पुस्तक | द हिडन हिंदू - २ | लेखक | अक्षत गुप्ता | मुक्ता देशपांडे |
---|---|---|---|
प्रकाशन | मेहता पब्लिशिंग हाऊस | समीक्षण | गिरीश अर्जुन खराबे |
पृष्ठसंख्या | २३४ | मूल्यांकन | ४.५ | ५ |
द हिडन हिंदू भाग १ वाचल्यानंतर कथेचा बराचसा भाग आता वाचकांच्या परिचयाचा झाला असेल. कथेमध्ये असलेल्या विविध पात्रांची आणि त्यांच्या जबाबदारीची जाणीवही वाचकांना एव्हाना झालेली असेल. डॉ. बत्रा, मिसेस बत्रा, परिमल, एल एस डी, नागेंद्र अशा अनेक काल्पनिक पात्रांची ओळख द हिडन हिंदू भाग १ मध्ये झाली असेलच. मृतसंजीवनी नावाचं पुस्तक आता नागेंद्र आणि टीमच्या हाती लागलेलं आहे. परिमल आणि एल एस डीने आपल्याच साथीदारांबरोबर विश्वासघात करत नागेंद्रला साथ दिली आहे. परशुराम आणि अश्वत्थामा यांनी निकराचा लढा देत ओमची सुटका केली आहे. हे सर्व भाग १ मध्ये घडल्यानंतर भाग २ च्या रूपाने कथा पुढे सरकत राहते.
मृतसंजीवनी पुस्तक हातात आल्यानंतर नागेंद्रची आता पुढची योजना काय आहे? मृतसंजीवनी पुस्तकात कोणती रहस्य लपलेली आहेत? त्यांचा उपयोग करून नागेंद्र अराजकता माजवून विनाश घडवून आणेल का? मृतसंजीवनी मधल्या संकेतांनुसार एक एक शब्द शोधायला नागेंद्रने सुरवात केली आहे. हे सगळे शब्द गोळा करून तो अमरत्वाला पोहोचू शकेल का कि त्याआधी ती मृतसंजीवनी हस्तगत करण्यात ओम आणि टीम यशस्वी होईल? हे सगळं आपण दुसऱ्या भागातुन जाणून घेऊ शकतो. शब्द मिळवण्याच्या शर्यतीत जिंकणारा नागेंद्र नेहमीच ओम आणि चिरंजीवींच्या एक पाऊल पुढे राहण्यात कशामुळे यशस्वी होतो? त्यांच्या लढाईमध्ये दोन्ही बाजूचे योद्धे कसे धारातीर्थी पडतात याचे उत्कट वर्णन या पुस्तकात करण्यात आले आहे.
परिमल आणि एल एस डी यांच्या भूतकाळाबद्दल या भागात अजून जास्त प्रकाश टाकण्यात आला आहे. ओम आणि नागेंद्र यांच्यातला समान धागा काही अंशी लेखक इथे उलगडून सांगत आहे. दुसऱ्या भागात पोहोचेपर्यंत वाचकांची चौथ्या चिरंजीवीशी ओळख झालेली असते. अनेक अनुषंगाने कथा पुढे सरकत असताना ओम आणि अश्वत्थामा नागेंद्रला मारण्यात यशस्वी होतात. परंतु खरंच नागेंद्र मरतो का? जर नागेंद्र मेला असेल तर परिमल आणि एल एस डी यांची पुढची दिशा काय असेल? हे समजून घेण्यासाठी आपण तिसऱ्या भागाकडे वळलंच पाहिजे.
पहिल्या भागात सुरु झालेली कथा तितक्याच ताकदीने पुढे सरकवत ठेवण्यात लेखक यशस्वी झाला आहे. त्याच ताकदीने वाचकांना खिळवून ठेवणे याही भागात लेखकाला शक्य झाले आहे. पात्रांची विचित्र गुंतागुंत काही वाचकांना संभ्रमात टाकू शकते; परंतु जर एका पाठोपाठ तुम्ही हि पुस्तक शृंखला वाचत असाल तर ते तितकसंही अवघड नाही. पहिल्या भागात पडलेल्या अनेक अनुत्तरित प्रश्नांची उकल दुसऱ्या भागात झाली असली तरी काही प्रश्न पुन्हा नव्याने निर्माण झालेले वाचकांच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. नव्याने पडलेल्या या प्रश्नांची उकल होण्याकरिता आपल्याला तिसरा भाग वाचायला हवा. त्याचे सविस्तर समीक्षण तुम्ही द हिडन हिंदू भाग ३ मध्ये वाचू शकता.
-© गिरीश अर्जुन खराबे.