पुस्तक | गोष्ट नव्या वयाची | लेखक | श्रीनिवास सावंत |
---|---|---|---|
प्रकाशन | सायली क्रियेशनस् | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | १२८ | मूल्यांकन | ४.४ | ५ |
एका विशिष्ट वयानंतर आपल्याला आयुष्य बदलणं निरर्थक वाटू लागतं. त्यातून जर एक स्त्री असेल तर ती भावना अजूनच बळावत जाते. असे का होत असेल? आपले यश हे नक्की कशावर अवलंबून आहे हे कळत नाही. वयानुसार यशाची व्याख्या देखील बदलते. आपली जुनी स्वप्ने मागे पडतात. जुन्या इच्छा मनी डोकावतात पण त्याला आता आपण आपल्या मनात थारा देत नाही. त्या भावनेकडे लक्ष्य द्यावे की नाही? आपण स्वतःकडे लक्ष्य द्यावे की नाही?? अशा अनेक प्रश्नांनी आपण भांबावून गेलेलो असतो. याच प्रश्नांची अचूक वेध घेत त्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला आहे, आणि तो मार्ग लेखकाने सर्वांसाठी खुला करून दिला आहे.
ही गोष्ट आहे अस्मिता आणि शामिकाची. दोघी जुन्या मैत्रिणी. दोघी अगदी हुशार पण दोघींच्या वाटा वेगळ्या.. एक कामात अतिउच्च पदावर तर एक स्वेच्छेने गृहिणी झालेली. अनेक वर्षांच्या अंतराने झालेली भेट त्यांचं आयुष्य कसं बदलते.. तिथून त्यांच्या करिअरची नव्याने सुरवात कशी होते हे या पुस्तकात लेखकाने सुंदर मांडले आहे. आपण शून्यातून विश्व निर्माण करूच शकतो त्यासाठी लागणारी जिद्द.. चिकाटी.. आणि महत्त्वाचं म्हणजे योजनाबध्द नियोजन.
पुस्तकात अनेक टप्पे सांगितले आहेत. प्रत्येक वळणावर मागे वळून आपण काय शिकलो काय मिळवलं याला समजून घेऊन त्याचा आनंद कसा घेता येईल हे या पुस्तकातून सुंदर प्रकारे मांडलं आहे. यशाच्या अनेक पायऱ्या सांगितल्या आहेत. प्रत्येक पायरीवर आपण स्वतःला कोणत्या निकषावर पडताळून पाहायचे.. कोण-कोणत्या गोष्टी पाळायच्या.. प्रत्येक पायरीवर गृहपाठ काय करायचा.. अश्या अनेक सूक्ष्म पण महत्वाच्या सूचना लेखकाने वेळोवेळी दिल्या आहेत. ज्यामुळे या पुस्तकाची प्रत्येक ओळ महत्वाची वाटते.
हे पुस्तक कोणासाठी आहे... तर ज्याला कोणाला स्वतःच्या आयुष्याची नवीन सुरवात करायची आहे. जीवनाची नीट आखणी करून नवीन गोष्टी मिळवायच्या आहेत, मग तुमचे वय काहीही असो. त्या सर्वांसाठी हे पुस्तक एक खूप लाभदरक ठरेल. अशी पुस्तके इंग्रजी भाषेत अनेकदा वाचायला मिळतात परंतु मराठी साहित्यात अशी पुस्तक अगदी बोटावर मोजण्याइतकीच आहेत. मला हे पुस्तक खूप आवडले कारण याची सर्वसमावेशकता यात गुंतवून ठेवते. लहान मुलापासून ते वयस्क व्यक्तींसाठी देखील हे पुस्तक उपयोगी ठरेल. जरूर हे पुस्तक एकदा वाचा आणि तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा.