पुस्तक | गोतावळा [ऑडिओ बुक] | लेखक | आनंद यादव | विनम्र भाबल |
---|---|---|---|
प्रकाशन | स्टोरीटेल | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
वाचनवेळ | ५ तास, ३३ मिनिटे | मूल्यांकन | ४.४ | ५ |
आनंद यादव यांच्या झोंबी मुळे ते सर्वत्र परिचित आहेत, पण तसेच त्यांची ग्रामीण लेखनशैली आणि त्याला असणारा निसर्गाचा समतोल आधार आपल्याला सामोर वेगळी दुनिया उभी करतो. गोतावळा ही एक कथा आहे. एका गावातील बदलत जाणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर.. अनेक बदल होताना, माणसांची विचारसरणी बदलत असताना, त्याचा मुक्या जनावरांवर होणारा परिणाम, त्यामुळे बदलत जाणारं समीकरण आणि त्यातून हळू हळू बदलत चाललेली आपली संस्कृती याची एक छान उजळणी करून गोतावळा कादंबरी आपल्या समोर येते.
आपल्याला आता शहरी जीवनपद्धती माहीत आहे, आणि ग्रामीण भागातील बदलामुळे आपण तिकडेच जात आहोत. गावातील लोक शेती आणि सोबतच अनेक बारीक जोड उद्योग करतात. मग त्यात कोंबड्या, गुरं असे अनेक भाग आले. अशाच एका गावातील एका मालकाच्या रानात काम करणाऱ्या, नारबाची ही कथा. दावणीला गुरं पुरणार नाहीत तेथपासून ते आता संपुर्ण गोठा रिकामा, अशी अवस्था. वाढत्या शहरीकरणामुळे, नवनवीन तंत्रज्ञान आणि कार्यपद्धती मुळे रानातील गुरांची गरज कमी होत चालली. त्यांच्यावरची माया कमी झाली आणि आता सर्व उदास जीवन जगात आहे, असं वाटून दुःख झालेला आणि मनोमन दुर्बळ झालेला नारबा.. ही गोष्ट आपल्याला सांगतो.
पुस्तकातील ग्रामीण भागातील वर्णन, भाषा, आणि त्याच सोबत शेतातील आणि गुराढोरांची अनेक बारीक सारीक माहिती यामुळे हे पुस्तक अजूनच फुलते. एकच कथा आणि काही प्रमाणात त्याच गोष्टी सतत घडत असल्यामुळे मध्येच कुठेतरी नकोशी वाटू लागणारी कथा, शेवट मात्र नारबाच्या होणाऱ्या घुसमटीने वेगळेच वळण घेईल असे वाटते. मालक, नारबा, ड्रायव्हर, आणि सोबतची सारी जनावरं, कोंबड्या यामुळेच पुस्तकं आपलेसे वाटू लागते. एक सरळ आणि साधी कथा आपल्याल अनुभवायला मिळते आणि त्यातील अनेक ग्रामीण बरकाव्यांनी आपल्याला नवीन गोष्टी समोर येतात.
ज्यांची मूळ ग्रामीण भागातील आहेत.. अशा माझ्यासारख्या अनेकांना हि कथा आपलीशी वाटतेच.. परंतु ज्यांची जडणघडण शहरी वातावरण झाली आहे अश्याहि माझ्या अनेक मित्रांना हि कथा आवडली.. त्यातील ग्रामीण जीवन समजायला मदत झाली आहे. मी याचे पुस्तक देखील वाचले आहे.. आणि स्टोरीटेल वर हि कथा ऐकली देखील आहे. पुस्तक प्रेमींना हे पुस्तक मी सुचवेलच. परंतु "विनम्र भाबल" यांच्या आवाजात हि कथा मला अजून फुललेली जाणवली. आवाजाने त्यातली पात्र आपल्या समोर बोलकी झाली. ग्रामीण भाग आणि साजेशी भाषा "आनंद यादव" यांची लेखणी आणि "विनम्र भाबल" यांचा आवाज.. या पुस्तकाची मजा नक्कीच दद्विगुणित करतील. अनेक प्राण्यांचे जीवन.. गावातील तपशीलवार माहिती आणि एका नवीन सुखद अनुभवासाठी.. हे पुस्तक नक्की ऐका.. विकत घेऊन वाचा. तुम्हाला या कथेतील काय आवडलं मला नक्की कळवा!