पुस्तक | गंधाली | लेखक | रणजित देसाई |
---|---|---|---|
प्रकाशन | मेहता पब्लिशिंग हाऊस | समीक्षण | गिरीश अर्जुन खराबे |
पृष्ठसंख्या | १५८ | मूल्यांकन | ४.५ | ५ |
रणजित देसाई आणि ऐतिहासिक कथा यांचं एक वेगळंच नातं आहे. ऐतिहासिक लिखाणाला सर्मपकता कशी असायला हवी याच उदाहरण त्यांच्या लिखाणातून आपल्याला पाहायला मिळतं. आपल्या लिखाणाच्या जोरावर त्यांनी अनेक ऐतिहासिक व्यक्तिमत्वे वाचकांसमोर जिवंत केलेली आहेत. आपल्या शब्दरूपी मायेने त्यांनी अनेक वाचकांचं आयुष्य सुगंधाने भारावून टाकलं आहे. अशीच एका सुगंधी कथा मालिका त्यांनी गंधालीच्या रूपाने आपल्यासमोर खुली केली आहे. प्रेम, मोह, माया यांसारख्या भावनांच रसभरीत मिश्रण करून गंधाली सारखा कथासंग्रह त्यांनी लिहिला आहे. सुगंधित द्रव्ये ठेवण्याची पेटी म्हणजे गंधाली, अशी हि पाच कथांची शब्दरूपी सुगंधित पेटी त्यांनी वाचकांच्या हवाली करून त्यांचे आयुष्य सुगंधाच्या परिमळाने स्नेहांकित केले आहे.
विराणी, असा रंगला विडा, अशी छेडिली तार, अशी रंगली प्रीत आणि नक्षत्रकथा या पाच प्रीती कथा गंधाली मधून वाचकांच्या भेटीला येतात. त्यातल्या प्रत्येक कथेचा असा आपला स्वतःचा विस्तार आहे, ओळख आहे. पाचही कथांना ऐतिहासिक लहेजा लाभलेला आहे. इतिहासातल्या काही घडामोडी घेऊन त्यात आपल्या प्रतिभेच्या अंशाची भर टाकत रणजित देसायांनी ह्या कथा साकारल्या आहेत. सलीम आणि मेहरुन्निसा यांच्या प्रेमाची, विरहाची कथा आपल्याला विराणी मधून वाचायला मिळेल. असा रंगला विडा हि माहेलकाच्या बुद्धिचातुर्याची कहाणी असून, अशी छेडिली तार हि बंदे अली आणि चुन्नाच्या प्रीतीची कहाणी आहे. इतिहासाने सगळ्यात जास्त अन्याय केलेल्या शूर बाजीराव पेशवा आणि सौंदर्याची मल्लिका मस्तानी बाई यांच्या अजोड प्रेमाची कथा अशी रंगली प्रीत मधून आपल्याला वाचायला मिळते. तर छत्रपती संभाजी राजांच्या आयुष्यातील विदारक क्षणांवर आधारित अशी नक्षत्रकथा आपल्याला चटका लावून जाते. प्रत्येक कथेला आपली स्वतंत्र बाजू असून ती उठावदारपणे मांडण्यात लेखकाने कुठेही कमतरता ठेवली नाही.
कथांबद्दल इथे कितीही विस्तृतपणे लिहिलं तरी त्याला देसायांच्या शैलीचा लवलेश देता येणार नाही, त्यामुळे त्या सगळ्या कथा प्रत्यक्षात वाचकांनी वाचाव्यात असं मला वाटतं. इतिहासाने पुरुषांना कितीही कर्तबगारी बहाल केली तरी तत्कालीन कालखंडात घडून गेलेल्या स्त्रियांची कर्तबगारी तुम्हाला या कथांमधून वाचायला मिळेल. आपल्या अधिकारांची पुरेपूर जाण असणाऱ्या स्त्रियांनी पुरुषांवर दाखवलेला प्रासंगिक वचक ह्या कथांमधून तुम्हाला पाहायला मिळेल. काही काळासाठी ऐतिहासिक सत्याअसत्य बाजूला ठेवल्यास सुरेख कथा आपल्या पदरात पडल्याचं वाचकांच्या लक्षात येईल.
काळ उभा करण्याची हाथोटी, शृंगारिक भाषा, नगरांचे वैशिष्ट्यपूर्ण वर्णन अशा एक ना अनेक गुणांमुळे ह्या सर्व कथा आपल्या समक्ष घडत असल्याचा भास आपल्याला होतो. एका दमात काहीतरी सुखकारक वाचण्यासाठी तुम्ही गंधाली हातात घेऊ शकता. वाचकाला खिळवून ठेवण्याची क्षमता पाचही कथांमध्ये पुरेपूर सामावलेली आहे. अशी ऐतिहासिक सुगंधी पेटी तुम्ही उघडा, तिचा पुरेपूर सुगंध लुटा आणि मग खुशाल बंद करा; पण तरीही तिचा सुगंध तुमच्या मनात अहोरात्र दरवळत राहतोच. त्यामुळे आजच गंधाली आपल्या हातात घ्या आणि वाचून आम्हाला प्रतिक्रिया कळवा.