दुर्गदुर्गेश्वर रायगड - प्र. के. घाणेकर | Durgadurgeshwar Raigad - Pra. Ke. Ghanekar | Marathi Book Review

दुर्गदुर्गेश्वर-रायगड-प्र-के-घाणेकर-Durgadurgeshwar-Raigad-Pra-Ke-Ghanekar-Marathi-Book-Review
पुस्तक दुर्गदुर्गेश्वर रायगड लेखक प्र. के. घाणेकर
प्रकाशन स्नेहल प्रकाशन समीक्षण गिरीश अर्जुन खराबे
पृष्ठसंख्या ३७६ मूल्यांकन ५ | ५

मराठ्यांची आणि छत्रपती शिवरायांची दुसरी राजधानी म्हणून सर्वश्रुत असणारा आणि इतिहासात अनमोल भूमिका बजावणारा दुर्गदुर्गेश्वर रायगड आपल्या सगळ्यांना ठाऊक असेलंच. आपल्यातल्या अनेकांनी रायगडाच्या अनेक वाऱ्या केल्या असतीलच पण तरीही रायगड आपल्याला संपूर्णपणे कळला आहे काय? खरंतर उभ्या जन्मात रायगड समजून घेणं तेही कोणाच्याही मार्गदर्शनाविना शक्य आहे काय? मी स्वतः आतापर्यंत १५ वेळा रायगडाला गेलो आहे पण प्रत्येकवेळी रायगड मला वेगळा भासला आहे; कितीही नाकारलं वा खोट वाटलं तरी हे सत्य आहे. रायगडाची जादूच अशी आहे असं मला वाटतं. आज उभ्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या शिवरायांना आणि रायगडाला भेट द्यायला लाखो लोक येतात. पण त्यातले कित्येक जण फक्त फिरायला येतात? आणि कित्येक जण अभ्यास मोहीम म्हणून त्याकडे पाहतात? हे प्रश्न न विचारलेलेच बरे. खरंतर आज जी रायगडाची अवस्था आहे ती दयनीय का झाली? त्यामागची नक्की कारणं काय आहेत? हे शोधण्याचं काम आपल्यासारख्या तरुणवर्गाचं आहे. आप्पा दांडेकर, आप्पा परब आणि प्राचार्य प्र. के. घाणेकर यांनी आपापल्या परीने रायगडाचा धांडोळा पुस्तकातून, यूट्यूबच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवला आहे. नजीकच्या काळात प्र. के. घाणेकर यांचं दुर्गदुर्गेश्वर रायगड हे पुस्तक वाचण्यात आलं आणि माझ्या बुद्धिपटलावरचे सगळे मळभ दूर झाले. खरंच आपण जसा बघतो तसा रायगड आहे का? रायगडाच्या वास्तूंबद्दल जे आपल्याला सांगितलं जातं ते सगळं खरं आहे का? हे तपासून घेण्यासाठी हे पुस्तक महत्वाचं आहे असं मला वाटतं.

या पुस्तकात लेखकाने फक्त त्यांना समजलेला लेखाजोखा न मांडता बाकी लोकांचा दृष्टिकोन देखील समजून सांगितला आहे. तो बरोबर आहे कि चुकीचा हे ठरवण्याचे विशिष्ट मापदंड प्रस्तुत केले आहेत. इंग्रजांच्या काळात कोणालाही रायगडावर जाण्याची परवानगी नव्हती; त्यामुळे संपूर्ण रायगड हा काट्याकुट्यांच्या वेढ्यात अडकला होता. तत्पुर्वीपासून केल्या गेलेल्या अपुऱ्या सरकारी संवर्धन योजना, अनेकांचा लागलेला हातभार आणि त्यातून वाचलेला रायगड आज आपल्यासमोर उभा आहे. उत्खननात सापडलेल्या अनेक गोष्टी, महाराजांच्या खऱ्याखुऱ्या अस्थी(विभूती) यांची कशी दयनीय अवस्था पुरातत्व खात्याच्या हातून झाली याच भयाण वास्तव आपण या पुस्तकात वाचू शकतो. महाराजांच्या समाधीचं वीज पडल्यामुळे झालेलं नुकसान आणि मग त्याच्या पुर्नबांधणीत अस्तित्वात आलेली वाघ्या कुत्र्याची समाधी, चुकीचा मांडला गेलेला वास्तूंचा इतिहास अशा एक ना अनेक गोष्टींचा उलगडा या पुस्तकात करण्यात आला आहे. हे सगळं खरं आहे का? असा प्रश्न आपसूकच तुमच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही; मात्र त्याची शहानिशा करून लेखकाने उचित दाखले देखील इथे दिलेले आहेत.

दुर्गदुर्गेश्वर रायगड ह्या पुस्तकामुळे अनेक बारीसारीक गोष्टींचा तपशील आपल्याला समजतो. जसे कि आज आपण ज्याला राणी महाल समजतो तो खरंच राणीवसा आहे का? महाराजांच्या अंगरक्षकांची सोय कशाप्रकारे होती? राणीवसा जिथे आहे तिथे नक्की काय असावं? याचा उलगडा इथे करण्यात आला आहे.

रायगडावर ऐतिहासिक जतन कराव्यात अशा अनेक गोष्टी पुरातत्व खात्याला सापडल्या आहेत; मग ती पुतळाबाईंची सतीची शिळा असो वा तत्कालीन भांडी असोत. या सगळ्यांचं पुढं काय झालं याचं उत्तर आज कोणाकडेही नाही; हे आपलं दुर्दैव आहे. मदारी मेहतर नावाची काल्पनिक पात्र कशी रायगडाच्या इतिहासात गुंफण्यात आली, याचं सविस्तर वर्णन आपण या पुस्तकात वाचू शकतो. अनेक प्रकारच्या ज्ञानाची भर या पुस्तकामुळे आपल्यात पडू शकते. त्यामुळे आपण ती वाचायला पाहिजेत; तसेच पुढच्या पिढीपर्यंत देखील ती पोहोचवायला हवीत.

प्र. के. घाणेकरांच्या गाढ्या अभ्यासातून, त्यांच्या जिज्ञासू इतिहास संशोधनातून हे पुस्तक उभं राहीलं आहे. आप्पा दांडेकरांच्या पुस्तकाचा व इतर लेखकांच्या पुस्तकांचा संदर्भ वापरून त्यातल्या चूक बरोबर गोष्टींची चर्चा या पुस्तकात करण्यात आली आहे. तुम्हाला जर इतिहासाची आणि विशेषकरून रायगडाची आवड, ओढ असेल तर हे पुस्तक तुम्ही नक्की वाचलं पाहिजे. तुम्हाला ते वाचून काय वाटलं त्याबद्दल आम्हाला लिहायला मात्र विसरू नका.

-© गिरीश अर्जुन खराबे.

Previous Post Next Post

Contact Form