत आलेल्या सगळ्या समस्यांच निराकरण करण्यात लेखक यशस्वी होतो. परिक्रमेत आलेले बरे वाईट अनुभव, लोकांचे मिळालेले प्रेम, परिक्रमावासींसोबत घालवलेले क्षण आणि प्रत्येक मुक्कामाच्या ठायी जोडली गेलेली नवनवीन दृढ नाती यांचं सखोल विश्लेषण आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतं. नर्मदामैयावर असलेल्या दृढ विश्वासाच्या जीवावर हि परिक्रमा सहज पूर्ण होते, असा एकंदर अनुभव प्रत्येक परिक्रमावासीला आजवर आलेला आहे. भुकेल्याला अन्न, थकलेल्याला आसरा देण्याचं काम मैय्याच करते फक्त तुमची भक्ती आणि श्रद्धा तेवढी खडतर हवी. अध्यात्माबद्दल बोलताना लेखक म्हणतात,
"जगाच्या दृष्टीने वेडेपणा, पण अध्यात्म ही वेड्यांचीच मिरासदारी आहे. इथे शहाण्याला वेडे बनायची हौस हवी."
परिक्रमेच्या निमित्ताने अनेक ठिकाणी चालणाऱ्या काळ्या धंद्यांवर, धर्माच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीवर लेखकाने सपशेल ताशेरे ओढले आहेत. कुठेही भोंदूगिरीच समर्थन लेखक करत नाही. सिद्धी प्राप्त असताना देखील कुठेही आश्रम स्थापून राहण्याची लालसा लेखकाला होत नाही. अनेक चमत्कारिक अनुभव या प्रवासाच्या निमित्ताने लेखकाला आले आहेत; मात्र त्याच कुठेही अवडंबर करत नाही वा श्रेय लेखक घेत नाही. दुष्काळी भागात वाचासिद्धीच्या जोरावर पाऊस पडणे असो, नर्मदामैयाने स्वतः मिष्टान्नाचा प्रसाद देणे असो वा शुलपाणीच्या जंगलात मृत्यूच्या दाढेतून स्वतः अश्वत्थामाने त्यांना वाचवणे असो असे एक ना अनेक चमत्कारिक अनुभव आलेले असताना देखील तुम्ही त्यावर विश्वास ठेवा; असा आग्रह लेखक करत नाही. नर्मदा परिक्रमेत माणूस वेगवेगळया कसोट्यांमधून जात असतो, ज्याची जशी भक्ती तशी त्याला प्रचिती येत असते. परिक्रमेला जाणाऱ्या प्रत्येकालाच असा अनुभव येतो अशी आजपर्यंतची धारणा आहे. अजूनतरी याला असा कोणी अपवाद व्यक्त केलेला नाही. पुस्तक वाचत आसनात आपण स्वतःच नर्मदा किनारी रेंगाळत आहोत; अशी भावना वाचकांना आल्याशिवाय राहणार नाही. मी स्वतः ओंकारेश्वर आणि महेश्वर सारख्या ऐतिहासिक ठिकाणांना प्रत्यक्ष भेट दिली असल्या कारणाने हे छातीठोक सांगू शकतो.
अनेक प्रकारच्या अनुभवांनी समृद्ध असल्यामुळे आणि कुंडलिनी शक्तीची दीक्षा प्राप्त असल्यामुळे "नर्मदेऽऽ हर हर" हे पुस्तक लेखकाने सहज लिहून काढले असणार यात शंका नसावी. सहज सुंदर प्रसंगवर्णन, सखोल माहिती, भौगोलिक अभ्यास आणि अध्यात्माची जोड यांनी पुस्तकाला एक वेगळाच बहर आला आहे. कुंतल सारख्या सहप्रवाश्यासोबत घालवलेले अनेक क्षण या पुस्तकात लेखकाने मांडले आहेत. त्यांची वैचारिक देवाणघेवाण, अध्यात्मिक तयारी व त्यावरचे संवाद आपल्याही मनाला भुरळ घालतात. तुम्हाला जरी अध्यात्माची आवड नसली तरी तुम्ही हे पुस्तक वाचू शकता, यात कुठेही मंत्रतंत्र वा बुवाबाजी यांचं समर्थन केलेलं नाही. आपल्या विचारांनी कुणी प्रभावित व्हावं अशी लेखकाची इच्छाही नाही; त्यांनी फक्त आपले अनुभव आपल्यासमोर मांडले आहेत. त्याला आपण आपल्या पद्धतीने घेण्याची मुभा लेखकाने दिलेली आहेच. माझ्या वाचण्यात हे पुस्तक आले यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण परिक्रमा जरी शक्य नसली तरी पुस्तकरूपी परिक्रमा पूर्ण केल्याचं सुख नक्कीच यातून मिळाल्याची भावना मनात घर करून जाते. असं हे सुंदर पुस्तक तुम्हीदेखील वाचा, हवं तर तसा माझा आग्रह समजा आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा.