पुस्तक | लंकाज प्रिन्सेस | लेखिका | कविता काने |
---|---|---|---|
प्रकाशन | रूपा पब्लिकेशन्स | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | २८० | मूल्यांकन | ४.४ | ५ |
प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. त्यातील एक बाजू आपण लहानपणापासून ऐकत आलेलो असतो, किंवा आपण फक्त एकाच बाजूने विचार करत असतो. त्या नाण्याची दुसरी बाजू आणि दुसऱ्या पद्धतीने केलेले विचार, लोकांना उमगावेत. ही दुसरी बाजू दाखविण्याचे काम कविता काणे यांनी, त्यांच्या प्रत्येक पौराणिक पुस्तकातून केले आहे. यामुळेच त्यांची एक जगावेगळी शैली आहे.
त्यांच्या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या प्रत्येक पुस्तकातून एक पडद्याआड असलेली आणि जगाच्या नजरेत कधीही न आलेली "स्त्री" त्यांनी आपल्या पुस्तकातून सर्वांना दाखवली आहे. तिच्या भावना, तिच्या मनातील कोलाहल, तीच जुनी पुराणी कहानी पण तिच्या दृष्टीतून. या कथेतील नायिका आहे "लंकेची राजकन्या".
तुम्हाला प्रश्न पडला असेल की लंकेचे राजकन्या म्हणजे नक्की कोण ?? कारण आपण फक्त रामायण राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांच्या नजरेतून आजपावेतो पाहत आलो आहे. असेच लंकेत वाढलेल्या एका लहान मुलीची, आपल्या सुंदर, शुर, पराक्रमी आणि बुद्धिमान भावांमध्ये थोडीशी कुरूप, काळी आणि आपल्या विचित्र नखांमुळे सर्वदूर दुष्ट आणि वाईट अशी जगाला माहित असलेली शुर्पणखा. ही कहाणी त्या स्त्री ची आहे. तिच्या मनाची आहे. सतत दूर लोटल्या गेलेल्या एका नादान मुलीला, लहानपणापासून मन मारून जगायला शिकवणाऱ्या वृत्तीची ही एक हृदयद्रावक कथा आहे.
राक्षसांच्या घरातील शिकवण, तिथे घडणाऱ्या गंमतीशीर गोष्टी, तिथले वातावरण, नियम आणि अश्या बऱ्याच वेगवेगळ्या अचर्चित, नाविन्यपूर्ण आणि दृष्टी पलीकडच्या विचारांचा हा एक खजिना आहे. तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरं यात शोधावी लागतील. शुपनखेची प्रेमकथा तुम्हाला व्याकूळ करेल. स्त्री मनाचा इतक्या बारकाईने केलेला विचार, हेच पुस्तकाचं गमक आहे आणि तेच तुम्हाला गुंतवून ठेवेल. एकदातरी वाचावं असं पुस्तक.