पुस्तक | द हिडन हिंदू - ३ | लेखक | अक्षत गुप्ता | मुक्ता देशपांडे |
---|---|---|---|
प्रकाशन | मेहता पब्लिशिंग हाऊस | समीक्षण | गिरीश अर्जुन खराबे |
पृष्ठसंख्या | २५८ | मूल्यांकन | ४.५ | ५ |
द हिडन हिंदू भाग १ आणि भाग २ मधून कथेचा गाभा वाचकांच्या लक्षात आला असेल. दोन्ही भागात निर्माण झालेली उत्कंठा आणि कथेचा शेवटचा टप्पा भाग ३ मध्ये येऊन संपतो असं जर तुम्हाला वाटतं असेल; तर ती मोठी चूक ठरू शकते. दोन्ही भागात कथेने घेतलेला वेग भाग ३ मध्येही तितक्याच ताकदीने पुढे सरकत राहतो. ओम आणि नागेंद्र यांच्या भूतकाळातल्या अनेक गोष्टींचा उलगडा या भागातून आपल्याला होतो. देवध्वज, ओम आणि नागेंद्र यांचा एकमेकांशी असणाऱ्या संबंधातून कथेला सुरवात होते.
डॉ. बत्रांचा मागच्या भागात मृत्यू झाल्यानंतर त्याबद्दलच गूढ वाचकांना या भागात कळून येईल. नागेंद्रला ठार केल्यानंतर त्याच पुढे काय झालं? मृत्युंजयी शब्दांचा शोध आता संपला आहे का? जग विनाशाच्या गर्तेतून बाहेर पडलं आहे का? असे अनेक प्रश्न आपल्या मनात उपस्थित झाले असतील तर त्यांचीही उत्तरे तुम्हाला ह्या भागात मिळून जातील. भारतातल्या विविध भागात घडणारं हे कथानक केरळच्या पद्मनाभन मंदिरात येऊन थांबत. मृत्युंजय श्लोकाच्या माध्यमातून उघडल्या गेलेल्या दुसऱ्या जगातुन अनेक दानव पृथ्वीवर विनाशासाठी अवतरले आहेत. चिरंजीवी त्यांना रोखू शकतील का? कि संपूर्ण पृथ्वी उद्वस्त होऊन कलीचे राज्य स्थापन होणार? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक वाचावं लागेल.
आत्ताच येऊन गेलेल्या कल्की नावाच्या चित्रपटात ह्या पुस्तकांची थोडीफार पार्श्वभूमी आलेली वाचकांच्या लक्षात येईल. विलुप्त आयुष्य जगणारे चिरंजीवी एक एक करून प्रकट होऊ लागले आहेत. विनाश रोखण्यासाठी त्यांनी या युद्धात उडी घेतली आहे; परंतु यात विजय कोणाचा होतो? हे तीनही भागांच्या अंती वाचकांना समजून येईल. एखादी वेबसिरीज किंवा चित्रपट बनवण्यासारखी कथा अक्षत गुप्ता यांनी द हिडन हिंदू या पुस्तकांतून मांडली आहे. भारतीय पौराणिक कथांना आणि कथानायकांना कुठेही धक्का न लावता त्यांची एकमेकांत सुरेख गुंतवणूक करत; लेखक आपल्याला नवीन कथानकाने बांधून ठेवतो. बहुधा हीच द हिडन हिंदू ह्या पुस्तक शृंखलेची खरी ताकद आहे; असं मला वाटतं.
हिंदू पुराणांबद्दल माहिती नसलेल्या वाचकांना हि पुस्तके वाचताना काही अडचण येईल असं मला तरी वाटत नाही. काही गोष्टी समजून घेण्यात त्यांना वेळ लागेल, मात्र बाधा येण्याचं काही कारण नाही. कथेचा रहस्यमय गूढ प्रवास शेवटपर्यंत जोपासण्यात लेखक सक्षम ठरला आहे; त्यामुळे आपलीही उत्कंठा तशीच ताणून राहते. एकामागुन एक भाग लवकरात लवकर वाचण्यासाठी वाचकांची धांदल उडालीच; तर मला त्यात अजिबात नवल वाटणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही या पुस्तकांचा आस्वाद घ्या आणि तुमच्या त्याबद्दलच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमधून कळवा.
-© गिरीश अर्जुन खराबे.