पुस्तक | अष्टदर्शने | कवी | विंदा करंदीकर |
---|---|---|---|
प्रकाशन | पॉप्युलर प्रकाशन | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | ८० | मूल्यांकन | ४.९ | ५ |
विंदांच्या ज्या कवितासंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले, तो म्हणजे "अष्टदर्शने". अतिशय महत्वाच्या अशा काही वेगळ्या विचारांचा प्रचार करणाऱ्या महत्वाच्या आठ व्यक्ती.. आणि त्यांनी मांडलेले विचार.. त्यांची वयक्तिक माहिती, विंदांनी आपल्याला सोप्या प्रकारे एक-एका कवितेत गुंफून मांडली आहे.
"देकार्त, स्पिनोझा, काण्ट, हेगेल, शोपेनहौएर, नित्शे, बर्गस्वांद, आणि चार्वाक". हे आहेत ते आठ महत्वाचे व्यक्ती. यांचे तत्त्वज्ञान.. विचार.. लिखाण.. आणि संक्षिप्त परिचय एकाच कवितेत मांडण्याचे दिव्य विंदांनी अगदी सहजरित्या पूर्णत्वाला नेले आहे.. शिवाय तिथे येणारी एक खास मिश्किल बाजू ही असतेच. अशा व्यक्तींवर काहीही लिहणे म्हणजे शिवधनुष्यच. परंतू हे शिवधनुष्य विंदांनी छान पेलले आहे.. आणि फक्त पेलले नाही तर.. अचूक शरसंधान देखील केले आहे.
यातील प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र विचारशैली मांडणारी आहे. त्यांचें विचार आणि स्वतःचे विचार.. सरमिसळ न होऊ देता.. हे सगळे मांडणे.. क्लिष्ट विषय व संकल्पना प्रत्यक्षात कविता रुपात लिहिणे हेच किती वेगळे आहे.. हे तुम्हाला विचार करायला भाग पाडेल. नवनवीन विषय व त्यातील तत्त्वज्ञान समजण्यासाठी हे पुस्तक एक मैलाचा दगड आहे. म्हणूनच बहुदा या पुस्तकाला ज्ञानपीठ सारख्या साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
महत्वाची गोष्ट म्हणजे यासाठी विंदांनी आपल्या मराठी साहित्यातील अतिशय सुंदर अशा अभंग प्रकाराचा हात धरला आहे. अभंगातून या रचना अजूनच छान झाल्या आहेत.. खुलल्या आहेत. चिंतनपर व तत्त्वज्ञानाचा हा प्रकार अभंग शैलीत छान शोभतो व त्याचा विचार करायलाही भाग पाडतो. अभंगाची परंपरा असल्याने, समजावणे आणि अर्थ ग्रहण करणे, लक्षात रहायला देखील मला तो प्रकार सोपा वाटला. मराठी साहित्यातील एक महत्त्वाचे पुस्तक म्हणून समीक्षकांनी याकडे पाहिले आहे.नक्की वाचा.. नक्की तुमचा अभिप्राय कळवा.
-© अक्षय सतीश गुधाटे.