मृत्यानुभव - इब्राहीम अफगाण | Mrutyanubhav - Ibrahim Afghan | Marathi Book Review

मृत्यानुभव-इब्राहीम-अफगाण-Mrutyanubhav-Ibrahim-Afghan-Marathi-Book-Review
पुस्तक मृत्यानुभव लेखक इब्राहीम अफगाण
प्रकाशन संधिकाल प्रकाशन समीक्षण गिरीश अर्जुन खराबे
पृष्ठसंख्या १३६ मूल्यांकन ४.५ | ५

"जन्म मरण नको आता नको येरझार 

नको ऐहिकाचा नाथा व्यर्थ बडीवार !"

अशोक परांजपे लिखित या गीताच्या ओळी आपण कधी ना कधी ऐकल्या असतील, पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या सुरांनी त्या अजरामर हि झाल्या आहेत. जन्म आणि मरण या चक्रात सगळे सजीव अडकलेले आहेत; मात्र मानवाला त्याची जाण इतरांपेक्षा जरा जास्तच आहे. मृत्युबद्दलची एक गूढ ओढ आपल्यातल्या अनेकांना आकर्षित करत असते. लहानपणापासून स्वर्ग, नर्क, पाप, पुण्य या गोष्टींबद्दल आपण ऐकत असतो. नकळत त्याचा परिणाम माणसाच्या आचरणावर, मनावर होत असतो. परंतु तरीही मृत्यूनंतरच जीवन आजवर कुणालाही कळलेलं नाही. मात्र जिवंतपणी जर आपण मरणोत्तर अनुभव घेऊ शकलो तर? नुसत्या विचारानेच आपली भंबेरी उडते. "मृत्यानुभव" या पुस्तकातुन असाच काहीसा विषय इब्राहीम अफगाण या लेखकाने वाचकांसमोर मांडला आहे.

मानवी मनाच्या मानसिक अस्थिरतेचा एक थरारक अनुभव वाचकांना या पुस्तकात वाचायला मिळेल. एकंदर विषय आणि कथा हि आपल्या आजूबाजूला घडणारी असली तरी जो संदेश वाचकांपर्यंत पोहोचवायचा आहे तो पोहोचवण्याचं काम तंतोतंत साधलं आहे. लेखक, प्रोफेसर राव , रतन, सागर आणि क्षमा या पात्रांच्या अवतीभोवती फिरणारं कथानक सावकाशपणे मनाचा वेध घेत आपल्याला गुंतवून ठेवतं. एका सुप्रसिद्ध लेखकाला जेंव्हा प्रोफेसर राव भेटतात तेंव्हा मृत्यूनंतरच्या अनुभवाबद्दल त्यांची चर्चा होते. ह्या असल्या गोष्टींवर विश्वास नसलेला लेखक आधी टिंगल करतो; आणि नंतर मात्र हा अनुभव स्वतः घ्यायला तयार होतो. मरणानंतर आपल्या जुन्या प्रेयसीला भेटून तो तिच्यासोबत काही काळ व्यथित करतो. वेगवेगळ्या क्षणांची अनुभूती त्याला मिळते. त्याच्या मनात तयार झालेल्या जगातच तो वावरत असतो; हे सरतेशेवटी त्याच्या लक्षात येतं. स्वर्ग आणि नर्क हे दुसरं काहीही नसून एकाच वेळी वेगवेगळ्या अनुभवांतून निर्माण होणारी मानसिक अवस्था आहे; हे त्याला कळून चुकतं.

क्षमा या आपल्या जुन्या प्रेयसीबद्दलच एक वेगळंच विश्व लेखकाने मनात निर्माण केलेलं असतं. वास्तवाशी त्याचा काडीमात्र संबंध असण्याची शक्यता नसून देखील त्याला ते वास्तववादी वाटत राहतं . मृत्यूनंतरच्या जगाचे काही नियम आहेत, तिथे तुम्ही काही गोष्टींच भान राखण गरजेचं आहे. अन्यथा तुम्ही एकतर वेडे तरी होऊ शकता किंवा मृत्यू ओढवून घेऊ शकता. मोहाच्या क्षणाला बळी पडून अनेकजण या अनुभवातच अडकून पडल्याचा दावा प्रोफेसर राव करतात. तरीही लेखक या अनुभवासाठी तयार होतो. अशा या दुसऱ्या जगातून लेखक सहीसलामत माघारी येतो का? प्रोफेसर राव यांच्या विचारांची प्रचिती त्याला मिळते का? स्वतःला अपेक्षित स्वर्गात आणि नरकात त्याला फरक करता येतो का? असे कितीतरी प्रश्नांची उकल कादंबरीच्या शेवटी झालेली आपल्याला आढळून येईल. हि कादंबरी अठरा वर्षांपुढील लोकांसाठी आहे याची जाणीव वाचकांना असावी असं मला वाटतं. तुम्हाला जर गूढ, चित्तथरारक, मनाला गुंगारा देणाऱ्या कथांमध्ये रस असेल तर "मृत्यानुभव" तुमच्यासाठीच लिहिलेली आहे.

एक छोटेखानी परंतु प्रभावी कादंबरी म्हणून या पुस्तकाची गणना होऊ शकते. मनाला आणि मेंदूला सुखावणारी हि कादंबरी तुम्ही एकदा वाचून बघा कदाचित तुमचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल. "मृत्यानुभव" हि एक मानसिक रोग बरा करण्याची पद्धत आहे, असं प्रोफेसर राव यांना वाटतं; मात्र त्याचं नक्की कारण आपल्याला पुस्तकाच्या शेवटी समजून येईल. Life Hereafter या नावाचं इंग्रजी पुस्तक देखील बाजारात उपलब्ध आहे. त्यामुळे ज्यांना इंग्लिशची आवड आहे ते देखील ह्या कादंबरीचा आस्वाद घेऊ शकतात. एक मजेशीर आणि वेगळ्या धाटणीची कथा वाचल्याचं समाधान या पुस्तकातून तुम्हाला नक्की मिळेल. तर आजच मृत्यानुभव हातात घ्या आणि तुमचे अनुभव आमच्यापर्यंत पोहोचवा.

-© गिरीश अर्जुन खराबे.

Previous Post Next Post

Contact Form