वार्तांच्या झाल्या कथा - राजीव साबडे | Vartanchya Zalya Katha - Rajiv Sabde | Marathi Book Review

वार्तांच्या-झाल्या-कथा-राजीव-साबडे-Vartanchya-Zalya-Katha-Rajiv-Sabde-Marathi-Book-Reviews
पुस्तक वार्तांच्या झाल्या कथा लेखक राजीव साबडे
प्रकाशन रोहन प्रकाशन समीक्षण गिरीश अर्जुन खराबे
पृष्ठसंख्या ३२० मूल्यांकन ४. | ५

आजच्या धावपळीच्या, धकाधकीच्या आणि सोशल मीडियाच्या जगात, वेगाने बातमी पसरवण्याचं एकमेव साधन म्हणजे प्रत्येकाच्या हातात उपलब्ध असणारा स्मार्टफोन. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात घडणाऱ्या घटनांची इत्यंभूत माहिती क्षणात सगळीकडे पसरवण्याचे काम ह्या सुविधांमुळे आज सहज शक्य झालेलं आहे. पण तीस एक वर्षांपूर्वी अशी कुठलीही सुविधा इतक्या सुलभपणे उपलब्ध नव्हती. त्यावेळी एकतर बातमी दूरदर्शनवर मिळायची किंवा वृत्तपत्रातून. वृत्तपत्र हे त्यावेळच्या जनमाणसांच्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक होता. आजही मोठ्या प्रमाणात सविस्तर बातम्या आपल्याला वृत्तपत्रातूनच वाचायला मिळतात. कधी काळी पत्रकारांच्या धाडसी योजना, अंतर्गत सुत्र आणि कर्तव्यबद्ध धडाडीपणा यांमुळे बातमी कोणाची गुलाम नव्हती. आज आपल्या सोयीचा अजेंडा राबवण्यात आणि स्पर्धेच्या युगात सतत पुढे राहण्याच्या शर्यतीत.. मूळ बातमीची होणारी गळचेपी आपण पाहतच आहोत. पण जेव्हा पत्रकारिता खऱ्या अर्थाने स्वतंत्र होती त्यावेळी घडलेल्या घटनांचे विश्लेषण एका पत्रकाराच्या नजरेतून बघण्यासाठी, त्याचे तपशील वाचण्यासाठी जर तुम्ही इच्छुक असाल तर राजीव साबडे या 'सकाळ' च्या पत्रकाराने लिहिलेलं "वार्तांच्या झाल्या कथा" हे पुस्तक तुम्ही वाचू शकता.

दोन विभागात विखुरलेल्या कथा आपल्याला पहिल्यांदा पुण्याच्या अवतीभोवती घडलेल्या घटनाक्रमांचा तपशील पुरवतात तर दुसऱ्या विभागातून आपल्याला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेण्यास मदत होते. पुण्यात घडून गेलेल्या आणि पुणे शहरावर आपली छाप सोडून गेलेल्या बातम्या यांची माहिती आपण या पुस्तकातून वाचू शकतो. ओशो आश्रम असेल, जोशी अभ्यंकर हत्याकांड असेल, टेल्को चा उदय असेल वा पुण्याचा पारशी लोकांनी केलेला कायापालट असेल या सगळ्याच वृत्तांकन आपण यात वाचू शकतो. लेखक स्वतः पत्रकार असल्यामुळे घडलेल्या सगळया प्रसंगांची विश्वासार्हता वेगवेगळ्या पुराव्यांसकट पुस्तकातून जपली गेली आहे. जोशी अभ्यंकर हत्याकांड वाचताना एक थरारक भयानकता आपल्या सर्वांगातून सतत वाहत राहते. पुण्यातील अनेक वास्तू, मोठमोठे दवाखाने ज्यांनी आज पुण्याला महत्पदाला पोहोचवलं आहे त्यांचा इतिहास या पुस्तकातून लेखकाने वाचकांसमोर उलगडला आहे. टेल्को समूहाने घडवलेला बदल, कामगारांसाठी निर्माण केलेलं वातावरण, कौटुंबिक भावना आणि त्यातून होत गेलेली पुणे-पिंपरी शहराची औद्योगिक भरभराट इथे सविस्तरपणे आपण वाचू शकतो.

अवतीभोवती मध्ये मन सुन्न करून सोडणाऱ्या घटनांचा परिचय झाल्यानंतर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या माध्यमातून देशाला हादरवून सोडणाऱ्या अनेक घटना आपल्यासमोर उभ्या राहतात. राजीव गांधींची हत्या असो, ऑपरेशन ब्लू स्टार असो, वाजपेयींचा लेखकाला लाभलेला सहवास असो, जेरुसलेमची भेट असो वा ऑशवित्झचे हत्याकांड असो या सगळ्या घटना आपल्याला त्या त्या काळात घेऊन जातात. ऑपरेशन ब्लू स्टारच्या दरम्यान आलेला वार्तांकनाचा अनुभव सांगताना लेखक आपल्यालाही त्या वातावरणात घेऊन जातो. इंदिराजींच्या हत्येनंतर झालेलं शीख हत्याकांड जवळून पाहण्याचा दुर्दैवी क्षण राजीव साबडेंच्या वाट्याला आला. राजीव गांधींचा राजकीय नेता म्हणून झालेला उदय, शांतिसेनेचा फसलेला प्रयोग आणि चुकत गेलेल्या निर्णयांमुळे झालेली हत्या या सगळ्याचा लेखाजोखा अंत्यत बारकाईने या पुस्तकाच्या निमित्ताने मांडण्यात आला आहे. कितीतरी ऐतिहासिक गोष्टींचा साक्षीदार होण्याचा आणि त्यांचं जवळून वार्तांकन करण्याचं भाग्य लेखकाला मिळालं, त्याचा संपूर्ण तपशील वाचकांसमोरही तितक्याच ताकदीने उभा करण्यात  लेखक यशस्वी झाला आहे.

मुळतः वार्ताहर असल्यामुळे शब्दांची रचना, कथेचा प्रभाव आणि वार्तांकन करताना आलेली आव्हाने यातून एकूणच पुस्तक जमून आलं आहे. आपण आपल्या इतिहासातून शिकत राहिलं पाहिजे त्यामुळे रजिवजींसारख्या निष्पक्ष पत्रकारांनी ह्या अशा वार्तांच्या कथा अजून लिहायला पाहिजेत. झगमगटाच्या मागे पळणाऱ्या, दिशाहीन तरुणाईसाठी काही महत्वाच्या प्रसंगांची अशी तपशीलवार माहिती मिळाल्यास त्यांना नक्कीच आपला मार्ग सापडेल. इतिहासात झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी अशा वार्तांची त्यांना मदतच होईल. निष्पक्ष पत्रकारीतेमधून, लेखकाच्या निडरपणामधून आज हे पुस्तक आपल्याला उपलब्ध झालेलं आहे, त्याचा आपण लाभ घेतला पाहिजे. राजिवजींचा एकंदर आवाका पाहता अजून अशा कथा भविष्यात उदयाला आल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. एक वाचक म्हणून, नागरिक म्हणून किमान एकदा तरी तुम्ही हे पुस्तक वाचायलाच पाहिजे.

-© गिरीश अर्जुन खराबे.

Previous Post Next Post

Contact Form