पुस्तक | मृद्गंध | कवी | विंदा करंदीकर |
---|---|---|---|
प्रकाशन | पॉप्युलर प्रकाशन | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | १६४ | मूल्यांकन | ४.७ | ५ |
"स्वेदगंगा" या पुस्तकापासून सुरू झालेली विंदांची लेखणी, पुढे लिहू लागली आणि "मृद्गंध" सारखा एक सुंदर काव्यसंग्रह आपल्या हाती आला. इथे विंदांची कविता हळूहळू आकार घेऊ लागली होती. त्यांनी त्यांच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे, या काव्यसंग्रहातून देण्याचा प्रयत्न केला आहे. स्वतः त्यांनी अंतर्मुख होऊन अनेक प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. त्यातच त्यांना जाणवलेले रितेपण.. एकटेपण.. व मनाला सतत भेडसावणारे प्रश्न.. या सर्वांची सांगड घालून समकालीन परिस्थितीवर विंदांनी परखडपणे भाष्य केले आहे.
विंदांच्या कविता नेहमी सत्याची कास धरुन असतात. या पुस्तकात काही प्रेमकविता आहेत तशाच, प्रेमभंगाच्याही कविता आहेत. अनेक कविता तुम्हाला भाऊक देखील करतात. 'कसा मी कळेना' सारखी कविता.. स्वतःच्या अस्तित्वाची ओळख शोधू पाहण्याची आहे.. तर 'तेच ते' सारखी कविता रोजरोजच्या सर्वातून येणाऱ्या उबगतेची आहे. 'बाळ होऊनी कुशीत यावे' या कवितेने अचानक एक परकेपणा मिटवून.. आईच्या अभयाचा शोध घेतला आहे.
विंदांच्या कविता समजायला सोप्या वाटत असल्या तरीही, त्यात दडलेली कथा.. त्यांचा विचार.. जोवर आपल्याला उमगत नाही तोवर कविता पूर्ण होत नाही. म्हणून ती अनेकदा वाचून पाहायला मला आवडतं.. त्यातील बारकावे समजून घ्यायला आवडतात. आणि विंदा हळू हळू समजू लागतात. त्यांची कविता समजायला तुम्हाला त्या काळातील काही गोष्टींची माहिती असणं अगदीं गरजेचंच आहे. त्यावर आधारित कविता त्याने सहजरित्या समजते. यातील अनेक कविता मला पाठ आहेत. 'माझ्या मना बन दगड' सारखी अजरामर कविता याच संग्रहात आहे. या कवितेत.. समोर चालू असणारे सर्व पाहताना, नकोसे झालेल्या मनाची व्यथा, त्या वेदना.. विंदांनी इतक्या चपखल मांडल्या आहेत की याहून सुंदर कविता नाही असे वाटते.
या संग्रहातील माझ्या काही आवडणाऱ्या कविता मी खाली देत आहे.
"कसा मी कळेना, तेच ते, हीच दैना, ब्रह्मंडाचे कुजके अंडे, नको नको ते मनात येते, माझ्या मना बन दगड, धोंड्या नाव्ही, जमू नये त्या वेळी जमलो, माझ्या परसात एकच झाड, नाही रे झेपत, तुझिया ओठांवराचा मोहर, हुंकार, तू नसतीस तर, प्रेम करावे असे परुंतू, असेच होते म्हणायचं तर, तसेच घुमते शुभ्र कबूतर, उपजत होती तुला कला ती, या जन्माला फुटे न भाषा, उघडी पडती भर रस्त्यावर, असे काही तुला द्यावे, बाळ होऊनी कुशीत यावे".
अशा कविता न वाचणे म्हणजे एका सुंदर अनुभवला मुकणे. म्हणूनच आत्ताच पुस्तक विकत घ्या.. आणि तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा.
-© अक्षय सतीश गुधाटे.