गारंबीचा बापू - श्री. ना. पेंडसे | Garambicha Bapu - Shri. Na. Pendase | Marathi Book Review

गारंबीचा-बापू-श्री-ना-पेंडसे-Garambicha-Bapu-Shri-Na-Pendase-Marathi-Book-Review
पुस्तक गारंबीचा बापू लेखक श्री. ना. पेंडसे
प्रकाशन कॉंटिनेंटल प्रकाशन समीक्षण गिरीश अर्जुन खराबे
पृष्ठसंख्या २५६ मूल्यांकन ४.५ | ५

महत्वाकांक्षी माणूस परिस्थितीच्या नाकावर टिच्चून उभा राहतो, समाजाने आखून दिलेल्या रूढी नियमांच त्याला काही सोयरसुतक नसतं. अशी माणसं क्वचित जन्म घेतात, आपल्या मर्जीने जगतात आणि निघून जातात; मात्र त्यांच्या कर्तबगारीचा सुगंध मागे अखंड दरवळत राहतो. असाच एक अफाट माणूस श्री. ना. पेंडसेनी आपल्या "गारंबीचा बापू" या कादंबरी मधून रेखाटला आहे. कोकणातल्या गारंबी या छोट्याशा गावाला आपल्या प्रतिभेच्या जोरावर श्री. ना. पेंडसेनी कादंबरीमध्ये जिवंत केले आहे. कोकणात गेलेल्या त्यांच्या स्वतःच्या अकरा वर्षांच्या कालावधीचा पुरेपूर वापर त्यांनी गारंबी रेखाटताना केल्याचं तुमच्या लक्षात येईल.

बापू हा जरी कथेचा नायक असला तरी बाकीच्या पात्रांशिवाय बापूला अर्थ प्राप्त होत नाही. बापूच्या अफाट बापू होण्यामागच्या अनेक कारणांपैकी ह्या पात्रांच अस्तित्त्वात असणं देखील एक आहे. अण्णा खोत, विठोबा, बापूची आई, मावशी, राधा आणि बापूचा मित्र दिनकर अशा अनेक पात्रांभोवती गारंबीचं कथानक फिरत राहतं. अण्णा खोतांच्या घरी पाणी भरणारा विठोबा आणि घरं काम करणारी ऐशी यांचा बापू हा मुलगा. विठोबाचा आपल्या ह्या पोरावर अतोनात जीव त्यामुळे कुठेही तुकडा मिळाला की तो बापूला घेऊन येई. अत्यंत बिकट परिस्थितीत बापूची जडघडण होते. त्यामुळे गारंबीच्या वळणावर न जाता बापुसारखं अफाट रसायन त्याच गावात तयार होतं. अण्णा खोतबद्दल असलेला राग आणि स्वतःच्या मर्जीवर ठाम राहण्याची वृत्ती यामुळे बापू अमाप पैसा कमावतो. सुपारीच्या धंद्यात प्रचंड नफा मिळवत, बापू गावाबाहेर मोठ्ठा बंगला बांधतो. मधल्या काळात बापू आणि राधा यांची ओळख होते, लग्न न करता ते सोबतही राहतात. गावच्या रूढींच्या विरोधात जाऊन बापू आपला संसार थाटतो.

बापूच्या झोपडीपासून बंगल्यापर्यंतच्या प्रवासात अनेक घडामोडी घडून जातात. मग ते विठोबाचं मरण असो, बापूची भरभराट असो वा पैशाच्या जोरावर गावात मिळवलेला दबदबा असो. गावचा सरपंच होण्याची बापूची ईच्छा पूर्ण होते का? बापू आणि त्याच्या आईचे संबंध कसे होते? राधा आणि बापूच नातं कसं  आकार घेतं? या सगळ्याचा तपशील लेखकाच्या लिखाणातूनच वाचलेलं उत्तम. बापूची घालमेल, तळमळ आणि तीळतीळ तुटणारा जीव रेखाटताना लेखक आपल्याही हृदयात कालवाकालव करून जातो. अण्णा आणि बापूचं नातं नक्की काय असावं? हा प्रश्न सबंध कादंबरीभर मनात घोळत राहतो. त्याचं उत्तर सरतेशेवटी आपल्याला मिळून जातं. कोकणाचं रसभरीत वर्णन, मानवी स्वभावांचे अनेक पैलू, गावकीचे राजकारण अशा अनेक गोष्टी वाचकांसमोर उभ्या करण्यात श्री. ना. पेंडसेनी कमाल केली आहे.

एक संवेदनशील उत्कट कथा वाचण्यासाठी तुम्ही गारंबीचा बापू नक्कीच वाचू शकता. पेंडसेंच्या प्रतिभेतून अनेक भावनांचे पाश या कादंबरीतून आपल्या भेटीला येतात, आपल्या मनावर त्याचा एक ठसा उमटवून जातात. पुस्तक वाचल्यावर देखील ते बऱ्याच काळ आपल्या मनात रेंगाळत राहतं. बापूच्या विश्वात नकळत का होईना आपण अडकून पडतो. एका निश्चयी मनाच्या माणसाने परिस्थितीपुढे गुडघे न टेकता आकाशाला गवसणी घातल्याची हि कहाणी आहे. त्यामुळे तुम्हीही ह्या कथेचा आनंद घ्या आणि गारंबीचा बापू आपलासा करा. तुम्हाला हि कलाकृती आणि बापू कसा वाटला तेवढं मात्र प्रतिक्रियांद्वारे आम्हाला कळवायला विसरू नका.

-© गिरीश अर्जुन खराबे.

Previous Post Next Post

Contact Form