पुस्तक | माझी जन्मठेप | लेखक | वि. दा. सावरकर |
---|---|---|---|
प्रकाशन | परचुरे प्रकाशन | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | ४८८ | मूल्यांकन | ४.९ | ५ |
प्रत्येकाच्या आयुष्यात असं एक पुस्तक येतच, की जे त्याचं संपूर्ण विश्वच बदलून टाकते. मनात असणारे सगळे किंतु परंतु नाहीसे होतात आणि एक नवीन वाट दिसू लागते. मनातला विश्वास दृढ होतो. जगण्याची उमेद मिळते. माझ्या साठी ते पुस्तक आहे "स्वातंत्रवीर सावरकर" यांनी लिहिलेले.. आत्मचरित्रपर पुस्तक "माझी जन्मठेप". पुस्तकाबद्दल जाणून घेण्याआधी त्या काळातील समकालीन परिस्थितीचा एक आढावा घेतल्याशिवाय तुम्हाला या पुस्तकाचे खरे मूल्य कळणार नाही.
आपल्या मातृभूमीवर असलेल्या प्रेमापोटी आणि तिच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या चळवळींचे प्रणेते म्हणून सावरकरांना काळ्यापाण्याची शिक्षा झाली. सावरकरांनी आपल्या पुस्तकात अंदमानच्या सेल्युलर जेलच्या आठवणी इत्यंभूत मांडल्या आहेत. आजपर्यंत आपण पारतंत्र्यातच वावरत होतो, पण यापुढे जेलमध्ये तुम्हाला कोणतेच हक्क नाहीत सर्व गोष्टी सांगितल्याप्रमाणेच कराव्या लागणार, याची प्रचिती लवकरच सावरकरांना आली. जेव्हा अंघोळीला उभं करून पाणी सुधा घ्या म्हटल्यावरच घ्यायचं. राहायला अगदी अरुंद व निमुळती कोठडी. तेही सर्व कोठड्यांच्या शेवटी.. बाकीच्यांपेक्षा विलग करून. उंच सात आठ फुटावर एक लहानशी खिडकी.. तीही फक्त झरोक्यासाठी. नैसर्गिक विधी देखील त्याच खोलीत.. नि अन्नग्रहण देखील त्याच खोलीत. येवढे वाचून जर तुम्हाला वाईट वाटत असेल तर ही फक्त सुरवात आहे.
दिवसभर कोलू ओढायचा.. काथ्या कुटायचा.. आणि त्यातून खडूस जेलर "बारी". तिथे देखील पठाण.. धर्मांतर.. अजून काय नि किती. अंगावर काटा येतो. असे दोन तिन दिवस तिथे राहिल्यावर सर्वांच्याच मनात आत्महत्येचा विचार येईल. कित्त्येक लोक आत्महत्या देखील करत होते. सावरकरांनी शक्य तितक्या लोकांना धीर देऊन.. तिथल्या परिस्थितीतही लोकांना कसे शिकवता येईल? कसे त्यांना नवीन बाजू मांडता येईल यावर लक्ष दिले. इतकेच काय त्यांना स्वतःला देखील अनेकदा आत्महत्येच्या विचाराने ग्रासले. त्यावेळी त्यांनी स्वतःची काढलेली समजूत.. ती ओळ मलाही खूप आवडली.. तिने कोणालाही आपल्या प्रतिकूल काळात मदतच होईल.
"आपल्या मनात आत्महत्येचा विचार आला, म्हणजे आपल्या संकल्पाचे बळ कमी पडत आहे."
सहसा ही शिक्षा, एका जन्मठेपेची असते. सावरकरांना मात्र दोन जन्मठेपा मिळाल्या होत्या. राजकीय कैदी असून देखील त्यांना वागणूक मात्र अगदी वाईट मिळत होती. अनेक दिवस तिथे राहून त्यांचे बंधू देखील तिथेच आहेत हे त्यांना माहिती नव्हते. खरे तर त्यांना कळूच दिले नव्हते. सावरकरांना तिथे सर्व.. "बडे बाबू" म्हणत. त्याचे कारण आहे त्यांनी लंडनला घेतलेले वकिलीचे शिक्षण व त्यांच्यात उपजत असणारी हुशारी. प्रत्येक प्रश्नाला न घाबरता मुद्देसूद उत्तर देण्याची क्षमता आणि तो सोडवण्याची त्यांची खासियत. यामुळे अनेक लोक त्यांच्याशी भेटण्याची इच्छा ठेऊन येत. त्यांनी अनेक राजनैतिक कैद्यांना सोडवण्याची धडपड केली. माफीनामा लिहिले. त्यावरून अनेकजन आता आपली विवेकबुद्धी गहाण ठेवून त्यांना माफीवीर म्हणतात. त्यातल्या कोणालाही तिथे एक दिवस तरी राहता आले असते का.. दिवस सोडा. साधे काही तासही तिथे राहणे अशक्य आहे.
अशा परिस्थितीत देखील तात्यारावांनी.. सुधारणेचा वसा घेतला होता.. आपल्या लेखणीने त्यांनी "कमला" सारखे महाकाव्य तिथे रचले. आणि प्रबोधन करून तिथल्या बांधवांचे मनोधैर्य वाढवले. तिथेही ते स्वतःसाठी नाही तर लोकांसाठी झटले.. देशासाठी कार्यरत राहिले. मातृभूमीच्या स्वातंत्र्याचे ध्येय उराशी जपताना, आपल्या वैयक्तिक स्वार्थापेक्षा देशसेवा श्रेष्ठ मानून त्यांनी काम केले. उदात्त ध्येयासाठी अनेक अडचणींवर मात करत, कठोर वाटेवरून चालत राहिले. म्हणून मला हे पुस्तक विशेष आवडते.
हे पुस्तक आपल्या सर्वांसाठी एक पर्वणीच आहे. आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य कसे मिळाले आहे.. त्यामागे अशा अनेक व्यक्ती आहेत.. त्यांचे संसार उध्वस्त झाले याची जाणीव या पुस्तकातून तुम्हाला होईल. तुमच्या दैनंदिन आयुष्यात देखील तुम्हाला कामासाठी बळ मिळेल. आणि जर कोणाचे मनोधैर्य खचले असेल, विशेषतः त्यांनी तर हे पुस्तक अवश्य वाचावे. जगण्याची प्रेरणा मिळेल. तुमचे विचार बदलतील.. तुम्ही देखील बदलताल आणि देशाकडे.. समाजाकडे.. स्वातंत्र्याकडे.. एका नवीन प्रकारे पाहायला प्रवृत्त व्हाल याची मला खात्री आहे.