पुस्तक | द हिडन हिंदू - १ | लेखक | अक्षत गुप्ता | मुक्ता देशपांडे |
---|---|---|---|
प्रकाशन | मेहता पब्लिशिंग हाऊस | समीक्षण | गिरीश अर्जुन खराबे |
पृष्ठसंख्या | १६६ | मूल्यांकन | ४.५ | ५ |
तुम्हाला जर पौराणिक कथा माहित असतील आणि त्याबद्दल उत्सुकता असेल, तुम्हाला जर अघोरी लोकांबद्दल उत्सुकता असेल किंवा जगातील सात अमर हिंदू योध्यांबद्दल माहित असेल वा माहिती करून घेण्याची जिज्ञासा असेल तर "द हिडन हिंदू भाग १" हे पुस्तक तुम्ही नक्कीच वाचू शकता. आपल्या कल्पनेच्या जोरावर आणि काही पौराणिक कथांचा आधार घेऊन अक्षत गुप्ता या लेखकाने हिडन हिंदू हि तीन पुस्तकांची मालिका लिहिली आहे. अनेक पुराण कथा आणि त्यांचे संदर्भ एकमेकांना जोडून कादंबरीचा घटनाक्रम रचला गेला आहे.
एकवीस वर्षाचा पृथ्वी नावाचा मुलगा ओम शास्त्री नावाच्या एका अघोरी साधूला शोधत असतो. त्याचवेळी भारताच्या एका सुनसान द्वीपावर वैज्ञानिकांची टीम त्याची चाचपणी करत असतात. ओम शास्त्रीची चाचपणी करत असताना त्या टीमच्या लक्षात येत कि हा माणूस हिंदू धर्मानुसार अस्तित्वात असलेल्या चारही युगात म्हणजेच - सत, त्रेता, द्वापार आणि कलियुगात जिवंत राहिला आहे आणि त्यातील सर्व प्रमुख घडामोडींचा तो साक्षीदारही होता. प्रत्येक युगात होऊन गेलेल्या आणि अमरत्व प्राप्त झालेल्या बाकीच्या अमर योद्धयांच्याही तो शोधात आहे. एकीकडे हि सगळी विचारपूस होत असताना परशुराम आणि अश्वत्थामा देखील आपल्या परीने ओम शास्त्रीला शोधत आहेत.
ज्या शोधात वैज्ञानिकांची टीम अहोरात्र प्रयास करत आहे त्यात ते यशस्वी होतात का? ह्या सगळ्याचा नक्की कर्ता करविता कोण आहे? भारत सरकारला याची काही माहिती असते का? ज्या अघटित घटना पुढे घडणार आहेत त्यांची उकल ओम शास्त्री करतो का? हा ओम शास्त्री नक्की कोण आहे? त्याला शोधून या सगळ्यांना काय मिळणार आहे? जग खरंच विनाशाकडे चाललं आहे का? ओम शास्त्रीचा या सगळ्याशी काय संबंध आहे? नागेंद्र नावाच्या माणसाला ओम शास्त्रीकडून नक्की काय हवं आहे? ह्या अनुत्तरित प्रश्नांची उत्तर तुम्हाला ह्या पुस्तकात म्हणजे भाग एक मध्ये जरी नाही सापडली तरी त्याबद्दल थोडीशी का होईना कुणकुण तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही.
कल्पनांच्या जोरावर एक अनोखं विस्मयकारी जग उभं करण्यात अक्षत गुप्ता सफल झाला आहे. सहज सोपी भाषा वापरून वाचकांची उत्कंठा पदोपदी वाढवत नेण्याचं कामही लेखकाने सुलभरीत्या पार पाडलं आहे. एका रोमांचकारी सफारीची सुरवात हिडन हिंदू १ च्या निमित्ताने तुम्ही नक्की करावी असं मला वाटतं. तुमच्या उत्कंठा शिगेला पोहोचून तुम्ही भाग २ हातात घ्यायला अजिबात विलंब करणार नाहीत अशी आशा करतो.
-© गिरीश अर्जुन खराबे.