मुकद्दर - स्वप्नील कोलते | Mukaddar - Swapnil Kolte | Marathi Book Review

मुकद्दर-स्वप्नील-कोलते-Mukaddar-Swapnil-Kolte-Marathi-Book-Review
पुस्तक मुकद्दर: कथा औरंगजेबाची लेखक स्वप्नील कोलते
प्रकाशन न्यू ईरा पब्लिशिंग हाउस समीक्षण अक्षय सतीश गुधाटे
पृष्ठसंख्या २११ मूल्यांकन ४.३ | ५

अनेक दिवांपासून एक पुस्तक सगळ्यांच्याच मनाचा वेध घेत आहे, अनेक किस्से ऐकायला मिळत आहेत. पुस्तकाचे नाव "मुकद्दर" लेखक "स्वप्नील कोलते". या पुस्तकाने नवीन पिढीला अगदी भुरळ घातली आहे आपल्या प्रेमात पाडले आहे. आणि म्हणूनच हे पुस्तक मी वाचायला घेतले, लवकरच त्याचे कारणही मला समजले. पुस्तकाची लोकप्रियता ही अगदीच योग्य आहे. त्यात मांडलेली गोष्ट मराठी माणसांसाठी आपुलकीची आहे, जवळची आहे किंबहूना आपण सर्वजण ती उरात घेऊनच फिरत असतो.

हे पुस्तक लिहलंय एका अशा माणसावर ज्याच्यासोबत मराठ्यांच्या तीन पिढ्या लढत होत्या, तो राजा म्हणजे "औरंगजेब". यातून आपल्याला आपला शत्रू किती बलवान होता हे समजून येईल. औरंगजेब हा अतिशय कठोर, हट्टी आणि कपटी तर होताच पण तो सामर्थ्यवान देखील होता, तो तितकाच चातुरही होता. या पुस्तकातून आपल्याला त्याच्या आयुष्यातील अनेक वेगवेगळया आणि आपण आतापर्यंत ज्यापासून लांब आहोत अशा गोष्टी समजतील. इतिहासाचा एक वेगळा स्पर्श होईल, एक नवीन अंश मिळेल आणि त्याकडे बघण्याची दृष्टी बदलू शकेल. पुस्तक जरी औरंगजेब याच्या जीवनावर असेले तरी त्यात आपल्याला मराठ्यांचा गौरवशाली इतिहासच वाचायला मिळणार आहे. माहीत नसलेला नायक आणि माहीत असलेला इतिहास याच्यात बंधेलेला हा पूल नक्कीच आपल्याला पुस्तकाची उत्सुकता वाढवायला मदत करतो.

अनेकांना प्रश्न पडले असतील खरचं औरंगजेब इतका चांगला होता की वाईट? आपल्या सुवर्ण सिंहासनावर शेवटचं आयुष्य आरामात बसून घालवण्या ऐवजी मराठ्यांना संपवण्याचा हट्ट धरण्याला धाडसीपणा म्हणावा की मूर्खपणा? तो हुशार होता कपटी? खरा की खोटा? धर्मांध म्हणावं की समजून उमजून काम करणारा धूर्त राजकारणी? असे अनेक प्रश्न आणि याच प्रश्नांची उत्तरे लेखकाने या पुस्तकात देण्याचा प्रयत्न केला आहे. अपरिचित इतिहास आणि त्यात लपलेले मराठ्यांचे यश लेखकाने अगदीं सुंदर शब्दात मांडले आहे.

पुस्तकात उर्दू ढंगाच्या हिंदीचा वापर बऱ्याच प्रमाणात आहे. यामुळे पुस्तक वाचताना खरा संवाद चालू आहे असच वाटतं. त्या काळात देखील असच बोलतं असतील अशा छटा निर्माण होतात. पुस्तकाला हळू हळू एक रंग चढतो. सुरवातीला हलकीशी पुनरावृत्ती जाणवते पण इतिहास असल्याने आणि तशाच गोष्टी झाल्याने ती रटाळ वाटतं नाही. पण पूर्वाधात आपली स्वतःची सुख-दुःख आणि एक एक बाब उलघडून सांगणारा, आणि आपली प्रतिमा लोकांसमोर मांडणारा औरंगजेब आपल्याला विचार करायला भाग पाडतो.

पुस्तकाचे लिखाण मांडणी आणि त्यात गुंफलेली कथा यातून दोन्ही बाजू सांभाळून लिहिण्याचे लेखकाचे कसब कौतुकास्पद आहे. सगळ्यांना आवडेल असेच पुस्तक आहे. सगळ्यांनी हे पुस्तक विकत घेऊन वाचायला हरकत नाही. नवीन पिढीला तर हे पुस्तक आवडत आहेच, अनेकांनी यासाठी विचारपूस देखील केली होती आणि ती रास्त आहे. स्वतःचे नशिब मराठी लोकांच्या जबरदस्त लढ्यामुळे बदलू न शकणारा हा "मुकद्दर" तुम्ही नक्कीच वचायाला हवा!!

-© अक्षय सतीश गुधाटे.

Previous Post Next Post

Contact Form