बटाट्याची चाळ - पु. ल. देशपांडे | Batatyachi Chal - Pu. La. Deshpande | Marathi Book Review

बटाट्याची-चाळ-पु-ल-देशपांडे-Batatyachi-Chal-Pu-La-Deshpande-Marathi-Book-Review
पुस्तक बटाट्याची चाळ लेखक पु. ल. देशपांडे
प्रकाशन मौज प्रकाशन गृह समीक्षण अक्षय सतीश गुधाटे
पृष्ठसंख्या १७२ मूल्यांकन ४.९ | ५

जसं जसं मुंबईला शहरीकरणाचा शोध लागला.. हळु हळु चाळीतील जीवन विस्कळीत झालं. आधीची मुंबई कशी होती? तिथली लोकं कशी रहात होती? तेंव्हा मुंबई देखील धावतं-पळतं शहर नव्हे तर हसतं-खेळतं शहर होतं. कुटुंबच्या कुटुंब एकमेकांच्या सहवासात.. एकमेकांच्या घरात डोकावणारे शेजारी.. सुख-दुःखात सहभागी होणारी माणसं.. अशा मांदियाळीची चाळ. तुम्हाला हे खोटं वाटतंय? तर एकदा पुलंच्या बटाट्याची चाळीत एक चक्कर माराच. मुंबईच्या सांस्कृतिक बदलाची ही विनोदी कथा आहे.

पुस्तकाच्या मुखपृष्ठावर असणारं वडाचं डेरेदार झाड. त्यात वसलेली माणसं. हे एक प्रतीकात्मक चित्र आहे आपलेपणाचं.. जमिनीशी असणाऱ्या नात्यांचं.. आपल्या डेरेदार सावलीत सर्वांना सामावून घेणाऱ्या चाळीचं. जितकं सुंदर मुखपृष्ठ त्याहून कैक पटीने अधिक सुंदर हे पुस्तक आहे. पुलंचं लिखाण विनोदी तर असतंच, परंतू त्यात बोचरे विनोद नसतात. जुन्या आठवणीत सापडणाऱ्या गमती असतात, आनंद असतो, भोळेपणातून उद्भवणाऱ्या चकमकी असतात. एकूण काय.. मजा आहे सारीच. आपली साधी बोली भाषा.. त्याच्या वापरातून होणारे विविध शाब्दिक विनोद तुम्हाला थकवा विसरायला लावतात.

पुस्तकांत एकूण बारा प्रकरणं आहेत.. प्रत्येक प्रकरण मनोरंजक पद्धतीने मांडलं आहे. त्यातून चाळीतली एक एक व्यक्ती समोर येते. त्यांच्या सवयीतून पुलंनी पात्रांची ओळख आपल्याला करून दिली आहे. ती पात्र काल्पनिक असली तरीही आपल्याच आसपासची वाटतात. रोजच्या दिनचर्येत दिसणारी असल्यानं ती आपल्याला भावतात. खोडकर मुलांपासून ते नाठाळ वयस्कर मंडळींपर्यंत पुलंनी सर्व पात्र अगदी चपखल रेखाटली आहेत व कथेत बेमालूमपणे गुंफली आहेत. पुस्तक वाचताना नकळत तुम्ही अंतर्मुख व्हाल.

सांस्कृतिक शिष्टमंडळ, उपवास, सांस्कृतिक चळवळ, गच्ची सह झालीच पाहिजे, भ्रमण मंडळ.. अशी काय नि किती सांगू एक-एक प्रकरण भयंकर. वजन वाढीमुळे त्रासल्याने केलेल्या उपवासाचे कधी उपहासात्मक हास्यात रूपांतर होते हे कळत देखील नाही. त्या काळात लिहिलेली ओळ नी ओळ अजूनही आताच्या परिस्थितीला जशीच्या तशी लागू पडते, आणि यामुळेच पुलं हे मराठी माणसाचं दैवत आहे. भ्रमण मंडळ मधली सहल म्हणजे, एक अविस्मरणीय प्रसंग व अनुभव आहे. मला सर्वात जास्ती आवडणारे प्रकरण म्हणजे.. गच्ची सह झालीच पाहिजे. चाळीचा नवीन मालक, सर्वांना नवीन बदलाचे भरमसाट आश्वासनं देतो.. त्याला सगळेच भारावून जाऊन स्वतःला कसा फायदा होईल हे पाहू लागतात.. व त्यातून निर्माण झालेलं वातावरण समजावणं अशक्यप्राय आहे. हे वाक्य त्याच प्रतीक आहे,

वरच्या मजल्यावर राहता, म्हणजे काही स्वर्गाला नाही हात लागत.

पुलंची खासियत म्हणजे, माणसांचं इतकं बारीक निरीक्षण.. त्यातून समाजाची, संस्कृतीची ओळख.. आणि सामान्य माणसाच्या परिस्थितीला हास्याची किनार देऊन रंगवलेली पात्रं वाचताना, मनातलं नैराश्य कधी पळ काढतं कळत देखील नाही. तुम्ही हे पुस्तकं वाचलं नसेल तर आत्ताच विकत आणा आणि आस्वाद घ्या या नवीन काल्पनिक विश्वाचा, आणि एकदा वाचलं की तुम्ही देखील बटाट्याच्या चाळीचे कायमचे रहिवासी झालाच म्हणून समजा.

-© अक्षय सतीश गुधाटे.

Previous Post Next Post

Contact Form