अभोगी - रणजित देसाई | Abhogi - Ranjeet Desai | Marathi Book Review

अभोगी-रणजित-देसाई-Abhogi-Ranjeet-Desai-Marathi-Book-Review
पुस्तक अभोगी लेखक रणजित देसाई
प्रकाशन मेहता पब्लिशिंग हाऊस समीक्षण गिरीश अर्जुन खराबे
पृष्ठसंख्या २०२ मूल्यांकन ४.३ | ५

काही लेखक असतात जे तुम्हाला प्रत्येक लिखाणातून अचंबित करत राहतात. कथा असो, कादंबरी असो त्यातून नेमका विषय मांडण्यात त्यांचा हातखंडा असतो. मला वाटतं रणजित देसाई यांच्याबद्दल अनेकांनी हे स्वतः अनुभवलं असेल. "श्रीमान योगी", "राधेय", "पावनखिंड" अशा अनेक ऐतिहासिक कादंबऱ्या गाजवणाऱ्या अतुलनीय लेखकाची "अभोगी" ही कादंबरी मानवी भावविश्व रंगवणारी कलाकृती आहे. आयुष्यातले कित्येक आघात संगीताच्या जीवावर तरून नेण्याची संकल्पना मांडताना लेखक आपल्याला दुसऱ्या बाजुचेही दर्शन घडवतो. जन्मतःच सरस्वती प्राप्त झालेल्या गायकाला संगीत सतत उशाशी असतानाही सुखावह जीवन जगता येत नाही. मात्र आपल्या दुःखातूनही आपण दुसऱ्यांना सुखाचा मार्ग दाखवू शकतो; अशा आशयाची ही कादंबरी मनाला चटका लावून जाते.

कैलास, महेश आणि केसर यांच्या अवतीभोवती ही कादंबरी फिरत राहते. डॉक्टर असणारा कैलास आपली पत्नी उल्काच्या निधनानंतर पूर्णतः दुःखात बुडून जातो. पेशाने डॉक्टर असल्यामुळे व या दुःखातून बाहेर पडण्यासाठी तो लोणावळा इथे भव्य दवाखाना बांधून, क्षयरोगासारख्या भीषण व्याधीवर विनामूल्य सेवा द्यायला सुरवात करतो. महेशकुमार सारखा एक दिग्गज गायक जेंव्हा ह्या रोगाने त्रस्त होऊन सगळं सोडून आपल्या गावी परत येतो तेंव्हा कैलास त्याला भेटतो. मुळातच महेशच्या गायनाचा चाहता असल्यामुळे कैलास त्याच्या आजारच निदान करून लगेच उपचार चालू करतो.महेशला लोणावळ्याच्या इस्पितळात घेऊन येताना त्याची बालपणीची मैत्रीण केसरदेखील त्याच्या सेवेसाठी सोबत येते. कैलासच्या उपचारांमुळे व केसरच्या सेवेमुळे महेश हळूहळू आजारातून पूर्ण बरा होतो.

स्वार्थी स्वभाव, वेळेनुसार भासणारी केसरची गरज आणि पूर्णतः बरं होऊनही डॉक्टर कैलासबद्दल नसलेला आदर यातून आपण कलाकार असलेला महेश याला कलेशिवाय दुसऱ्या कोणावरही कधी प्रेम करता आलं नाही; हे सहज समजू शकतो. तर दुसरीकडे ऐन तारुण्यात आपलं प्रेम उल्काच्या रुपात हरवून बसलेला कैलास सगळ्या रोग्यांची सेवा करत एकटेपणाची उणीव भरून काढतो. भाविनीची पोर केसर हिने आपलं सर्वस्व ज्याला अर्पण केलं तो महेश तिला आपल्या सोयीनुसार वागवतो पण तरीही केसर त्याच्यावरून आपला जीव ओवाळून टाकते. बरा झाल्यानंतर एक दिवस महेश आपला आवाज गमावून बसतो, नको नको ते आरोप डॉक्टरांवर करून तो एक चिठ्ठी मागे ठेवून निघून जातो. केसरला हा धक्का मुळीच सहन होत नाही. मग केसरच आता पुढे काय होणार? महेश आणि केसर यांच नातं टिकणार का? डॉक्टर कैलास यातूनही काही मार्ग काढतात का? या सगळ्याच विश्लेषण तुम्ही अभोगी मध्ये वाचावं असं मला वाटतं.

खरंतर या कथेवर चित्रपट काढण्याची इच्छा लेखकाच्या एका दिग्दर्शक मित्राने दर्शवली होती, त्यामुळे अभोगीला कादंबरी स्वरूपात यायला वेळ लागला. रणजित देसाई यांच्या शैलीने या कथेला योग्य न्याय दिला आहे. माणसांचा स्थायीभाव अधोरेखित करण्यात त्यांनी कुठेही कसर सोडलेली नाही. प्रत्येक पात्राची वैयक्तिक गोष्ट सांगण्यात लेखक यशस्वी झाला आहे. आणि तोच धागा पकडून, त्यांना एकत्र गुंफून अभोगी नावाचा एक सुंदर हार देसायांनी विणला आहे. अत्यंत लाघवी भाषा, अचूक प्रसंगवर्णन अशा अनेक सुप्त गुणांनी ही कादंबरी रंगली आहे. एक वाचक म्हणून काहीतरी सुप्त वाचल्याचा आनंद ती तुम्हाला नक्कीच देईल; त्यामुळे तुमच्या वाचन संग्रहात अभोगी असायलाच पाहिजे असं माझं ठाम मत आहे.

-© गिरीश अर्जुन खराबे.

Previous Post Next Post

Contact Form