पुस्तक | काहून | लेखक | अभिषेक कुंभार |
---|---|---|---|
प्रकाशन | न्यू ईरा पब्लिशिंग हाउस | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | २४३ | मूल्यांकन | ३.३ | ५ |
मराठी माणसाला मराठी इतिहास हा अगदीच अपरिचित नाही, परंतू आपल्याला अगदीच सखोल आणि त्यातही.. तो छोट्या छोट्या तुकड्यात माहीत आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आणि नंतर पेशवाई, या नंतर आपल्याला खुप कमी दुवे माहीत असतात. माहीत असले तरी त्याची सखोल माहिती नसते. हे पुस्तक या कारणाने एक नक्कीच आपली उत्सुकता वाढवतं.
काहून नाव आपल्या कोणाच्याच जास्ती ऐकिवात नाही, मला तर नक्की काय आहे हे देखिल माहीत नव्हत. "काहून" एक गाव आहे. जिथे कधीकाळी.. मराठ्यांनी एक वादळी लढा दिला, आणि त्यापासून अजूनही अपरिचितच आहोत. पाकिस्तान अफगाणिस्तान मुलखात मराठी सैनिकांनी केलेले शोर्य.. या पुस्तकात बारकाईने मांडण्याचा केलेला प्रयत्न केला आहे. पुण्यातील सिंहगड जवळच्या एका छोट्याशा खेड्यात सैन्यातील कामगिरी बजावून सुट्टीसाठी गावी आलेला "जया", तिथून कथेची सुरुवात होते.. आणि नकळतच साखळीस कडीला कडी जोडली जावी तशीच एक एक गोष्ट, एक एक प्रसंग एकमेकाला जोडले जातात, आणि पुस्तक पुढे सरकते.
लढा, युद्ध किंवा एखादी चकमक जरी असली तरी त्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे ठिकाण. हेच ठिकाण म्हणजे "काहून". आणि लढ्याची मीमांसा करताना प्रथम आपल्याला त्याच्या आधीची सगळी कारणे, सामाजिक, राजकीय परिस्थिती त्यावर आर्थिक अडचणी या सर्व बाबी विचारात घेणं अगदीं गरजेचं असतं. लेखकाने अतिशय सुंदर प्रकारे आधीच्या सर्व विषयांवर आधारित माहिती अगदी कथात्मक स्वरूपात मांडले आहेत. सैनिकांचे जीवन, मनोधैर्य, यांचा बारीक अभ्यास करून, तो आपल्या समोर सहज आणि सोप्या पद्धतीने बोली भाषेतील संभाषणाच्या माध्यमातून सांगण्यात आला आहे.
पुस्तक थोडे हळू हळू पुढे जाते या कारणाने मला ते जरा रटाळ वाटले. मराठी संस्कृती आणि त्यातील अनेक बारकावे पुस्तकात वाचायला मिळतात. सैन्यात इंग्रज अधिकऱ्यांचे असणारे संबंध, आणि मराठी सैनिकांची मजा, हाल, चपळता अशा अनेक गोष्टीची हे पुस्तक एक साठवण आहे. एकाच कथेत गुंफून सांगितलेला हा इतिहास आहे. काहीसा विस्तृत आणि असंबद्ध वाटू शकतो. इतिहासाची काही पाने पुन्हा सापडतील. मराठी सैनिकांचा बिकट परिस्थितीत दिलेला हा लढा आहे. हे पुस्तक कसे वाटले?