पुस्तक | चांगदेव चतुष्टय १ - बिढार | लेखक | भालचंद्र नेमाडे |
---|---|---|---|
प्रकाशन | पॉप्युलर प्रकाशन | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | १८४ | मूल्यांकन | ४.३ | ५ |
भालचंद्र नेमाडे यांचे पुस्तकं म्हणजे अनेक आयाम.. अनेक बाजू.. काही पडत्या.. काही उडत्या. प्रत्येक पुस्तक एका वेगळ्या दुनियेची सैर असते. बिढार ही "चांगदेव पाटील" याचं आत्मचरित्रपर कादंबरी आहे. गावातून शहरात राहायला येणाऱ्या मंसासमोरच्या अडचणी आणि नवनवीन बाबी मांडणे यात नेमाडे यांचा हातखंडा आहे. मग तो कोसला मध्ये असणारा सांगवीकर असो किंवा चांगदेव. नवनवीन होणारे मित्र. त्यांच्यासोबतच्या गप्पा, गोष्टी.. रात्रभर केलेली जागरणं... अशा अनेक गोष्टींसोबत नकळत होणारे वाद प्रतिवाद, अनेक तत्त्वज्ञानाच्या गप्पा आणि प्रत्येकाची आपली स्वतंत्र बाजू.. स्वतंत्र अस्तित्व.. स्वतंत्र विचारसरणी.. आणि त्याला असणारी प्रत्येकाच्या स्वतंत्र अनुभवांची शिदोरी.. पुस्तकांत रंगत आणते.
खेड्यातून शिक्षणासाठी मुंबईला आलेला चांगदेव हळूहळू शहरी वातावरणात रुळत जातो. सोबतीचे मित्र व सुरुवातीला असणारी नाविन्यता हळूहळू लयाला जाऊ लागते. तिथे जमलेले वैचारिक वर्तुळ व त्यातून सगळ्यांना असणारी लेखनाची व वाचनाची आवड सगळ्यांमध्ये दुवा बनते. वाचनाच्या वेळातून सुरू होणारे लिखाण.. त्यातून जन्माला आलेली अनेक मासिके. आणि शिक्षणातून नोकरीकडे सुरू झालेला प्रवास हळूहळू गंभीर होत जातो. सुरुवातीचा उत्साहाचा लोप होऊन उत्तरोत्तर रटाळपणा कसा येतो.. त्याच गर्तेत चांगदेव असा सापडतो याचं अगदी सुरेख वर्णन कादंबरीत केले आहे.
या पुस्तकांत असणारे अगदीं सहज संवाद.. ही नमाडे यांची खास शैली आहे. निराशेच्या गर्तेतून येणारा न्यूनगंड.. त्यातून मनावर होणारे खोल परिणाम लेखकाने अगदी चपळाईने टिपले आहेत, आणि त्याला शोभेल अशी भाषा देऊन पुस्तकाची मजा आजुन वाढवली आहे. पुस्तकातली अनेक पात्र मजेशीर आहेत. नारायण.. भैया.. शंकर.. लेखक सारंग.. कुलकर्णी प्रकाशक.. मेहता डॉक्टर.. आणि चांगदेव चे आई बाबा.. काका काकू.. आणि भावंडं.. अशा पात्रांनी अनेक संवाद मजेशीर केले आहेत.
लेखन क्षेत्रातील येणारे अनुभव.. त्यात चालू असणारे राजकारण.. लेखक.. प्रकाशक.. वाचक.. मासिके.. कादंबऱ्या.. पैसे.. हे नी ते. अशा अनेक गोष्टी आपल्या रोजच्या जीवनात बघता बघता आलेली उबस चांगदेवला भलत्याच दिशेने घेऊन जाते.. त्यात आजारी पडल्याने त्याची झालेली दुरावस्था बघवत नाही. परंतु याही गोंधळात वाचताना मात्र पुस्तकात आता काय होईल याची ओढ टिकून राहते. पुस्तक अर्ध्यावरच संपते असे वाटते.. कारण चांगदेव पाटील याच्या आयुष्यावर बिढारलाच जोडून पुढची पुस्तकं तीन आहेत.. "हुल", "जरीला" व "झूल". छान वाचण्यासारखं पुस्तक आहे. पुस्तकातली काही मतं पटत नाहीत, अतिशय परखड वाटू शकतात. परंतू एकंदरीत पुस्तक छान आहे.